अाजकाल लहान वयातच अनेकांना चष्मा लागतो. सतत मोबाईल, टीव्ही, टॅब, कॉम्प्युटरवर वेळ घालवल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि दृष्टी कमी होते. पण आपण रोज थोडी काळजी घेतली तर डोळे नेहमी निरोगी राहू शकतात.
डोळ्यांचे आरोग्य कसे सांभाळाल?
१. डोळ्यांना विश्रांती द्या – अभ्यास करताना किंवा मोबाईल स्क्रीन बघताना प्रत्येक ३०-४० मिनिटांनी डोळे मिटून किमान १-२ मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्या.
२. डोळे स्वच्छ करा – सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
३. योग्य आहार - डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकर असलेल्या आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ जसे की आवळा मुरंबा, चटणी, कँडी, इ. सेवन करा. डाळिंब, काळ्या मनुका, दूध, ताजे लोणी, साजूक तूप या पदार्थांचा सुद्धा आहारात समावेश करा.
४. जास्त स्क्रीन वापरणे टाळा – मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम्सवर सतत डोळे खिळवू नका. त्याऐवजी मैदानी खेळ खेळा.
अनुलोम-विलोम प्राणायाम व त्राटक* – योग शास्त्रातील हे सोपे प्रकार डोळ्यांची शक्ती वाढवतात. योग शिक्षकांकडून हे शिकून रोज थोडा वेळ करा.
५. पुरेशी झोप घ्या – रात्री ७- ८ तास झोप घेतली तर डोळ्यांना आराम मिळतो. बऱ्याचदा आपण व्हिडिओ गेम्स व रील्सच्या नादात जागरण करतो आणि झोप कमी घेतो. मग दुसऱ्यादिवशी सकाळी डोळे लाल होतात व सुजतात. हळूहळू दृष्टी कमी होऊ शकते.
६. झोपताना उशाशी मोबाईल नको – झोपायच्या आधी मोबाईल, टीव्ही वापरल्याने डोळ्यांची शक्ती लवकर कमी होते.
७. डोळे वारंवार चोळू नका – सतत डोळे चोळल्याने नुकसान होऊ शकते. त्यामुळे वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.
८. वाचन किंवा अभ्यास करताना पुरेसा प्रकाश हवा – मंद उजेडात पुस्तक वाचल्याने किंवा लेखन केल्याने डोळ्यांवर ताण येतो.
१०. पायांना तूप लावा - रात्री झोपायच्या एक तास आधी तळपायांना साजूक तुपाने मालिश करा. एका तासानंतर पाय कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पुसून शांत झोपा.
या गोष्टी लक्षात ठेवल्या तर डोळे निरोगी राहतील आणि चष्मा लागण्याची शक्यता कमी होईल.
डोळे हे खूप मौल्यवान आहेत. लहान वयातच चष्मा लागू नये म्हणून डोळ्यांची स्वच्छता, योग्य आहार आणि विश्रांती याकडे नक्की लक्ष द्या.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य