सध्याच्या विद्यार्थी पिढीत निरनिराळे शारीरिक व मानसिक विकार आढळून येताना दिसतात व याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अधोगती होताना दिसते. ह्या सगळ्या समस्यांचे निवारण म्हणजे ‘ब्रह्मचर्य’.
विद्यार्थी जीवनाचा पल्ला हा पुढील जीवनाचा पाया असतो. जसा घराचा पाया सक्षम नसेल तर घर कोसळते तसेच जर का विद्यार्थी जीवन सक्षम नसेल तर माणसाच्या पुढील जीवनाची प्रगती नष्ट होते. सध्याच्या विद्यार्थी पिढीत निरनिराळे शारीरिक व मानसिक विकार आढळून येताना दिसतात व याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अधोगती होताना दिसते. ह्या सगळ्या समस्यांचे निवारण म्हणजे ‘ब्रह्मचर्य’.
पुरातन काळात ब्रह्मचर्य माणसाच्या जीवनाचा पहिला टप्पा होता. पुरातन काळातील विद्यार्थी गुरुकुलमध्ये आपल्या गुरुसोबत निवास करून कठोर ब्रह्मचर्य पालन करीत असे आणि याचमुळे त्यांना कधीही शारीरिक व मानसिक विकार होत नसे.
पण आजच्या या पिढीला ‘ब्रह्मचर्य’ च्या ज्ञानाचा विसर पडला आहे. लोकांच्या मनात ब्रह्मचर्यच्या बद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. ब्रह्मचर्य म्हणजे योगशास्त्राने विद्यार्थ्यांसाठी रचलेली योगीक जीवनशैली. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपल्या मनावर, इंद्रियांवर संयम ठेवणे व पवित्र कामात आपले मन लीन करणे. योगशास्त्राने विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्य पालन करण्याचा आदेश दिला आहे.
ब्रह्मचर्याची तत्वे :-
यमः योगशास्त्राने विद्यार्थ्यांना काही नैतिक बंधने घातली आहे. याच्यात विद्यार्थ्यांनी कोणती कृत्ये करू नये हे सांगितले आहे. ही नैतिक बंधने म्हणजेच 'यम'.
१) अहिंसाः मनाने, शरीराने, शब्दांनी कुणालाही हिंसा होईल असे वर्तन न करणे, हा पहिला यम.
२) सत्य : विद्यार्थ्यांने नेहमीच मन, वचन आणि कर्म याने सत्याची साथ देणे अनिवार्य.
३) अस्तेय : आपल्याला जे काही हवे आहे ते स्वबळावर मिळवावे, कुणाचीही वस्तु मागू नये, चोरू नये, मनात स्वार्थाला जागा देऊ नये.
४) पवित्रता : नेहमीच दुसऱ्याला पवित्रतेच्या भावनेने पहावे, कधीही मनात वासनेला जागा देऊ नये. कामुक दृश्ये पाहू नये.
५) धृती: कोणत्याही वाईट परिस्थितीत स्वतःचे ध्येय सोडू नये, शौर्याने आव्हानांचा सामना करणे म्हजेच धृती.
नियम : योगशास्त्रात विद्यार्थ्यांसाठी सांगितलेली वतर्ने म्हणजे ‘नियम’. याच्यात विद्यार्थ्याने काय करावे याची सूची आहे.
१) तपः आपले ध्येय हिच आपली तपस्या. आपल्या ध्येयासाठी निरंतर ज्ञान अर्जित करणे, स्वतःच्या ध्येयाकडे समर्पित राहणे, मौज-मस्तीच्या गोष्टींपासून लांब राहाणे हीच विद्यार्थ्यांची तपस्या होय.
२) मिताहार : विद्यार्थ्याने संपूर्ण संतुलित, सात्विक आणि शाकाहारी आहार घ्यावा. ज्यामुळे शरीर निरोगी राहिल.
३) शौच : यौगिक क्रियांच्या आधारे नित्यनेमाने स्वतःच्या मनाचे व शरीराचे शुध्दीकरण करावे. स्वतः बरोबरच निसर्ग स्वच्छतेची काळजी घ्यावी.
४) विवेक : एका विद्यार्थ्यांने वीर, पराक्रमी, ज्ञानी लोकांच्या चरित्राचा अभ्यास करावा, निती- अनीतीचे ज्ञान अर्जित करावे याने योग्य-अयोग्य ओळखण्याची क्षमता विकासित होईल.
५) ईश्वर प्रणिधान : एका विद्यार्थ्याने आपली सर्व कर्मे ईश्वराला समर्पित करावी ज्यामुळे मनात अहंकार जागणार नाही. नाम- जपाव्दारे ईश्वर भक्ती करावी.
प्राणायाम: विद्यार्थ्यांनी अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती प्राणायाम करावे ज्यामुळे शरीरातील ७ चक्रे सक्रिय होतील.
आसन : विद्यार्थ्याने नियमित सूर्यनमस्कार, अनेक प्रकाराच्या आसनांचा अभ्यास करावा, जेणेकरून शारिरीक बळ वाढेल.
ध्यान: दररोज ध्यान करावे जेणेकरून स्वतःच्या अंतर-आत्म्याशी विद्यार्थी जोडाला जातो आणि मनात स्थिरता येते.
आपद धर्म:-आधुनिक कालच्या विद्यार्थ्यांना अनेक विकट परिस्थितींचा सामना करावा लागतो आणि काही वेळा वरील यम-नियमांचे पालन करणे शक्य नसते. तेव्हा विद्यार्थी आपद धर्माच्या अनुसार कोणताही यम-नियम मोडू शकतात याने ब्रह्मचर्य खंडित होणार नाही.
ब्रह्मचर्याचे फायदे:-
१) ब्रह्मचर्य विद्यार्थ्यांना उत्तम चरित्र, आकर्षक व्यक्तिमत्त्व, निरोगी, शक्तीशाली व तेजस्वी शरीर प्रदान करते.
२) एका ब्रह्मचारी विद्यार्थ्याचे आत्मबल इतके असते की प्रत्येक ठरवलेली गोष्ट यशस्वीपणे पार पडते.
३) कठोर ब्रह्मचर्य पालन केलेल्या विद्यार्थ्यांना कुशाग्र बुद्धी, मानसिक स्पष्टता, उत्तम एकाग्रता, धाडस, दया, विवेक, प्रामाणिकता, उत्तम आवाज, असे गुण प्राप्त होतात.
प्रतीक्षा राजेश खेडेकर