एक होतं सुंदर घर. त्या घरात आई, बाबा आणि त्यांचा लाडका मुलगा वीरू राहायचा. वीरूच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायच्या, कारण त्याचे आई-वडील त्याचे खूप लाड करायचे.
रोज शाळेतून येताना वीरू रस्त्याच्या कडेला एका छोट्या मुलाला पाहायचा. त्याचे नाव होते राजू. राजू जुनी पुस्तकं विकत बसायचा. तो गरीब होता आणि शाळेत जात नव्हता. वीरूला त्याची दया यायची, पण त्याला कधी बोलायची संधी मिळत नव्हती.
एक दिवस वीरूने धाडस करून राजूला विचारले, "तू शाळेत का येत नाहीस? तुझं नाव काय?"
राजूने निराशेने सांगितलं, "माझं नाव राजू. मी माझ्या गरीब आत्याकडे राहतो. आई-वडील नाहीत. आत्याला मदत करायला काम करतो, म्हणून शाळेत नाही जाऊ शकत." राजूचं बोलणं वीरूच्या मनात घर करून बसलं. शाळेत न जाणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, हे वीरूला चांगलं माहीत होतं.
घरी आल्यावर वीरू खूप शांत होता. आईने त्याला विचारलं, "काय झालं बाळा? आज इतका शांत का आहेस?"
वीरूने राजूबद्दल सगळं सांगितलं. "आई, त्या राजूला शाळेत जायचं आहे, पण त्याला पैसे नाहीत. त्याचे कपडेही फाटके आहेत. तो बिचारा एकटाच काम करतो."
वीरूच्या आई-वडिलांना राजूची गोष्ट ऐकून खूप वाईट वाटलं. त्यांनी राजूला घरी भेटायला बोलावलं. राजू जेव्हा वीरूच्या घरी आला, तेव्हा वीरूचे आई-वडील त्याला पाहून भावूक झाले. त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं. त्यांनी त्याला पोटभर खाऊ घातला आणि मग राजूला घेऊन ते त्याच्या आत्याकडे गेले.
राजूची आत्या खूप चांगली होती, पण तिची परिस्थिती खूप हलाखीची होती. वीरूच्या आई-वडिलांनी राजूला शाळेत शिकवण्याची आणि त्याच्या खर्चाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. राजूच्या आत्याने डोळ्यात पाणी आणून त्यांचे आभार मानले.
काही दिवसांतच दिवाळी जवळ आली. सगळीकडे दिव्यांची रोषणाई झाली. वीरू खूप आनंदात होता, पण त्याच्या मनात राजूचा विचार होता.
दिवाळीच्या आदल्या दिवशी बाबांनी वीरूला विचारलं, "वीरू बाळा, या दिवाळीला तुला काय गिफ्ट हवं आहे? माग तू जे मागशील ते मिळेल."
वीरूने थोडाही विचार न करता सांगितलं, "बाबा, मला या दिवाळीला कोणतीही नवीन भेटवस्तू नको आहे. मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. तुम्ही राजूला नेहमी मदत करत राहाल का? त्याला शाळेत जाण्यासाठी, पुस्तकं घेण्यासाठी आणि चांगले कपडे घेण्यासाठी मदत करा. त्याला शिकवा."
वीरूच्या या बोलण्याने आई-बाबांचे डोळे भरून आले. आपला लाडका मुलगा स्वतःसाठी कोणतीही महागडी वस्तू न मागता, एका गरजू मित्रासाठी इतका चांगला विचार करत आहे, याचा त्यांना खूप अभिमान वाटला.
बाबांनी वीरूला मिठी मारली. "वीरू बाळा, तू आज आम्हाला दिवाळीची सर्वात मोठी आणि अनमोल भेट दिली आहेस! आम्ही राजूला नक्कीच मदत करू. त्याला चांगलं शिक्षण देऊ, ज्यामुळे त्याचं भविष्य प्रकाशाने भरेल."
राजू आता शाळेत जाऊ लागला. वीरूने त्याला अभ्यासात मदत करायला सुरुवात केली. वीरूला जाणवलं की दुसऱ्याला मदत करण्यात, त्याच्या आयुष्यात आनंद आणण्यात किती मोठा आणि खरा आनंद दडलेला आहे.
या दिवाळीत वीरूला कोणतीही नवीन खेळणी मिळाली नाहीत, पण त्याला राजूला हसताना पाहून जो आनंद मिळाला, तो लाखमोलाचा होता.
स्नेहा सुतार