नायजेरियन विद्यार्थ्याकडून १.६५ कोटींचे ड्रग्ज जप्त!

गुन्हा शाखेची मोठी कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
नायजेरियन विद्यार्थ्याकडून १.६५ कोटींचे ड्रग्ज जप्त!

पणजीः आराडी पर्रा येथे गुन्हा शाखेने टाकलेल्या छाप्यात एका २३ वर्षीय नायजेरियन विद्यार्थ्याकडून १.६५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याबाबत तेलंगणा नार्कोटिक्स ब्युरोकडून गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हिरू  कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आराडी पर्रा येथे सापळा रचत नानिएलुगो अबासिनी या नायजेरियन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध प्रकारचे मिळून १.६५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. 

याबाबत पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार आराडी पर्रा येथे सदर नायजेरियन विद्यार्थ्याकडून ड्रग्जचा व्यवहार होणार असल्याची माहिती तेलंगणा नार्कोटिक्स ब्युरोने गोवा गुन्हे शाखेला दिली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी सदर भागात सापळा रचत नानिएलुगो अबासिनी नामक २३ वर्षीय नायजेरियन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.

झडतीवेळी त्याच्याकडे १,१२३ ग्रॅम वजनाच्या २,४०० एक्स्टसी गोळ्या, ७ ग्रॅम कोकेन, ९९ ग्रॅम हेरॉईन आणि १९ ग्रॅम क्रिस्टल एमडीएमए आदी अमली पदार्थ आढळून आले. या अमलीपदार्थांचे बाजारभाव मूल्य १.६५ कोटी रुपये एवढे आहे. सदर विद्यार्थ्याला अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कलम २१(बी) आणि २१ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.  

हेही वाचा