जिल्हा परिषदेच्या शाळा नं २ मध्ये शिकत असलेल्या गौरवची ही गोष्ट आहे. गौरव इयत्ता चौथीच्या वर्गात तुकडी ब मध्ये होता. गौरवची लहान बहीण त्याच शाळेत पहिलीत होती.
गौरव व त्याची बहीण पूनम आणि आई वडील अशी चौघजणं एका छोट्याशा घरात राहात. घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील मजुरीला जात तर आई चार घरी धुणीभांडी करायला जाई. घरात कुणी नसल्यामुळे गौरवला पूनमला सांभाळत शाळेचा अभ्यास करावा लागे. गौरव आईला घरकामात थोडीफार मदत करे. त्यामुळे अभ्यासाकडे फारसं लक्ष द्यायला त्याला वेळच मिळत नसे. अनेकदा त्याचा गृहपाठ अपूर्णच असायचा. शाळेत गेल्यावर थोडा वेळ मिळाला तर तो गडबडीत लिहून पूर्ण करायचा. त्यामुळे अनेकदा त्याच्या गृहपाठाच्या वहीत खाडाखोड असायची. अक्षर व्यवस्थित नसायचं.
गौरव निरिक्षण करून काही वेगळ्या गोष्टी करायचा. हे वर्गशिक्षक महाले गुरुजींनी ओळखलं होतं. गौरवची प्रत्येक गोष्ट महाले गुरुजी लक्षपूर्वक बघायचे. गौरव अभ्यास अपूर्ण ठेवत असल्यामुळे शाळेतले काही जण त्याला ओरडायचे. "याचा अभ्यास कधीच पूर्ण नसतो. अभ्यास केला नाही तर काय करेल हा मोठेपणी, वडिलांसारखाच मोलमजुरी करणार, याचं काही होणार नाही. अशी नाउमेद करणारं बोलणं ऐकून गौरव उदास व्हायचा. पण महाले गुरुजी मात्र नेहमी म्हणायचे, "गौरव, हे बघ, प्रत्येक मुलात काहीतरी वेगळेपण असतंच. तुझ्यातही विशेष अशी एखादी कला आहे. ती ओळख आणि त्याचा अभ्यास कर. तू ही एक दिवस कौतुक करण्यासारखं काम करशील. काही अडचण असेल तर मला सांग मी आहे मार्गदर्शन करायला.
महाले गुरुजींच्या या बोलण्याने गौरव सगळी मरगळ झटकून टाकायचा व हसरा चेहरा करून गुरुजींना “हो गुरुजी तुम्हाला नक्की सांगेन काही अडचण असेल तर” असं म्हणायचा.
एकदा शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं. शाळेतल्या अनेक मुलांनी ग्रुप करून काही प्रोजेक्ट करून प्रदर्शनात ठेवले होते. गौरवलाही वाटत होतं की प्रदर्शनात सहभागी व्हावं. पण कुणीही त्याला ग्रुपमध्ये घेतलं नाही. गौरव नेहमीप्रमाणे बाजूला उभा होता. एवढ्यात महाले गुरुजींनी त्याला बोलावलं आणि म्हणाले, "गौरव, तुला मी चुलीवरचं धुराडं दुरुस्त करताना पाहिलं आहे. तुझ्या या दुरुस्त्या करण्याच्या कामाचा आपण विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी काही बनवू शकतो का याचा विचार कर. मला वाटतं तू धूर कमी करणारा चुलीचा छोटा नमुना ( मॉडेल) तयार करू शकशील.”
गौरव गुरुजींचं हे बोलणं ऐकून थोडा वेळ विचारात पडला. गुरुजींनी कधी बघितलं मला धुराडं दुरुस्त करताना. खरंच बघितलं असेल का, कुणी मला काही येत नाही म्हणून माझी टिंगल करण्यासाठी गुरुजींना सांगितले असेल, असे अनेक विचार गौरवच्या मनात आले.
पण थोडा वेळ गेल्यावर त्याला महाले गुरुजींचं वेळोवेळी प्रोत्साहन देणारं बोलणं आठवलं. गुरुजींनी ओळखलं तर मी नक्कीच काहीतरी करु शकेन. प्रयत्न तर करतो. काही चुकलं तर आहेतच गुरुजी मार्गदर्शन करायला.
असं म्हणून गौरवने उद्या करून आणतो कमी धुराची चूल. पण उद्या प्रदर्शनात सहभागी होता येईल का?
हो तू तयार करून आण. आपण विशेष कौशल्य या विभागात तुझ्या चुलीचा नमुना (माॅडेल) ठेवू. महाले गुरुजींनी सांगितलं.
गुरुजींच्या या बोलण्याने गौरवला उत्साह आला व त्याने प्रदर्शनात सहभागी व्हायचं ठरवलं.
घरी आल्यावर त्याने घरात असलेले जुने डबे, लोखंडी काड्या, आणि चुलीसाठी लागणारे इतर सामान घेऊन एक नमुना तयार केला.
दुसऱ्या दिवशी गौरव तो नमुना घेऊन शाळेत गेला आणि प्रदर्शनात ठेवला. प्रदर्शनातील त्या छोट्याशा प्रयोगाला विशेष उल्लेखनीय असं पारितोषिक मिळालं.
तो दिवस गौरवसाठी आयुष्य बदलणारा ठरला. त्याला कळलं की तोही काहीतरी करू शकतो. महाले गुरुजीही दररोज थोडा वेळ थांबून त्याला अभ्यासात मदत करायचे, वाचनासाठी पुस्तकं द्यायचे. या सर्व प्रयत्नांमुळे गौरव हळूहळू अभ्यासात प्रगती करू लागला.
काही वर्षांनी गौरवच्या घरची परिस्थिती बदलली. गौरवला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर गावाकडे परत येऊन पर्यावरणपूरक चुली बनवण्याचा उद्योग सुरू केला. गावातील अनेकांना रोजगार मिळाला. तसेच अनेक गरीब घरांना धूररहित चुली मिळाल्या. त्यामुळे अनेकांचा धुरामुळे होणाऱ्या त्रास कमी झाला.
शिक्षक दिनी गौरव आपल्या शाळेत गेला. मंचावर त्याने महाले गुरुजींना नमस्कार केला आणि म्हणाला, "गुरुजी, माझ्या आयुष्यात तुम्ही बदल घडवून आणला. चुलीचा छोटा नमुना (मॉडेल) बनवण्यासाठी दिलेला आत्मविश्वास आज हजारो घरांपर्यंत पोहोचला आहे. खूप खूप धन्यवाद गुरुजी.
महाले गुरुजींसारखे गुरुजी मला मिळाले तसेच तुम्हालाही मिळोत आणि त्यांनी दिलेली शिकवण प्रोत्साहन तुम्ही ऐकलंत तर नक्कीच काही विशेष गोष्ट घडते याचं उदाहरण म्हणजे हा तुमच्यासमोर उभा असलेला गौरव आहे. एवढंच म्हणेन की शिक्षक फक्त पुस्तकं शिकवत नाहीत, तर जीवनही जगायला शिकवतात."
सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेलं. महाले गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू आले... पण ते आनंदाचे होते.
मंजिरी वाटवे, पर्वरी