शिक्षक दिन

Story: माझी डायरी |
05th October, 02:47 am
शिक्षक दिन

५ सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन का साजरा करतो हे बहुतेक मुलांना माहीत नसतं. आपण याच दिवशी का साजरा करतो माहीत आहे? कारण की या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृ‌ष्णन यांचा जन्म झाला होता. आता ते कोण होते? ते आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती शिक्षक होते. आमच्या शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता. आमच्या शाळेत स्पर्धा होती. विद्यार्थी शिक्षक होतात आणि शिकवतात, या स्पर्धेत मी पण भाग घेतला होता. मी शिकवणार होते मराठी विषय. माझा अनुभव कसा होता ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. 

सगळ्यात आधी जेव्हा मला कळलं की स्पर्धा होणार आहे तेव्हा मी जोमाने तयारी सुरू केली. मी काय शिकवणार? कसं शिकवणार? हे सगळं मी लिहून काढलं आणि पाठ केलं. मी ‘श्यामचे पोहणे’ हा धडा शिकवणार होते. ही कथा ‘श्यामची आई’ या पुस्तकातली होती. मला कळण्यासाठी बाबांनी मला ‘श्यामची आई’ हा चित्रपट दाखवला. मग हे सगळं झाल्यावर मी आईला शिकवलं. पाहता पाहता तो दिवस उजाडला. मुले शिक्षिका झालेल्या होत्या त्या आपला आपला अभ्यास वाचत होत्या, पाठ करत होत्या. मग स्पर्धेला सुरुवात झाली. मी वर्गात गेले. सगळी मुले बसली. मला खूप घालमेल होत होती. मग शेवटी माझी पाळी आली. मी वर्गात गेले. सगळ्यांनी मला, “सुप्रभात टीचर” असे म्हटले. मी मग, “सुप्रभात मुलांनो” असे म्हटले. “सुप्रभात” हे ऐकल्यावर त्यांना कळलं की मी मराठी विषय शिकवणार आणि मी शिकवायला सुरुवात केली. सगळं छान झालं. म्हणेज मी जेवढे प्रश्न विचारले, तेवढ्या प्रश्नांची उत्तरे सगळ्यांनी अचूक दिली.

मी सगळ्यांना शेवटी विचारलं की मज्जा आली? तर सगळ्यांनी मोठ्या आवाजाने “हो” असे म्हटले. खरचं! शिकवताना मज्जा आली.  तुम्हाला माहीत आहे, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘'जागतिक शिक्षक पुरस्कार’ मिळाला. मला खूप आनंद झाला. सरांना खूप-खूप अभिनंदन! माझ्या सगळ्या शिक्षकांना खूप-खूप धन्यवाद. तुम्ही मला शिकवलात, सांभाळलात व नवीन वाट दाखवली. माझ्या शाळेने मला एवढी मोठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. चला तर मग... लवकरच भेटू या!

स्वरा रुपेश गावस
इयत्ता
: सातवी,  शाळा : डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, कुजीरा