चिकाटीने नेतृत्व सांभाळणारी मधमाशी

मधमाश्यांसारख्या प्रजाती जगवणं बंधनकारकच... जर मधमाश्यांनी परागीकरण केले नाही, तर माणूस जातीसाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक वनस्पती कुठून पुनरुत्पादित होणार? आणि म्हणूनच, स्वतः जगायच असेल तर आपल्याला इतर प्रजातींना जगवणं बंधनकारक आहे.

Story: साद निसर्गाची |
7 hours ago
चिकाटीने  नेतृत्व सांभाळणारी मधमाशी

मधमाशी हा कीटक अन्न साखळीतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. फुलातील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करणे हे मधमाश्यांचे मुख्य काम. मधमाशी परागीभवनाद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करते. फळ धारणेसाठीही मधमाशी अत्यंत उपयोगी आहे. 

या मधमाश्यांची जीवन‌ जगण्याची पद्धतसुद्धा अद्भुत व अद्वितीय असते. प्रत्येक मधपोळ्यात एक राणी माशी, काही नर माश्‍या व अनेक कामगार माश्‍या असतात. राणी माशी आकाराने सर्वांत मोठी असते. एका मधपोळ्याची केवळ एक राणी माशी. कामगार माश्‍यांपेक्षा आकाराने दुप्पट असणारी ही राणीमाशी मधपोळ्याची प्रमुख असते. राणी माशीचे काम केवळ अंडी देणे इतकेच. ती दिवसाला २०००-३००० अंडी देऊ शकते. 

ही अंडी फलित किंवा अफलित असु शकतात. फलित अंड्यातून इतर राणीमाशी व कामगार माश्‍यांचा जन्म होतो. अफलित अंड्यापासून नर माश्‍यांचा जन्म होतो. फलित अंड्यांपासून जन्माला येणाऱ्या अळ्यांपैकी राणी माशी जन्माला येते. अशी अळी जिच्याकडे राणी होण्याची क्षमता आहे तिला भरपूर पौष्टिक अन्न पुरवले जाते. या अन्न पुरवठ्याला ‘रॉयल जेली’ असे म्हणतात. एका मधपोळ्यात दोन राणीमाश्या कधीच वास्तव करत‌ नाही. राणीमाशी‌ असलेल्या मधपोळीत जन्माला आलेली दुसरी राणीमाशी‌ ते मधपोळे त्याग करते व दुसऱ्या ठिकाणी स्वतःचे स्वतंत्र मधपोळे बांधते. यावेळी काही नर माशा व कामगार माशा तिच्यासोबत जातात. ही प्रक्रिया अशीच सुरू राहते. 

अशाप्रकारे मधमाश्या आपले कुटुंब वाढवतात.

फलित अंड्यांमधून निर्माण झालेल्या अळ्या सारख्याच असतात, परंतु त्यातील एका अळीला पौष्टिक खाद्य (रॉयल जेली) दिल्यामुळे तिची वाढ इतर अळ्यांपेक्षा दुप्पट वेगाने होते. अशा प्रकारे नवीन राणी माशी जन्माला येते. उर्वरित अळ्यांना दुय्यम दर्जाचे व अपुरे अन्न दिल्यामुळे त्यांची वाढ होत नाही. अशा अळ्यांतून कामगार माश्‍या जन्म घेतात. कामगार माश्यांना दंश करणारी नांगी असते. मध गोळा करताना शत्रूपासून असलेल्या संभाव्य धोक्यापासून स्वतः चे रक्षण‌ करण्यासाठी कामगार माश्या दंश नांगी वापरतात. राणीमाशी व नर माशीला दंश नांगी नसते.

नर माशी ही राणी माशीपेक्षा आकाराने लहान पण कामगार माशीपेक्षा आकाराने मोठी असते. राणी माशीसोबत मिलन करणे हे नर माशीचे मुख्य काम. नर माशी मधपोळ्यातील तापमान मर्यादित ठेवण्याचेही काम करते. राणीमाशीशी मिलन केल्यानंतर नरमाशी मृत्युमुखी पडते. मिलनादरम्यान नर माशी आपली संपूर्ण ऊर्जा राणीमाशीकडे हस्तांतरीत करते. यामुळे मिलनानंतर नरमाशी मृत्युमुखी पडते. 

