कंटकीफल अर्थात फणस

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
13th April, 03:09 am
कंटकीफल अर्थात फणस

सर्वात मोठे फळ म्हणून ओळखले जाणारे, ज्याला बाहेरून काटेच काटे असतात आणि आत मऊ, गोड, गरे. घरात फणस आणून ठेवल्यावर तो पिकला की घरभर त्याचा घमघमाट सुटतो. फणसाला संस्कृत भाषेत 'पनस ' किंवा बाहेरून खूप काटे असतात म्हणून 'कंटकीफल' असे म्हणतात. 

कापा आणि रसाळ फणस या दोन प्रकारांपैकी तुम्हाला कोणता आवडतो? रसाळ फणस हा जास्त गोड असतो पण गुळगुळीत, लिबलिबीत असल्यामुळे बऱ्याचदा खाता खाता तोंडात घसरून एकदम अन्ननलिकेत जातो त्यामुळे रसाळ गरा जरा काळजीपूर्वक खावा लागतो.  त्यामुळे या पिकलेल्या रसाळ फणसाचे वेगवेगळे पदार्थ जसे की साठ, वडी, धोणस - म्हणजे फणसाचा केक, गोड भाकरी इ. बनवले जातात. यांपैकी तुम्ही कोणता पदार्थ खाल्ला आहे? 

काप्या फणसाचे गरे खायला सोपे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात या काप्या फणसावर ताव मारला जातो. 

कच्च्या फणसाच्या गऱ्यांची चविष्ट भाजी केली जाते त्यात भरपूर ओलं खोबरं आणि फणसाच्या बिया म्हणजेच आठळ्या घातल्या जातात. ही भाजी जीभेची रुची वाढवते. कच्च्या फणसाचे पापडसुद्धा बनवले जातात. तेलात तळलेले पातळ, कर्रम कुर्रम पापड मस्त लागतात. कच्च्या फणसाचे क्रिस्पी चिप्ससुद्धा बनवले जातात. बाजारात मिळणाऱ्या प्रिझरवेटीव्ह असलेल्या चिप्सपेक्षा हे फणसाचे चिप्स आरोग्यासाठी चांगले असतात. मुद्दाम खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडतील आणि हे घरी पण बनवता येतात.  

फणस खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळतील?

  •  फणसाला सुपर फूड म्हटलं जातं. 
  •  फणस खाल्ल्याने ताकद वाढते. 
  •  मांसपेशी वाढतात म्हणजेच ज्यांना चांगले मसल्स पाहिजे त्यांनी गरे खावे. 
  •  फणस खाल्ल्याने वजन सुद्धा वाढते. 

फणस खाताना काय काळजी घ्यावी?

  •  तुम्ही फोडलेल्या फणसातून गरे काढून खाणार असाल तर फणसाचा चीक (दीख) बोटांना चिकटू नये म्हणून हातांना खोबरेल तेल लावावे. 
  •  गरे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण गरे खाऊन लगेच पाणी प्यायले असता अजीर्ण होते. 
  •  सूर्यास्तानंतर शक्यतो गरे किंवा फणसाचे इतर पदार्थ खाऊ नये.
  •  आवडतात म्हणून एका वेळी खूप गरे खाल्ले असता पोटात दुखू लागते, अस्वस्थ वाटते अश्यावेळी वेलची केळे खावे. 
  •  गरे पचायला जड, त्यामुळे गरे नीट पचावे यासाठी गरे खाल्ल्यावर ओले खोबरे खावे.

फणसाच्या बिया सुद्धा पौष्टिक असतात बरं....आपल्याकडे या आठळ्या आमटीत, भाजीत घातल्या जातात. उकडून, सोलून सुद्धा खाल्ल्या जातात. खूप जास्त खाल्ल्या तर गॅसेस होतात म्हणून आठळ्या खाल्ल्या की २- ३ चिमूट ओवा चावून खावा आणि घोट घोट गरम पाणी प्यावे. 

तुमच्यापैकी कोणाचा वाढदिवस उन्हाळ्यात असेल तर नेहमीचा चॉकलेट केक न आणता यावेळी फणसाचे रसाळ गरे, रवा, गूळ, वेलची पूड, काजू घालून केक बनवून घ्या आणि उन्हाळ्यातील सुपरफूड असलेल्या फणसावर ताव मारा.


-वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य