उत्तम आरोग्यासाठी निसर्ग-नियम

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
15 hours ago
उत्तम आरोग्यासाठी  निसर्ग-नियम

दिवाळीची सुट्टी संपत आली आहे. सुट्टी खूप एन्जॉय ना तुम्ही? आता परत शाळा, अभ्यास आणि इतर सगळ्या गोष्टींचं रूटीन सुरू होणार आहे. सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते आपलं आरोग्य. शरीर आणि मन हेल्दी असलं की आपली रोजची कामं, तसंच आपले जे ध्येये आहेत, त्यासाठी अभ्यास करणे, काहीतरी नवीन शिकणे, व्यायाम करणे, लेखन-वाचन, चिंतन करणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी उत्साह येतो. पण जरा कुठे दुखत असेल किंवा पोट बिघडले असेल, तर मात्र रोजची कामं करणं सुद्धा शक्य होत नाही. म्हणून आपल्या आरोग्याची आपण नीट काळजी घ्यायला हवी. मग यासाठी नेमके करायचं काय? तर निसर्गाच्या नियमांनुसार जगायचं. निसर्गातील प्राणी-पक्षी बघा, कसे निसर्गाशी एकरूप होऊन जगतात.

निसर्ग नियमांनुसार जगायचं म्हणजे नेमकं करायचं तरी काय? हे सोप्प्या भाषेत समजूया.

 निसर्गात जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा आपलं शरीर ताजं-तवानं म्हणजेच एक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण सकाळी लवकर उठले पाहिजे. सकाळी लवकर उठल्यास शरीर आणि मन निरोगी होतं. पहाटे अभ्यास, पाठांतर सुद्धा चांगलं होतं.

सूर्योदय झाला की आपली पचनशक्ती सुद्धा हळू-हळू सक्रिय होते. दुपारी सूर्याची किरणे जशी तीव्र होतात, त्याचप्रमाणे आपली पचनशक्ती सुद्धा तीक्ष्ण होते. हे होतं दुपारी साधारण १२ ते २ या वेळेत. याच वेळेत आपण जेवलं पाहिजे.

पचनशक्ती तीक्ष्ण असली की आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होऊन, शरीराचे पोषण चांगले होते. शारीरिक ताकद वाढते.

हळू हळू सूर्यास्त व्हायला लागला की आपली पचनशक्ती कमी होत जाते. त्यामुळे सूर्यास्त होताच आपलं रात्रीचं जेवण पूर्ण झालं पाहिजे. आपण टीव्ही बघत किंवा खेळ खेळत बसतो आणि विनाकारण जेवायला रात्री ९:३० ते १० वाजतात. उशिरा जेवल्यामुळे अन्नाचं पचन नीट होत नाही, अजीर्ण होतं आणि आजार होण्याची शक्यता वाढते.

शरीरातील सगळ्या संस्था या सूर्यास्तानंतर आपलं काम मंद गतीने करतात. म्हणून सूर्यास्तानंतर विश्रांती घ्यावी. आपली सगळी महत्त्वाची कामे, अभ्यास सूर्यास्ताआधी पूर्ण केल्यास शरीर व मनाला विश्रांती घ्यायला वेळ मिळतो. निसर्गातील पक्षी बघा, रात्र झाली की चिमण्यांची चिव चिव, कावळ्याचं काव काव असं काहीच ऐकू येत नाही. आपण त्यांना खाऊ जरी ठेवला, तरी ते संध्याकाळी खायला येत नाहीत. सकाळ होताच मात्र पक्ष्यांची किलबिलाट सुरू होते. आपण जर आपली कामे सूर्योदयाला सुरुवात करून सूर्यास्तापर्यंत संपवायचा प्रयत्न केला, तर आरोग्य उत्तम राहते, त्याशिवाय अभ्यास, कामं आणि मनोरंजन या सगळ्या गोष्टी करता येतील.

सूर्यास्तानंतर विश्रांती घेऊन, राहिलेली सगळी छोटी छोटी कामं संपवून लवकर झोपावे.

या गोष्टी साध्या वाटत असल्या, तरी आरोग्य टिकवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही करून बघा आणि स्वस्थ रहा, मस्त रहा.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य