दयाळू पांडुरंग... जनीसंगे गे कांडुक लागे...

ह्या ओव्या रचणारी व्यक्ती, विठ्ठल आणि जनाबाईचे नाते रचणारी व्यक्ती, विठ्ठल आणि जनाबाईच्या नात्याला समजून घेणारी रुक्मिणी रंगविणारी व्यक्ती कदाचित ग्रंथ पुस्तके अभ्यासलेली नसणार. पण त्या व्यक्तीने आयुष्य नक्कीच अभ्यासलेले असणार. म्हणूनच सर्वसामान्यपणे न दिसणारी विचारांची व्याप्ती तिच्या ओव्यांमधून दिसून येते.

Story: भरजरी |
5 hours ago
दयाळू पांडुरंग...  जनीसंगे गे  कांडुक लागे...

हिंदू संस्कृतीमध्ये देवाविषयी भीती वाटत नाही. आपल्या देवाविषयी मनात कधी असतो आदरयुक्त धाक. कधी असते लेकुरवाळ्या देवाप्रती मूल होऊन केलेला लडिवाळ. तर कधी असते जिवलग मैत्री. म्हणूनच संत महात्म्यानी म्हटले आहे,

जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण 

लोकसंस्कृतीमध्ये नारायण हा विठ्ठलाच्या रूपामध्ये प्रत्येक ओवीमधून दर्शन देत असतो. घरणीबाईच्या मनामध्ये नांदत असतो. घरणीबाई स्वतः संत जनाबाई होऊन आपल्या विठ्ठलाशी एकरूप होत गात असते.

जनीच्या देऊळात
एकटी जनी काणी
दोघी नारीचो पार वाजे
दयाळू पांडुरंग
जनीसंगे गे कांडुक लागे

आपल्या काबाडकष्टाने भरलेल्या आयुष्यात विठ्ठलाचे नामस्मरण म्हणजे तिच्यासाठी रखरखत्या वाळवंटात चालताना झालेला थंड पाण्याचा शिडकाव होय. आपल्या ओव्यांमधून ती वारंवार विठ्ठलाचे नाव घेत राहते. नामदेवाच्या घरी दासी बनून राहिलेली संत जनाबाई  नामदेवाच्या घरी दळण कांडण करीत असे. प्रत्येक कष्टाचे काम करीत असे. ही कष्टाची कामे करत असताना आपल्या मनातून विचारातून ती विठ्ठलाशी एकरूप झालेली असे. ही  तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती  की जनीच्या हातावरला फोड विठ्ठलाच्या हातावर उमटू लागला. तिला होणाऱ्या कष्टांच्या यातना देवाच्या अंगावर दिसू लागल्या. स्वतः जनीमय झालेली घरणीबाई जनीच हे भाग्य आठवून म्हणत असे.

जनीच्या देऊळात
एकटी जनी काणी
दोघी नारीचो पार वाजे
दयाळू पांडुरंग
जनीसंगे गे कांडुक लागे
जनीच्या देऊळात
एकटी जणी दळी
दोन नारीचो टाळो वाजे
दयाळू पांडुरंग 

जनीच्या देवळामध्ये जनी एकटीच कांडत असताना दोन नारीचा पार म्हणजे हातातील तोडे वाजत आहेत.  कदाचित देव पांडुरंग जनीच्या मुसळाला हात लावून तिला काढण्यात मदत करीत आहे. त्यामुळे हे दुसरे तोडे कोणाचे असतील तर ते दयाळू पांडुरंगाचे असतील. जात्यावर कांडत बसलेली जुनी ओवी गात असताना दोन माणसांचे आवाज ऐकू येत आहेत. हा दुसरा आवाजही दयाळू पांडुरंगाचा आहे जो जनीला मदत करायला तिच्यासोबत जाते ओढत आहे. 

या ओव्या गाताना घरणीबाईला जनीबाईच्या भाग्याचा कदाचित हेवाही वाटत असेल. अशावेळी तिच्या मनात विचार येतो की मला जर जनीच्या भाग्याचे एवढा हेवा वाटत आहे तर रुक्मिणी देवीला किती हेवा वाटत असेल. रुक्मिणी देवीच्या भावना देखील ती समजून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्या ओव्यांमधूनच व्यक्त होते,

ऊपर माळये वरी
विठू देव तो शिवा चोळी
रुक्मिण विचार करी
चोळी शिवान केल्यात काई
शिवान केल्यात काई

