भरपूर मोदक-करंज्या खाऊन पोट दुखलं तर काय कराल?

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
07th September, 12:05 am
भरपूर मोदक-करंज्या खाऊन  पोट दुखलं तर काय कराल?

गणेश चतुर्थीला घराघरांत उकडीचे गरमागरम मोदक, तळलेले मोदक, त्याशिवाय मावा, चॉकलेट मोदक, करंज्या, लाडू आपण येता जाता फस्त करतो. पण कधी कधी जास्त गोड खाल्ल्याने पोट दुखणे, भूक न लागणे, ढेकर येणे असे त्रास होतात. यालाच अजीर्ण किंवा अपचन झालं आहे असं म्हटलं जातं.

हे त्रास कमी करण्यासाठी काय करावे?

गरम पाणी प्यावे – तहान लागेल तेव्हा कोमट पाणी घोट घोट प्यायल्याने पोट हलकं वाटतं.

आले-मीठ – आल्याचा छोटासा तुकडा घेऊन त्यावर थोडं सैंधव मीठ लावून चावून खाल्ल्याने भूक पुन्हा लागते.

हिंग-ओवा पाणी – पोटात दुखत असेल तर कोमट पाण्यात चिमूटभर हिंग व ओवा टाकून प्यावे.

जिरे - छोटा चमचा जिरे चावून खावे. 

हलका आहार – चतुर्थीनंतर जेवणात मूगडाळ तांदूळ खिचडी, मूगडाळीचं सूप, ताक यासारखा हलका आहार घ्यावा. लगेच मासे, चिकन, पनीर, मशरूम असे पदार्थ खाऊ नये. 

काय लक्षात ठेवावे?

गोड पदार्थ नक्की खा, पण जितकी भूक आहे तेवढेच खा.

प्रत्येक घास हळूहळू चावून खाल्ल्याने पचन सोपं होतं.

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर थोडं *गरम पाणी* प्यायल्याने अन्न लगेच पचायला मदत होते.

आनंदाने सण साजरा करा आणि आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य