लईराई देवस्थान अध्यक्षांचा दावा; देवस्थान समितीवरील आरोप फेटाळले
देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी विद्यमान समितीवर प्रसार माध्यमाद्वारे केलेले आरोप पूर्णपणे दिशाहीन असून त्यात कसलेच तथ्य नाही, असा दावा श्री लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर, भास्कर गावकर, आतिष गावकर, दयानंद गावकर व इतर समिती पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी वासू गावकर, महादेव गावकर, प्रकाश गावकर, सुभाष गावकर, विश्वंभर गावकर, उपेंद्र गावकर, बाबुसो गावकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
आमच्या नवीन समितीने २ एप्रिल रोजी ताबा घेतला. खरेतर त्यापूर्वी कार्यरत असलेल्या कमिटीने देवस्थानच्या जत्रोत्सवासंदर्भात आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा करणे व पत्रव्यवहार करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी त्या संदर्भात काहीही भूमिका घेतली नाही. आम्ही तातडीने प्रशासनाशी पत्रव्यवहार करून २ एप्रिल रोजी मामलेदारांना पत्र दिले. त्यानंतर बैठका घेण्यात आल्या. ३० रोजी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक घेतली. पत्रव्यवहार करूनही बैठकीला काही अधिकारी आलेच नाहीत, असे गावकर यांनी सांगितले.
त्या बैठकीत आम्ही एक्झिट, एंट्री पॉईंट तसेच हॉटस्पॉट संदर्भात सर्व प्रकारची माहिती दिली होती. गेल्या वर्षी त्याच ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला होता, तेथे एका रस्त्यालगत भिंत असून ती हटवावी, अशी मागणी त्यावेळी केली होती. मात्र त्याबाबत काहीच झाले नाही. पंचायतीने काढलेल्या नोटिसीप्रमाणे उपाययोजना होणे अपेक्षित होते, पण त्याबाबत प्रशासनाकडून काहीशी दिरंगाई झाली. ज्या ठिकाणी अपघात घडला तेथे असलेली एक भिंत हटवण्याबाबत यापूर्वी कायदेशीर सोपस्कार केले होते, पंचायतीने नोटीसही काढली होती, मात्र त्याला स्थगिती आणण्यात आली. या संदर्भात पंचायत व प्रशासनाने पाठपुरावा केलेला नाही असे गावकर म्हणाले.
आक्षेप घेतल्यामुळे राज्य उत्सव दर्जा नाकारला!
राज्य सरकारने लईराई जत्रोत्सवाला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. मात्र आमच्या नवीन समितीने त्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले. राज्य उत्सव दर्जा देताना देवस्थानतर्फे महाजनांची बैठक घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते, त्यामुळे आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीत बहुतेकांनी राज्य उत्सव दर्जाला आक्षेप घेतला. आम्ही ताबा घेतल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही महाजनांची बैठक घेतली. त्यावेळी महाजनांनी राज्य दर्जाला आक्षेप घेतला होता.