दिवाळी हा सर्वांचा आवडता सण आहे, कारण खूप दिवस वेगवेगळे उत्सव आपण साजरे करतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला शाळेलासुद्धा खूप मोठी सुट्टी असते. त्यामुळे मजाच मजा!
काल तुम्ही धनत्रयोदशीला आरोग्य देवता धन्वंतरीची पूजा केली असेलच. आज आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीला नरकासूर या राक्षसाचं दहन केलं जातं. नरकासूर हा राक्षस वाईट विचार, राग, मत्सर, आळस आणि खोटेपणा यांचे प्रतीक मानला जातो.
नरकासूर दहन म्हणजे आपल्या आतल्या या वाईट सवयींवर विजय मिळविण्याचा संकल्प करणे. म्हणजे नेमके काय करायचे ते बघूया.
रागाचा राक्षस जाळूया
राग, चिडचिड, इतरांना त्रास देणं — हे सगळं आपल्यालाच दुःख देतं. नरक चतुर्दशीला आपण रागाचा राक्षस जाळायचा निर्धार करूया.
आळस आणि मत्सरही नाहीसे करूया
आळस आणि मत्सर हे दुर्गुण आहेत. अभ्यास, खेळ, कामात नेहमी उत्साह ठेवून आळस करणे टाळूया आणि दुसऱ्याच्या यशात आनंद मानूया. आपण सुद्धा यशाच्या मार्गावर चालूया.
अभ्यंग स्नान
नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करून, या दिवशी लवकर उठून अंगाला तेल लावून अभ्यंग स्नान करायची परंपरा आहे.
अभ्यंग स्नान आणि उटणे लावण्याचे फायदे यापूर्वी तुम्हाला सांगितले आहेतच. थोडक्यात उजळणी करूया. अभ्यंग म्हणजे तिळाच्या तेलाने किंवा इतर सुगंधी तेलाने शरीराला मालिश करतात. तिळाचे तेल शरीरातील ‘वात’ कमी करते, त्वचा मऊ आणि चमकदार ठेवते. त्यामुळे थंड हवेपासून शरीराचं संरक्षण होतं. शारीरिक ताकद वाढते, थकवा नाहीसा होतो आणि छान प्रसन्न वाटतं.
त्यानंतर उटणे लावून आंघोळ केली जाते. उटणे म्हणजे बेसन, हळद, चंदन, कडुनिंब, गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी औषधी वनस्पतींचं एकत्र केलेलं चूर्ण. उटणे लावल्याने त्वचेवरील मळ निघून जातो, शरीर सुंदर आणि हलकं वाटतं. शरीरशुद्धी होते.
प्रेम, दया व ज्ञान या दिव्यांचा प्रकाश पसरवूया
अभ्यंग स्नान केल्यावर आपण आपल्या घराभोवती सुंदर पणत्यांची म्हणजेच दिव्यांची आरास करतो आणि अंधकार नाहीसा होतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण चांगले विचार, प्रेम आणि दयाभाव ठेवतो, तेव्हा आपल्या आत ‘ज्ञानाचा दीप’ प्रज्वलित होतो आणि अज्ञानाचा, दुर्गुणांचा अंधकार नाहीसा होतो.
आरोग्याशी संबंध काय?
पण या सगळ्या गोष्टींचा आरोग्याशी संबंध आहे का? उत्तर आहे होय, कारण मन आणि शरीर यांचा घनिष्ठ संबंध आहे. आयुर्वेद सांगतो की, 'मन स्वस्थ असेल तर शरीरही स्वस्थ राहते.'
जेव्हा आपण नरकासूर दहन करतो, तेव्हा आपण या मनातील वाईट भावनांचा नाश करण्याचा संकल्प करतो — म्हणजेच मानसिक आरोग्य जपतो.
सतत रागावणं, मत्सर करणं किंवा चिंता करणं यामुळे शरीरात ‘वात’ आणि ‘पित्त’ दोष वाढतात. त्यामुळे डोकेदुखी, अॅसिडिटी, झोप न लागणे, थकवा येणे अशा तक्रारी निर्माण होतात.
क्षमाशीलता, संयम, प्रेम, मदत या गुणांनी मन शांत आणि शरीर ऊर्जावान राहतं, निरोगी राहतं.
म्हणूनच, या नरक चतुर्दशीला आपण फक्त घर आणि शरीर नव्हे, तर मनही स्वच्छ करूया. रागाचा, आळसाचा, मत्सराचा राक्षस जाळूया आणि आनंद, प्रेम, सद्गुणांचा दीप आपल्या अंतःकरणात प्रज्वलित करूया!
शुभ दीपावली!
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य