कोजागिरी पौर्णिमा म्हणजे मेहनतीचा धडा

Story: छान छान गोष्ट |
05th October, 02:43 am
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे मेहनतीचा धडा

अर्चना ट्युशनला येणाऱ्या मुलांची वाट बघत बसली होती. आज जरा लवकर मुलांचा अभ्यास करून घेऊ म्हणजे रात्रीची कोजागिरीची तयारी करण्यासाठी वेळ मिळेल असा विचार करत असताना सायली, प्रिया, माधव, अतुल, नितीन, सुनीता, मेघा यांचा कंपू गलका करत आला. विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत अर्चना म्हणाली, “अरे जरा हळू किती तो गोंगाट. ट्युशन आहे हे, की घुमट आरतीला आलात तुम्ही?” असे तिने हसत हसत विचारले व म्हणाली, “आज जरा पटपट अभ्यास पूर्ण करूया. कोजागिरी आहे ना. उद्या सविस्तर समजावून सांगेन सगळा अभ्यास. आज फक्त होमवर्क असेल तर पूर्ण करू आणि आज शिकवलेल्या विषयांच्या काही शंका असतील तर त्या उद्या सोडवू. चालेल ना?” “हो चालेल, पण अर्चनाताई कोजागिरीसाठी तुझी एवढी गडबड का? आम्ही ऐकलं आहे कोजागिरी पौर्णिमेबद्दल. आमच्याकडेही मसाला दूध आणून ठेवलेलं आहे माझ्या आवडीचं बदाम पिस्ता फ्लेवरवालं,” मेघा म्हणाली.

“आमच्याकडेही” सगळे एका सुरात म्हणाले.

अर्चनाच्या लक्षात आले, मुलांना कोजागिरीची माहिती सांगितली पाहिजे. तिने सुरुवात केली. हे बघा मी एक गोष्ट सांगते त्यातून तुम्हाला कोजागिरी म्हणजे काय ते समजेल. का निबंध लिहिता तशी माहिती सांगू?”

“नको नको गोष्ट सांगा”, सगळी मुलं एका सुरात म्हणाली.

बरं ऐका तर!

ही गोष्ट एका खेडेगावातली आहे. तिथली लोकं शेती करत, गाईगुरं सांभाळत. थोडक्यात तुम्ही गोष्टीतून कृष्णाच्या गोकुळाचं वर्णन ऐकलं आहे ना, तसंच हे खेडेगाव. त्या गावात सिताराम व त्याची बायको सुशिला आणि शेजारी आठ दहा घरं असलेली एक वाडी होती. प्रत्येकजण आपापल्या शेतात काम करे व संध्याकाळी दमून भागून आल्यावर जेवण तयार होईपर्यंत सिताराम व शेजारी दिवसभरात काय घडलं यांच्या गप्पा करत व जेवण झाल्यावर झोपी जात. असा त्यांचा दिनक्रम असे.

एकदा अशाच एका संध्याकाळी सिताराम शेतातून आला आणि जेवून लगेच झोपून गेला. गाईगुरांमागे धावल्याने त्याला थकायला झाले होते. भातकापणीची कामे जोरात सुरू होती. गोठ्यात दुभत्या गाई होत्या. त्यांना हिरवा चारा आणणे, दूध डेअरीवर नेणे आणि शेतीची कामं यामुळे वाड्यावरील सगळ्यांची दमछाक होत असे. रोजच्या व्यापामुळे कोजागिरी पौर्णिमा विसरून गेले होते. पण सुशिला जागी होती. तिने दूध तापवून त्यात साखर घालून थंड करायला ठेवले होते. देवापुढे दिवा लावला होता आणि अगरबत्ती लावून स्तोत्र म्हणत बसली होती.

त्या रात्री लक्ष्मीमाता पृथ्वीवर आली. ती सगळीकडे फिरत होती आणि विचारत होती. “को जागर्ति?” कोण कोण जागं आहे? सगळीकडे शांतता होती. सुशिला म्हणाली “माते, मी जागी आहे. दिवसभर काम करूनही मी देवाचं स्मरण करतेय. तुझा आशीर्वाद मिळावा म्हणून मी रात्रभर बसले आहे.”

