लोक आकाशवाणीच्या बातम्यांवर विश्वास ठेवतात, त्यामुळे अशा कठीण प्रसंगांत सुद्धा हे काम बांधिलकीने करताना बळ मिळतं. आपण मोलाची सेवा देत आहोत, याची जाणीव नेहमीच समाधान देत असते.
नैमित्तिक वृत्तनिवेदकांचा पॅनल विस्तारित करण्यासाठी आकाशवाणी पणजी केंद्रावर सरासरी चार-पाच वर्षातून एकदा परीक्षा होते. हौशे, गवशे, नवशे असे तीन प्रकारचे हे कलाकार असतात. निवड झाल्यानंतर प्रशिक्षण असतं. ते झाल्यावर बातमीपत्रं वाचू लागल्यावर हळूहळू हौशे नवशे असतात, त्यांचा आरंभीचा उत्साह ओसरू लागतो. कारणं वेगवेगळी असतात. सुरुवातीस नाविन्याची ओढ असते. बातम्या तयार करण्याचा व लायव्ह वाचण्याचा जो अनुभव असतो तो घेतल्यावर काहींचा जोष आटू लागतो.
सहा-सात वर्षांपूर्वी जी परीक्षा झाली त्यात सर्वात लहान चुणचुणीत न्यूज रीडर पॅनलवर आली. चिंबलची वेदा मणेरीकर. चांगली वृत्तनिवेदक व्हायला वेदाच्या कौशल्याला आकार द्यावा लागला. ती घरी मराठी बोलते. तिला कोंकणी उच्चारांचे बारकावे समजावले. अनुवादाचे तंत्र, मंत्र शिकवले. वेदाच्या अंगी चमक हुशारी होती. शिकण्याची जिद्द होती. नाटकाकडे तिचा कल, अनुभव होता. पण वृत्तनिवेदनात नाट्यमयता जास्त य़ेत होती. ती नीट सरळ करायला वेळ गेला. पण सरावाने या गोष्टी वेदाने साध्य केल्या. बातम्यांसाठी लागणारं सामान्य ज्ञान कसं अद्ययावत ठेवावं याचा कानमंत्र वेदाला दिला गेला. हळूहळू तिनं मेहनतीने अनुवाद, वाचन, सामान्य ज्ञान यात प्रगती केली.
एक दिवस रायबंदरचा एक ओळखीचा गृहस्थ वेदाला भेटला. त्यानं तिच्या कोंकणी बातम्या ऐकल्या होत्या. आश्चर्याने तो विचारू लागला – तुझी कोंकणी इतकी शुद्ध कशी? तिनं उत्तर दिलं – आकाशवाणीवर थळी सरांनी व इतरांनी ही कोंकणी मला शिकवली.
वेदा मणेरीकर अजूनही आकाशवाणीवर बातम्या वाचते. तिचं मनोगत ऐकूया –
“समुद्री सूक्ष्मजीवशास्त्रात एम.एस्सी. झाल्यानंतर आकाशवाणी पणजी केंद्रासाठी नैमित्तिक वृत्तनिवेदकाच्या काही जागा भरायच्या आहेत, अशी जाहिरात पाहिली. अर्ज केला. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर कोंकणी बातमीपत्रासाठी माझी नैमित्तिक वृत्तनिवेदक म्हणून नेमणूक झाली.
मी जास्त कोंकणी बोलत नसे आणि बोलले तरी मी मराठी भाषिक आहे, हे सहज लक्षात यायचं. त्यानंतर माझ्या कोंकणी भाषेच्या प्रवासाची पहिली पायरी – एक प्रकारे श्रीगणेशाच – मुकेश थळी सरांनी घातला. मी पीएच.डी. करण्यासाठी लागणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करत होते, त्यामुळे कोंकणी शिकण्यासाठी माझ्याकडे वेळ असायचा.
मी आकाशवाणीवर जाऊन मुकेश सरांकडे अनुवादासाठी बातम्या मागत बसायचे, त्यांची शुद्धता तपासून घ्यायचे आणि रोज नवे शब्द शिकायचे. नव्या शब्दांची डायरी लिहायची आणि ती रोज वापरायची ही सवय मला मुकेश सरांनी लावली. हेडलायन्ससहीत बातमीपत्र तयार करण्यापासून ते सादर करण्यापर्यंतच्या अनेक बाबी मी शिकले.
सुभाष जाण, सतीश नाईक, उल्हास नाईक आणि चिन्मय घैसास यांचेही मार्गदर्शन लाभलं. तेव्हा गुगल ट्रान्सलेटर नव्हता, त्यामुळे मला स्वतःहूनच सर्व शब्द शब्दकोशातून शोधून बातमी अनुवादित कशी करायची, हा स्वाध्याय करावा लागे ही शिक्षणातील महत्त्वाची गोष्ट होती.
कोविड लॉकडाऊनच्या काळात तर फारच थोडे वृत्तनिवेदक ड्युटी करत होते. अनेक वेळा मुकेश सर ऑफिसला जाताना मला घरून घेऊन जायचे आणि परत सोडायचे. जेव्हा ते येत नसत, तेव्हा माझी आई माझ्यासोबत यायची, कारण ऑफिसमध्ये कोणीच नसायचं.
तौक्ते चक्रीवादळाच्या दिवशी तर एका वृत्तनिवेदकाला पेडण्याहून येणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी आणि माझी आई ऑफिसकडे निघालो. जिथे तिथे झाडं पडलेली, रस्ते बंद – भरपूर म्हणजे, आवडत्या शब्दांत सांगायचं तर "उटंगाराचो" पाऊस, वादळ आणि जोराचा वारा.
लोक आकाशवाणीच्या बातम्यांवर विश्वास ठेवतात, त्यामुळे अशा कठीण प्रसंगांत सुद्धा हे काम बांधिलकीने करताना बळ मिळतं. आपण मोलाची सेवा देत आहोत, याची जाणीव नेहमीच समाधान देत असते.”
जैवतंत्रज्ञानात डॉक्टरेट करणारी वेदा रेडिओच्या या वृत्तनिवेदन कलेचा अजूनही आनंद घेत आहे, हे समाधान शक्तीवर्धक ठरतं.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)