एका मधपोळ्यात एक राणी माशी, ३०० ते ७०० नर माश्या तर १००० हून जास्त कामगार माश्या असतात. राणीमाशीने घातलेल्या फलित अंड्यांपासून कामगार माश्‍या जन्माला येतात. शत्रूपासून मधपोळ्याचे रक्षण करण्याचे काम प्रामुख्याने कामगार माश्‍या करतात. जन्मावेळी कामगार माश्‍यांना अपूरा व पौष्टिक अन्नाचा पुरवठा न केल्याने त्यांच्या जननेंद्रियांची पूर्ण वाढ झालेली नसते. त्यामुळे त्या नर माशीसोबत मिलन करू शकत नाहीत. मधपोळे बांधणे, मकरंद गोळा करणे, राणी माशी तयार करणे, परागीकरण, अन्नसाठा शोधणे, राणी माशीला पौष्टिक अन्नाचा पुरवठा करणे, तिची काळजी घेणे, मधपोळ्याचे संरक्षण करणे, नर व इतर कामगार माश्‍या तयार करणे इत्यादी कामे कामगार माश्‍या करत असतात. कामगार माश्‍यांचे आयुष्यमान ६ ते ८ आठवडे इतके असते. राणी माशी ५ वर्षांपर्यंत जगू शकते.

काही कारणामुळे जर राणी मधमाशी मरण पावली तर कामगार मधमाश्या आपत्कालीन प्रक्रियेद्वारे नवीन राणी वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्या लगेच एक योग्य अशी अळी निवडतात व नवीन राणी बनवण्यासाठी तिला रॉयल जेली खायला देतात. जर राणी अचानक मरण पावली, तर मधमाश्या नवीन उदयास आलेल्या अळीपासून आपत्कालीन राणी वाढवण्याचा प्रयत्न देखील करू शकतात.

आज मधमाशांच्या अस्तित्वाला मानवी वर्तनामुळे धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे मधमाशांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. आग लावून मधपोळी जाळणे, कीटक नाशकांची फवारणी करणे, मधमाश्यांविषयी चुकीची माहिती पसरविणे यासारख्या कारणांमुळे ह्या किटकांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. यावर मधमाशी पालन व्यवसाय एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मधमाशांच्या पालनामुळे मध, मेण तर मिळेलच त्याचबरोबर मधमाशांच्या आधारे विविध पिकांची गुणवत्ताही सुधारता येईल.

निसर्गातील मधमाशीचे महत्त्व जाणून दरवर्षी २० मे रोजी‌ जागतिक ‌मधमाशी दिवस साजरा केला जातो. मधमाश्या आणि परागकणांची परिसंस्थेतील भूमिका लोकमानसात पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २०२५ मध्ये, "पोषण देणाऱ्या निसर्गाने प्रेरित मधमाश्या" या थीम अंतर्गत, जागतिक मधमाशी दिन साजरा केला जाईल. हा दिवस परिसंस्थेच्या पुनर्संचयित, जैवविविधता संवर्धन व अन्न सुरक्षा आणि पोषणात मधमाश्या आणि परागकणांचे महत्त्व या भूमिकांवर प्रकाश टाकेल.

आज जगभरात मधमाश्यांची संख्या घटत चालली आहे. मधमाश्या जगण्यासाठी फुलांच्या रसावर अवलंबून असतात. तसं पहायला गेल्यास आपण जगण्यासाठी मधमाश्यांवर अवलंबून असतो. तुम्ही म्हणाल कसं? तर विचार करा. जर मधमाश्यांनी परागीकरण केले नाही, तर माणूस जातीसाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक वनस्पती कुठून पुनरुत्पादित होणार? आणि म्हणूनच, स्वतः जगायच असेल तर आपल्याला इतर प्रजातींना जगवणं बंधनकारक आहे.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)