जत्रा, नाटकांतीलही गर्दी, गैरव्यवस्थापन परवडणारे नाही

भविष्यात शिरगावसह अन्य जत्रेतील गर्दीचाही विचार व्हायला हवा. नागरिकांची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक ठरते.

Story: कॉलिंग अटेंशन |
9 hours ago
जत्रा, नाटकांतीलही गर्दी, गैरव्यवस्थापन परवडणारे नाही

शिरगावची लईराईची जात्रा, हा गोव्यातीलच नव्हे तर संंपूर्ण कोकणातील प्रमुख उत्सव आहे. या जत्रेसाठी धोंडांबरोबर इतर भाविकही मोठ्या संंख्येने उपस्थिती लावतात. यामुळे इतर कोणत्याही जत्रेपेक्षा शिरगावच्या जात्रेला गर्दी प्रचंंड असते. दरवर्षी ही जत्रा होते व दरवर्षी गर्दीही होते. धार्मिक विधींचे व्यवस्थापन देवस्थान समिती करीत असते. यंंदा मात्र जत्रेच्या मध्यरात्री अकल्पित अशी दुर्घटना घडली. भाविकांमध्ये चेंंगराचेंंगरी होऊन यात सहा भाविकांचा मृत्यू झाला. ही चेंंगराचेंंगरी इतकी भीषण होती की सत्तरहून अधिक भाविक जखमी झाले. या दुर्घटनेमुळे संंपूर्ण गोव्यावर शोककळा पसरली. या घटनेची दखल पंंतप्रधान मोदींंसह राष्ट्रपतींनासुद्धा घ्यावी लागली. एका जत्रेत चेंंगराचेंंगरीमुळे सहा जणांचा मृत्यू होणे, ही गंंभीर घटना आहे. ही घटना का घडली? दोष कोणाचा? चेंंगराचेंंगरी कशामुळे झाली? या प्रश्नांची उत्तरे चौकशी समितीच्या अहवालात मिळतील. घटनेला आठवडा उलटण्यापूर्वी चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. अहवालावर पक्षपाताचा वा अपूर्णतेचेही आरोप होतील. यामुळे येणाऱ्या काळात अहवालातील निष्कर्षांंवर बरीच चर्चा होणार आहे.

शिरगावच्या जत्रेत लाखो लोक जमतात. तसेच ते यावेळीही जमले होते. वाहतूक व्यवस्थेबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शेकडो पोलिसांची व्यवस्था केली जाते. यावेळीही होती. लईराई देवीचा परिसर लहान आहे. रस्ताही अरूंंद आहे. जत्रेच्या दुकानामुळे भाविकांंना चालण्यासाठी वा हालचालींसाठी आवश्यक अशी जागा मिळत नाही. दरवर्षीचीच ही समस्या आहे. तरीही यंदाच चेंंगराचेंंगरी का झाली? अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे भाविक वा धोंडांमध्ये पळापळ सुरू झाली? हाच खरा प्रश्न आहे. 