लक्ष्मीमातेने हसून तिच्यावर कृपादृष्टी केली. सितारामचं घर धान्य, सुख आणि समाधानानं भरलं.

गोष्टीत रमलेली मुलं डोळे मोठे करून ऐकत होती.

अतुलने विचारले, “अर्चनाताई एक सांग, म्हणजे लक्ष्मीमाता फक्त श्रीमंत लोकांवर नाही, तर मेहनती लोकांवर प्रेम करते का?”

“हो अगदी बरोबर!” अर्चनाताई म्हणाली.

“या सणाचा अर्थ म्हणजे मेहनतीचा सन्मान. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. तर सुख, समाधान आणि कष्टाचं फळ म्हणजे लक्ष्मी.”

सायली म्हणाली, “पण ताई, आमच्या घरी आई  दूध का उकळवते? आणि चंद्रप्रकाशात का ठेवते?” कोजागिरीला तर बाबा सकाळी दुकानातून जास्त दूध पिशव्या आणतात. दुकानदार सांगतो, आज कोजागिरी आहे मग दूध मिळणार नाही. असं का बरं?

अर्चनाताई म्हणाली सांगते सांगते. ऐका.

“अरे, आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यावेळी विज्ञानाची माहिती नव्हती, पण त्यांनी निसर्गाचं निरीक्षण केलेलं होतं. या थंडगार पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध ठेवलं, तर ते विशेष उर्जायुक्त होतं. त्यात बदाम, वेलची, जायफळ घातलं की ते शरीराला ताकद देतं. त्यामुळे सगळे निरोगी राहतात. आता ड्रायफ्रुट घालतात आवडतात ते.”

“पण पूर्वी कोजागिरी पौर्णिमेला श्रीमंत घरी दूध, केशर व साखर घालून चांदीच्या पेल्यातून पित असत. रात्री जागरण करीत. जागरणामुळे व वातावरण बदलामुळे वाढलेलं पित्त शांत करण्यासाठी हे चांदण्यात ठेवलेलं दूध आरोग्याला पोषक आहे. तसेच शेतीची कामं सुरू असल्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी समजाव्यात, कुणाकडे पिक कसं आहे, मदतची आवश्यकता आहे का, शेतीच्या पुढील कामांची आखणी करण्यासाठी पौर्णिमेचा दिवस ठरवला गेला. त्याकाळी शेतीप्रधान समाज असल्याने व दिवाबत्तीची पुरेशी सोय नसल्याने चांदण्यात मिळणाऱ्या भरपूर, पण शीतल प्रकाशात फिरणे सोईस्कर असे. म्हणून आपल्या पूर्वजांनी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. घरात उपलब्ध असलेले दूधदुभते सर्वजण घेऊन येत व नंतर एकत्र करून वाटण्यात येई. एक प्रकारचे गॅदरिंग असायचे ते.” 

“आम्ही शाळेत करतो तसे! हो ना ताई?”

“अगदी बरोबर!! चला बरं, उद्या भेटूया. सर्वजण वेळेवर या हा.”

दुसऱ्या दिवशी अर्चनाताईने मुलांसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात ठेवलेले दूध दिले. त्यात बदामाचे काप, वेलचीचा सुगंध पसरला होता. सगळ्यांनी ते गोड दूध पिताना म्हटलं, “हा सण खरंच मजेशीर आहे! आता आम्हाला त्याचं महत्त्व कळलं.”

अर्चनाने नेहमीप्रमाणे हसत म्हटलं, “लक्षात ठेवा मुलांनो, मेहनतीचा सन्मान करणं हीच खरी पूजा आहे. एकत्र बसून आनंद घेणं हेच परंपरेचं सौंदर्य आहे आणि निसर्गाचा आदर करणं हीच खरी श्रीमंती आहे.”

 “आम्हाला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय हे छान समजावून सांगितलेस ताई. आता आम्ही दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा आनंदाने साजरी करू आणि तिचा संदेश लक्षात ठेवू.”


मंजिरी वाटवे, 
पर्वरी