वसंत ऋतू संपून आता ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा सुरू झाला आहे. उकाडा आता जास्त जास्त जाणवायला लागला आहे आणि आता तर शाळाही लवकर सुटते, त्यामुळे मज्जाच मज्जा करता येणार आहे. खेळायला, नवनवीन गोष्टी शिकायला, छंद जोपासायला भरपूर वेळ मिळणार आहे आणि हे सगळं करताना तहानसुद्धा खूप लागणार आहे. आपण नैसर्गिक थंडावा देणारे उपाय, नैसर्गिक सरबतं कशी बनवावी तेही शिकलो आहोत.
पण बऱ्याचदा आपण ही सरबतं घरी बनवायचा कंटाळा करतो आणि बाजारात जाऊन थंडगार मिल्कशेक पितो किंवा घरी आईला, बाबांना शेक बनवून द्यायला सांगतो. हे मिल्कशेक चवीला जरी मस्त लागले तरी ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत हं. आपल्या आयुर्वेदात या मिल्कशेकना विरुद्ध आहार म्हटले आहे. विरुद्ध आहार म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध गुण असलेले २ पदार्थ एकत्र करून खाणे.
दूध आणि फळे एकत्र करून जे पदार्थ बनवले जातात ते सर्व पदार्थ विरुद्ध आहार होय आणि विरुद्ध आहार परत परत सेवन केला की वेगवेगळे आजार होऊ शकतात. बनाना शेक, चिकू शेक, अॅपल शेक, स्ट्रॉबेरी शेक इत्यादी उन्हाळ्यात रोज किंवा परत परत प्यायले असता शरीरातील कफ वाढून सर्दी होते, ताप येतो, पोट बिघडते, वेगवेगळे त्वचा रोगसुद्धा होऊ शकतात.
खूप आवडत असेल तर कधीतरी एकदा प्यायला हरकत नाही, पण रोज किंवा आठवड्यातून ३ ते ४ वेळा मिल्कशेक पिणे टाळा. त्याऐवजी उन्हाळ्यात वेगवेगळी सरबतं प्या आणि उन्हाळा एन्जॉय करा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य