गेल्या भागात आपण वाचले… भाऊसाहेब मालमत्तेचा निर्णय घेताना पोटच्या चार मुलींचा विचार करतात, त्यामुळे ते तुळशीला वगळतात. यावर भानुप्रिया नाराज होते, कारण तुळशीने त्यांची खूप सेवा केली आहे. भाऊसाहेब स्पष्ट करतात की वारसा हक्क मुलींचा आहे, पण तुळशीला त्यांनी कसे सांभाळायला घेतले याचा भूतकाळही ते सांगतात. आता पुढे…
दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन त्या मुलीला म्हणजे तुळशीला आपल्या वाड्यावर आणलं. सुरुवातीला भानुप्रिया खूप चिडली. ’अगोदरच या चार मुली पदरात आहेत आणि त्यात हे पाचवं रत्न. देव म्हणून किती निष्ठुर आहे बघा, एवढ्याशा जीवाला परकं करून गेला. ना आई, ना बाप... काय होईल एवढ्याशा पोरीचं हा विचार देखील आला नसेल का?’ मनात म्हणत तुळशीची दया येत होती. तिला वरवर रागवत होती पण मनातून मात्र खूप वाईट वाटलं होतं तिला. शेवटी काय, आईचं हृदय होतं तिचं.
पहिल्या दिवशी कोणीच फारसं तिच्याशी बोललं नाही पण छोटी हेमा मात्र चांगली गट्टी करत होती तिच्याशी. “ए तुळशी, तुला पाच वर्ष ना? मला सहावं लागलं. तू मला दीदी म्हण, म्हणशील ना?” तशी तुळशीने मान डोलवली. मोठ्या ताईंला ती फारशी आवडली नव्हती पण “जाऊ दे! आपल्याला काय?” म्हणत तुळशीत फारसं कुणी रमत नव्हतं. दुसऱ्या दिवशी भानुप्रिया कचरा काढताना तुळशी तिच्याजवळ गेली व म्हणाली, “काकू मी कचरा काढते. द्या तो झाडू माझ्याजवळ.” तशी भानुप्रिया बघतंच राहिली. “तू काय कचरा काढणार? आणि मला काकू नाही म्हणायचं दीदी मला काय म्हणते? आई म्हणते. मग तू काय म्हणायचंस? आई... पाचवी मुलगी आहेस तू आमची म्हणून आईच म्हणायचं.”
तुळशीचे डोळे एकदम भरून आले तिने भानुच्या कंबरेभोवती मिठी मारली तशी भानुप्रिया खाली बसली आणि तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिचा पापा घेतला. तुळशीच्या गालावरून ओघळणारे अश्रू आपल्या दोन्ही हाताने पुसून टाकले, “आता हे तुझं घर आणि आम्ही सगळी तुझीच माणसं. बाकी सगळं विसर हा बाळा.” म्हणत तिला चहा दिला. आता तुळशी चांगलीच रमली. अभ्यासात फारशी हुशार नव्हती पण बाकी व्यावहारिक जीवनात एकदम हुशार.
भाऊसाहेबांना आता घरची काळजी करण्याची गरज नव्हती. गाडी चालवण्याची भारी हौस म्हणून गाडी चालवायला शिकवली. त्यामुळे हेमा आणि उमा दोघींनाही कॉलेजला ने-आण करणं, बागायतीत कामगारांना हवं नको ते बघणं आणि पुढे जाऊन कारखान्यात कुठला माल संपला किंवा कुठे डिलिव्हरी व्हायला हवी, तसेच कामगारांवर नजर ठेवणे ही कामे ती चोख करू लागली. त्यामुळे ती रावसाहेबांचा जणू उजवा हात बनली.
ती घरातला कर्ता मुलगा असावा असंच वाटू लागले. मुलगा नसल्याची खंत या पोरीनं भरून काढली होती, भानुप्रियाला तर भलतंच कौतुक वाटायचं तुळशीचं, तिचं तर पानही हालत नव्हतं तिच्याशिवाय. सख्ख्या पोरीपेक्षा तिचा जीव या पाचव्या रत्नात जास्त गुंतला त्यावेळी मुखातून निघालेल्या शब्दाप्रमाणेच ती एक अनमोल रत्न ठरली. थोरल्या बहिणींच्या लग्नात तर सगळा भार उचलत खूप वावरली. आई बाबांना कसलीच चिंता भासू दिली नाही. आणि पुढे बहिणींची बाळंतपणं यथासांग पार पडेपर्यंत झटत राहिली. कधी भाऊ बनली, तर कधी बहीण वेळप्रसंगी आईच्या मायेने सगळं केलं. तेव्हापासून मोठ्या बहिणींच्या ती जास्त जवळ गेली. त्यांनाही आता तुळशी आहे म्हटल्यावर आई वडिलांची चिंता नव्हती.
