पृथाचे मित्र मंगु आणि गुंड्या!

Story: छान छान गोष्ट |
04th May, 05:27 am
पृथाचे मित्र मंगु आणि गुंड्या!

पृथाला आजी-आजोबांचं घर फार आवडतं. मुंबईतलं घर पण छानच आहे, पण अगदीच एवढंसं बाई! आणि बिल्डिंगमधून खाली उतरलो की नुसते रस्तेच रस्ते... गाड्याच गाड्या! 

आजी-आजोबांचं घर तसं नाही. मोठ्ठालं घर, घरापुढे केवढंतरी मोठ्ठं अंगण, घराच्या मागे बाग, बागेत झाडंच झाडं!. पृथा सापडतच नाही कुणाला एका जागी! घरातून अंगणात, अंगणातून बागेत, बागेतून माडीवर... आणि सगळी मोठी माणसं आपली पळताहेत पृथाच्या मागेमागे!

पण फक्त हुंदडायला मिळतं म्हणून नाही हं, आवडतं पृथाला ते घर! तिथे तिची जिवलग मैत्रीण राहते - 'मंगु'. आणि एक उडाणटप्पू मित्र सुद्धा राहतो - 'गुंड्या'. या दोघांची पृथाशी आणि पृथाची या दोघांशी घट्ट मैत्री आहे.

गुंड्या तर पृथाला एक मिनिटही एकटी सोडत नाही. पृथा येणार असली की त्याला बरोब्बर समजतं. आजी म्हणते - "त्याला वास लागतो, सगळ्या बातम्यांचा!"

मग आजही पृथा येणार असल्याची बातमी समजलीच की गुंड्याला! मग काय? तो अंगणात फेऱ्या मारत मारत पृथाची वाट पाहू लागला. आणि पृथाची गाडी अंगणात येताच टुणटुण उड्या मारत गुंड्या सगळ्यांच्या आधी पृथाला भेटायला गाडीसमोर हजर!

आईने गुंड्याला दटावलं, "अरे हो हो, अशा उड्या नको मारूस." पण काही उपयोग झाला नाही. गुंड्या तर उड्या मारत होताच, पण त्याला पाहून पृथा पण उड्या मारत गाडीतून उतरली.

पृथा ओरडली, 'गुंड्या ऽऽ...' गुंड्या ओरडला, 'म्याऊऽऽ...' अशी दोघांची भरतभेट झाल्यावर काही मिनिटांतच दोघंही मागच्या बागेत गडप झाले.

आजोबा हसले आणि म्हणाले, 'चला, पृथा-गुंड्याची जोडगोळी जमली, आता काही खरं नाही बुवा आमचं.' पृथा-गुंड्याचं मेतकूट जमलं की मोठी माणसं हैराण होतात, हे खरंच!

दोघं मिळून मग खिडकीवर काय चढली, उंचउंच पलंगावरून धपाक-धपाक उड्याच काय मारल्या, धावताना धक्का लागून उंचावरचं सामानच काय पाडलं, आणि मग सगळ्या मोठ्या माणसांचा खूप ओरडा खाल्ला.

असा खूप ओरडा आणि थोडासा खाऊ खाल्ल्यावर दोघंही मंगुला भेटायला गेली.

मंगु मात्र या दोघांसारखी उडाणटप्पू नाही हं! ती अगदी शहाणी आणि शिस्तीची आहे. ती अशी उड्या मारत घरभर फिरत नाही. ती आपल्या घरात शांतपणे बसून असते. हो हो! तिचं बाई स्वतःचं, स्वतंत्र घर आहे. 'काय बरं म्हणतो बाबा तिच्या घराला? हं! गोठा! मंगु गोठ्यात राहते.'

पृथाला पाहून मंगुला फार फार आनंद झाला. तिने मान हलवून हलवून पृथाचं स्वागत केलं. आपल्या खरखरीत जिभेने हळूच तिचा हात चाटला. आणि पृथाने तिला खाऊ दिला ना, तेव्हा तर ती आनंदाने 'हम्माऽऽ... हम्माऽऽ' अशी ओरडली.

पृथाला तर तिला पाहतच राहावंसं वाटत होतं. पण नेमके आजोबा पृथाला शोधत आले आणि म्हणाले, 'चला चला, आता घरात चला, अंधार पडेल आता.'

पृथा अगदीच खट्टू झाली. तिला खूप राग आला - आजोबांचाही आणि अंधाराचाही!

अशा हुवा झालेल्या पृथाला पाहून आई म्हणाली, "काय बरं करावं आता या गालावरच्या फुग्यांचं?" बाबा म्हणाला, "माझ्याकडे आहे हं उपाय! आत्ता फोडतो हे पृथाच्या गालावरचे रागाचे फुगे!"

"बरं का पृथाबाई, उद्या छोटू दादा मंगुला माळरानावर चरण्यासाठी घेऊन जाईल ना, तेव्हा तू सुद्धा जा हो त्याच्याबरोबर! मग हवा तेवढा वेळ बघत बस तुझ्या मंगुला. चालेल?"

हे ऐकल्याबरोबर पृथाची कळी अशी खुलली की काय विचारता! पृथा अशी छानशी हसली ना, की तिच्या गालावर एक गोडुली खळी पडते. आम्हा सगळ्यांना ती फार फार आवडते.

मग जायचं ना उद्या पृथाबरोबर कुरणात?


गौरी प्रभू, मो. ९०८२९०५०४५