शरीराच्या विविध अवयवांपैकी महत्त्वाचे आपले डोळे आहेत. डोळे निरोगी रहावे यासाठी काय करावे हे आपण पूर्वी जाणून घेतलेलेच आहे. डोळ्यांची योग्य काळजी घेतली तरीसुद्धा काही वेळा डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते.
काही वेळा आपले डोळे अचानक लालसर होतात, खूप खाज सुटते, पाणी येते आणि प्रकाशात बघायलाही त्रास होतो. डोळ्यातून सारखी साय येते आणि सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटलेल्या असतात. यालाच आपण “डोळे येणे” असं सामान्य भाषेत म्हणतो. बऱ्याचदा शरद ऋतूत व उन्हाळ्यात या आजाराची साथ दिसते.
डोळे आले आहेत हे कसे समजावे?
१. डोळे लाल होतात.
२. एका किंवा दोन्ही डोळ्यांतून सतत पाणी येते.
३. डोळ्यांना खाज सुटते.
४. डोळ्यांमध्ये जळजळ होते.
५. डोळ्याच्या पापण्या चिकटतात. (सकाळी डोळे उघडायला त्रास होतो.)
डोळे आल्यावर घ्यायची काळजी
१.डोळ्यांना हात लावू नका.
२. आपला रुमाल, टॉवेल, उशी दुसऱ्यांसोबत शेअर करू नका.
३. स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
४. जास्त प्रकाशात, टीव्ही/मोबाईल/स्क्रीनसमोर कमी वेळ बसा.
५. घरात विश्रांती घ्या, पुरेशी झोप घ्या.
६. जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ, दही, उडीद, चीज, पोहे, चिकन, जंक फूड टाळा.
७. ताजे, हलके, अन्न खा जसे की पातळ रवा, पेज, मुगाचे कढण, मूगडाळ तांदूळ खिचडी, डाळिंब, मनुका, लाह्या, नाचणी सत्त्व इ.
डॉक्टरकडे कधी जावे?
१ डोळ्यातून पू किंवा खूप चिकट स्त्राव येत असेल.
२. डोळ्यात फारच लालसरपणा आणि वेदना असतील.
३. दृष्टी धूसर दिसत असेल.
अशी लक्षणे दिसल्यास आपल्या
आयुर्वेद वैद्यांकडे जा.
डोळे येणे हा संसर्गजन्य रोग आहे म्हणजेच डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातील स्रावाचा स्पर्श जर दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या डोळ्यांना झाला तर त्या व्यक्तीला सुद्धा डोळे येतात. म्हणून ज्यांना डोळे आले असतील त्यांनी शाळेत जाऊ नये घरीच विश्रांती घ्यावी.
घरी योग्य काळजी घेतल्यास या आजारामध्ये औषधं घ्यावी लागत नाहीत, काही दिवसात डोळे आपोआप पूर्वीसारखे निरोगी होतात. खूप त्रास होत असेल तर मात्र आपल्या जवळच्या वैद्यांना नक्की भेटा.