परीक्षेच्या बागुलबुवाचा छू मंतर!!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
05th October, 02:44 am
परीक्षेच्या बागुलबुवाचा  छू मंतर!!!

बालमित्रांनो, परीक्षा म्हटलं की लगेच आपल्यापैकी काही जणांना ताण येतो आणि आपल्याबरोबर आपली आई सुद्धा परीक्षेचा ताण घेते, बरोबर?? आणि या ताणामुळे परीक्षेची भीती वाटणे, झोप न येणे, लक्ष न लागणे अशा अडचणी येऊ लागतात. पण जर आपण परीक्षेचा खूप जास्त ताण घेतला नाही तर अभ्यास छान लक्षात राहतो आणि परीक्षेत आत्मविश्वास वाढतो. परीक्षा ही आपल्याला एखादा विषय नीट समजला आहे की नाही ते बघण्यासाठीच घेतली जाते. त्यामुळे विषय जर व्यवस्थित समजून घेतले, तर ताण अजिबात येणार नाही. 

आता येणाऱ्या परीक्षांमध्ये आपण काही गोष्टी आचरणात आणुया आणि ताण न घेता परीक्षा देऊया.

१) रोज वेळेत व शांत झोप घ्या 

  • रात्री वेळेत झोपा आणि सकाळी लवकर उठा.
  • परीक्षा सुरू झाली की रात्री उशिरा जागून अभ्यास करणे टाळा, नाहीतर दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रित होत नाही, पेपर लिहिताना झोप येण्याची शक्यता वाढते. 

२) सात्त्विक आहार

  • गरम भात व साजूक तूप, मुगडाळ तांदूळ खिचडी, पोळी भाजी, लाह्या, डाळिंब असा आहार घ्या.
  • तळलेले पदार्थ, जंक फूड, बेकरीचे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ टाळा – हे पचायला जड असल्याने झोप येऊ शकते, उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडू शकते.

३) प्राणायाम व योगासनं

  • रोज सकाळी ५ मिनिटे अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम करा.
  • यामुळे मन शांत होते व अभ्यासात लक्ष केंद्रित होते.

४) ताण कमी करणारे साधे उपाय

  • अभ्यासाच्या मध्ये दर ३५ ते ४० मिनिटांनी थोडी विश्रांती घ्या.
  • पायावर व हातावर कोमट तेलाने हलका मसाज करा – यामुळे थकवा व तणाव कमी होतो.
  • सकाळी कोमट दूध चमचाभर साजूक तूप घालून प्या. दूध पिऊन लगेच नाश्ता नाही हं करायचा. दुधाबरोबर इतर कोणताही पदार्थ खाऊ नका. 

५) सकारात्मक विचार करा

  • मी व्यवस्थित अभ्यास करणार असे स्वतःला सांगा.
  • घाबरण्याऐवजी  ज्या प्रश्नांची उत्तरं येतात ती आधी शांतपणे लिहा. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आणि नंतर 

कठीण वाटत असलेल्या प्रश्नांची उत्तरं आठवा. 

सात्त्विक आहार, प्राणायाम, रोज थोडा थोडा अभ्यास, पाठांतर,  मन शांत ठेवणे या गोष्टी केल्यास परीक्षेची भीती अजिबात वाटणार नाही. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी फक्त अभ्यास नाही, तर शरीर व मनाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हा सर्वांची परीक्षा ताणरहित व्हावी यासाठी शुभेच्छा.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य