माळीवर बसून देव विठ्ठल चोळी शिवत होता. ही चोळी कदाचित आपल्यासाठी असेल असे रुक्मिणीला वाटले. पण अचानक ती चोळी नाहीशी झाली. हे पाहून रुक्मिणी देवी चकित झाली. ती विचार करू लागली की देवाने शिवलेली चोळी काय झाली? आपल्या भक्तांचा मेळा घेऊन नांदणाऱ्या विठ्ठलावर रुक्मिणी देवीचा अंमळ रागच होता. कारण त्यामुळे विठ्ठल फक्त तिचाच न राहता अनेक भक्तामध्ये विभागून गेला होता. विठ्ठलाने स्वतःच्या हाताने शिवलेली चोळी तिला तर दिलीच नाही शिवाय घरातही सापडत नाही अशावेळी रुक्मिणी विचारते की तुम्ही शिवलेली चोळी काय केली? तिच्या या प्रश्नाचे उत्तर विठ्ठल मात्र तेवढ्याच भोळेपणाने देत म्हणतो,

वेडे गे रुक्मिणी
जानीबाईला जाया दिली
बाईला जाया दिली

आपण ती चोळी जनाबाईसाठी शिवली होती आणि ती तिलाच दिली. अशावेळी स्त्री सुलभ रुक्मिणी नाराज होते. तिला विठ्ठल आणि जनाबाईच्या नात्याचा संशय येतो. पण आपल्या स्वामीला जाब कसा विचारणार? असा विचार करून ती लाडात येऊन विठ्ठलाची सेवा करत, त्याच्या पायाला थंडगार लोणी लावत त्याला प्रश्न करते,

विठ्ठलाच्या पायाक
रुक्मिण लाई लोणी
सत्य या बोला स्वामी
जनी तुमची आहे कोण

जनी तुमची कोण आहे हे मला खरे खरे सांगा असे विचारतात विठ्ठल रुक्मिणीला सांगतात की जनी माझी बालपणीची जिवलग मैत्रीण आहे जिची मैत्री आजही मला तेवढीच प्रिय आहे. तू माझी अर्धांगिनी बनून माझ्या तरुणपणात माझ्या आयुष्यात आली आहेस. पण माझ्या लहानपणापासूनच्या जीवनाची साक्षीदार माझी मैत्रीण जनी आहे आणि ती मला तुझ्या एवढीच प्रिय आहे असे सांगत पांडुरंग म्हणतात,

वेडे गे रुक्मिणी
बालपणीची मैतरीन

मैत्री कशी असावी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारातील त्यांनी ठेवलेल्या आपल्या मित्राचा सन्मान होय. कधी श्रीराम होऊन मारोतरायाला आपल्या हृदयाशी कवटाळतात. कधी श्रीकृष्ण होऊन सुद्धा मला प्रति द्वारका बांधून देतात. आणि कधी विठ्ठल होऊन जनाबाईला अगदी आपल्या मनाच्या आनंद लहरी येणाऱ्या नाजूक कप्प्यात ठेवतात. तिच्यापुढे कधी कधी रुक्मिणी देवीलाही पडते घ्यावे लागते. ही अशी मैत्री घरणीबाई आपल्या आयुष्यातही असावी अशी सुप्त इच्छा मनात बाळगून ती इच्छा जणू ओवी रूपाने गात असते. 

आपल्या समाजाने स्त्री-पुरुष मैत्री सहजपणे कधी मान्य केलेली नाही. स्त्री-पुरुषांची मैत्री ही नेहमी संशयाच्या विळाख्यात सापडलेलीच दिसून येते. या संशयाच्या विळाख्याला तडा देण्याचे काम घरणीबाई आपल्या ओव्या मधून करते. प्रत्यक्ष देव विठुराया आणि साधी दासी जनाबाई जिवलग मित्र मैत्रिणी असू शकतात. सुखदुःखात एकमेकांचे सोबती होतात तर मग आमच्यासारखे सामान्य स्त्री-पुरुष जिवलग मित्र मैत्रिणी होऊ शकत नाहीत का?  असा प्रश्न विचारत मानवी संशयी वृत्तीवर मार्मिकपणे बोट ठेवण्याचा प्रयत्न करते. 

ह्या ओव्या रचणारी व्यक्ती, विठ्ठल आणि जनाबाईचे नाते रचणारी व्यक्ती, विठ्ठल आणि जनाबाईच्या नात्याला समजून घेणारी रुक्मिणी रंगविणारी व्यक्ती कदाचित ग्रंथ पुस्तके अभ्यासलेली नसणार. पण त्या व्यक्तीने आयुष्य नक्कीच अभ्यासलेले असणार. म्हणूनच सर्वसामान्यपणे न दिसणारी विचारांची व्याप्ती तिच्या ओव्यांमधून दिसून येते. 


गाैतमी चाेर्लेकर गावस