भाविकांमध्ये झटापट झाल्याने वा धावपळ झाल्यामुळे चेंंगराचेंंगरी झालेली आहे. चेंगराचेंंगरी सुरू असताना भाविकांना थोपविणे पोलिसांना शक्य झाले नाही. यामुळे गर्दीचे नियोजन करण्याचा अभाव व आपत्कालीन स्थितीचा विचार करून यंंत्रणा सजग नव्हती, हे सिद्ध होते. या घटनेनंंतर सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांंसह पोलिसांंच्याही बदल्या केल्या आहेत. बदल्या केल्या म्हणजे त्यांच्यावर कारवाई केली असे म्हणता येणार नाही. चौकशी समितीच्या अभ्यासानंतर दोषींवर कारवाई सुद्धा होईल. परंंतु कारवाई केल्याने सहा निष्पापांचे जीव काही परत येणार नाहीत. तसेच जखमींना सहन कराव्या लागलेल्या यातनांवरही तो इलाज ठरणार नाही. या दुर्घटनेपासून प्रशासन, पोलीस, देवस्थान समित्या तसेच सरकारने बोध घेण्याची गरज आहे. देवस्थान कायद्यात दुरूस्ती करण्याचाही विचार या अनुषंगाने आला आहे. आवश्यकता भासल्यास देवस्थान कायद्यात दुरूस्ती व्हायला हरकत नाही. सरकारकडे इच्छाशक्ती असेल तर अधिवेशनात कायदा दुरूस्ती करणे अशक्य नाही. तरीही एका गोष्टीकडे येथे ध्यान देण्याची गरज आहे. शिरगाव जत्रेच्या आयोजनात देवस्थान समिती महत्त्वाचे निर्णय घेत असली तरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शेकडो पोलीस होतेच. दरवर्षी ते असतात. तसेच वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग तसेच सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी, पोलीस, मामलेदार यांच्या समितीबरोबर बैठका होतात. सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाते. सार्वजनिक कार्यक्रमात वा मोठ्या सभेत कायदा सुव्यवस्था, सुरक्षा राखण्याची जबाबदारी पोलीस व प्रशासनावर असते. शिरगावच्या जत्रेबाबतही असेच म्हणावे लागेल. देवस्थान समितीने योग्य ते उपाय सुचविण्याबरोबर पोलीस, प्रशासनाला सहकार्य करायला हवे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे वा कायदा सुव्यवस्था राखणे ही काही देवस्थान समितीची जबाबदारी असू शकत नाही.

शिरगावची जत्रा ही राज्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. अन्य जत्रा वा काल्यांना लाखभर लोक जमत नाहीत. शिरगावच्या जत्रेतच ते जमतात. शिरगावच्या जत्रेप्रमाणे जांंबावलीचा गुलालोत्सव, मारूतीगड जत्रा, साखळीचा चैत्रोत्सव, डिचोलीतील नवा सोमवार, फातर्पा जत्रेलाही बरीच गर्दी असते. इतर गावातही रात्रीच्यावेळी जत्रा, नाटके होत असतात. तेथेही गर्दी असते. जांंबावलीचा गुलालोत्सव वा फातर्पा येथील जत्रेतसुद्धा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासनाने उपाययोजना करायला हव्यात. 

शिरगाव जत्रेतील दुर्घटनेची इतर ठिकाणी पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री देता येत नाही. पुनरावृत्ती होऊ नये, असे व्यवस्थापन करायला हवे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला देवळे आहेत. रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटली जातात. तेथेच नाटके होतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. जत्रा, नाटके निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मामलेदारांनी देवस्थान समित्या वा पंचायत/नगरपालिकेशी चर्चा करून उपाययोजना आखायल्या हव्यात. आवश्यक असा पोलीस फौजफाटा ठेवायला हवा. अपघात वा दुर्घटना घडली तर तत्काळ मदत पोहचेल, अशी यंत्रणा असायला हवी. जत्रा वा नाटकाच्या ठिकाणी बऱ्याचदा भांडणेसुद्धा होतात. भांडणांमुळेही अनर्थ घडू शकतो. वाहनांचे पार्किंग व दुकाने थाटण्याबाबत काही तरी व्यवस्थापन करायला हवे. बऱ्याचदा दुकाने रस्त्याला टेकून उभी केली जातात. ती योग्य ठिकाणी थाटली जायला हवी. यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी व्हायला हवीत. एखादा अपघात वा दुर्घटना घडली की प्रशासनाला जाग येते. यानंतर आवश्यक ते उपाय केले जातात. भविष्यात शिरगावसह अन्य जत्रेतील गर्दीचाही विचार व्हायला हवा. नागरिकांची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक ठरते.


गणेश जावडेकर
(लेखक भांंगरभूंंयचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)