सावर्डे : चांदीमळ-कष्टी येथील चिरेखाणीत रसायनांनी भरलेल्या बॅरलचा स्फोट

कचऱ्यामुळे पसरली आग. कुडचडे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
सावर्डे : चांदीमळ-कष्टी येथील चिरेखाणीत रसायनांनी भरलेल्या बॅरलचा स्फोट

पणजी : सावर्डेतील चांदीमळ-कष्टी येथील एका बंद पडलेल्या चिरेखाणीत आज दुपारी रसायनांनी भरलेल्या बॅरलचा स्फोट होऊन मोठी आग लागली. ही चिरेखाण पूर्वीपासून रुग्णालयांतील बायोमेडिकल वेस्ट आणि इतर ठिकाणचा रासायनिक कचरा टाकण्यासाठी वापरली जात होती, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. 

स्फोटानंतर येथील रासायनिक कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला असून, जवळच्या गावांपर्यंत आग पसरू नये म्हणून कुडचडे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन बंब तैनात करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि रसायनांचा प्रकार अद्याप स्पष्ट झालेला नाही. परंतु, या चिरेखाणीत रासायनिक बॅरल्स अनधिकृतपणे साठवले जात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची गंभीरता लक्षात घेता, पर्यावरण विभाग, वन विभाग आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संयुक्त तपास सुरू केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराची चौकशी करून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा