सुंठ ; आरोग्याचा पारंपरिक ठेवा

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
29th June, 12:02 am
सुंठ ; आरोग्याचा पारंपरिक ठेवा

सुंठीला संस्कृत भाषेत शुंठी, नागर, विश्वभेषज अशी अनेक नावे दिली आहेत. तुम्ही सुंठीचा वापर कधी केला आहे का? आठवा बरं, रामनवमीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो, तेव्हा तुम्ही सुंठ नक्कीच खाल्ली असेल! सुंठीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यामुळे पावसाळ्यात तर ती प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी. या दिवसांत सर्दी, खोकला, ताप, जुलाब यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते आणि अशावेळी सुंठ खूप उपयोगी ठरते.

सुंठीचे आरोग्यदायी फायदे :

पचनास मदत : पावसाळ्यात भूक कमी लागते आणि अन्न नीट पचत नाही. अशावेळी सुंठीचा वापर केल्याने पचन सुधारते आणि भूक चांगली लागते.

पोटाच्या तक्रारींवर उपाय: पाऊस सुरू झाला की बऱ्याचदा पोट बिघडते, जुलाब होतात आणि पोटात दुखू लागते. हे दुखणे कमी करण्यासाठी जेवणानंतर वाटीभर ताजे ताक त्यात २-३ चिमूटभर सुंठ घालून प्यावे.

सर्दी-खोकल्यावर गुणकारी : सर्दी होऊन खूप खोकला येत असेल किंवा घसा दुखत असेल, तर पाव चमचा सुंठ, चिमूटभर हळद आणि १ चमचा मध हे सर्व एकत्र करून चाटण स्वरूपात थोडे थोडे घेतल्यास कफ सुटतो आणि खोकला कमी होतो.

डोकेदुखी आणि सांधेदुखीवर आराम : सर्दीमुळे डोकं दुखत असेल, तर सुंठीचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखी थांबते. वेगवेगळ्या सांधेदुखीवरही सुंठीचा लेप उपयोगी आहे.

रामनवमीचा सुंठवडा : रामनवमीला बनवतात तसा सुंठवडा करून पावसाळ्यात चिमूटभर सुंठवडा चघळून, त्यावर घोटभर गरम पाणी प्यायले असता सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते.

तुमची आजी किंवा आई सुंठीचे आणखी काही वेगळे उपाय करत असतील, तर त्यांना विचारून ते नवीन उपाय लिहून ठेवा. ही उपयोगी माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही नक्की सांगा!


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य