एवढीशी तुळशी आता चांगलीच वयात आली. पुरुषी कामात पारंगत असलेली तुळशी गावातील सावकाराच्या मुलाला आवडू लागली त्यामुळे त्याच्या बापानं तुळशीचा हात आपल्या मुलासाठी मागितला. हे ऐकताच भाऊसाहेब आणि भानुप्रियाला अपार आनंद झाला. आता आपली तुळशी आपल्या डोळ्यासमोर राहील, गावातच लग्न होतंय म्हटल्यावर कसलीच चिंता नाही, आमच्या म्हातारपणात गरज पडल्यास धावून येईल हा विचारही डोक्यात फेरफटका मारून गेला. कारण बाकीच्या मुली परगावी लग्न करून गेल्या होत्या. आता उतारवयात तब्येतीची कुरबुर सुरु होणार त्यामुळे मदतीला हक्काचं कुणीतरी लागतं सोबतीला आणि आता आपली लेक इथेच लग्न करून असणार म्हटल्यावर काळजीच मिटली.
लग्नानंतर तुळशीचं माहेरासाठी वावरणं तसंच होतं. आपल्या कर्तव्यात ती तसूभर कमी पडत नव्हती. आता तर दोन मुलांची आई झाली होती, तरीसुद्धा आईची मदत करायला धावत येई. देवाच्या कृपेने सर्व काही आहे तिच्याजवळ आणि आज इस्टेटीच्या वाटणीच्या वेळी तिला जाणूनबुजून वगळलं होतं असं आराम खुर्चीत भाऊसाहेबांना जाणवलं. पण एक मन म्हणतंय बरोबर करत आहेस हे, मुली आल्यावर काय तो निर्णय होईल.
आज घरात सण असल्यासारखं एक एक मुलगी वाड्याचा उंबरठा चढू लागली. सगळ्यात शेवटी हेमा आली. “काय बाबा कसे आहात? आणि एवढी घाई कशाला वाटण्या करण्याची?” हेमाने प्राध्यापकी ऐटीत प्रश्न विचारला आणि “आमची भानू काय म्हणते?” म्हणत आईच्या गळ्यात पडली. “चला आता, बाबा काय म्हणतात ते ऐका.” आईने फर्मान सोडलं. “अगं थांब! शेंडेफळ कुठे आलंय अजून?” मोठ्या ताईने म्हटलं. “तिला नाही बोलवलं.” बाबा गंभीर आवाजात उत्तरले. “पण आम्ही बोलावलंय. तिच्याशिवाय कशी वाटणी होणार?” चौघीजणी एकदम म्हणाल्या. “म्हणजे?” आई आश्चर्य व्यक्त करत बोलली. “म्हणजे वाघाचे पंजे! जे काय आहे ते पाचही जणीत वाटून खाऊ. तिला वगळून आम्हाला काहीच नको. तुम्ही जशी तिला लेक मानलीत तशी आम्ही सुद्धा छोटी बहीण मानली तिला, मग या वेळी ती नको? सगळीकडे तीच तर असते अडीअडचणीला. प्रत्येकाच्या मदतीला, सगळी कर्तव्य पार पाडायला आणि वाटणी वेळी का नको? जे काय आम्हाला द्याल तेवढंच तिलाही द्या एवढीच आमची इच्छा आहे.”
हे ऐकताना भाऊसाहेबांचे डोळे भरून आले. मनाला लागून राहिलेली खंत मिटली. आपल्या संस्कारांचे बियाणे पुन्हा नव्याने रुजून आल्यासारखे वाटले. “पोरींनो, माझ्या पोरी शोभतात तुम्ही. माझ्या मनातलं वाचलंत तुम्ही. अश्याच न्यायाने वागा. काहीच कमी पडणार नाही.” तुळशी आली आणि घर पुन्हा भरून गेलं. सगळ्या बहिणी माहेरी आल्या होत्या. आनंदाला उधाण आलं. जे जे भाऊसाहेबांनी कमवलं, ते सर्वांना समान वाटलं. आपल्या उर्वरित आयुष्यासाठी थोडीशी बाकी ठेवून... (समाप्त)
बबिता गावस, साखळी