पाकिस्तानचे नागरी वस्तीवर ड्रोन हल्ले
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पाकिस्तानने शुक्रवारी रात्री जम्मू-काश्मीरपासून राजस्थानपर्यंत १९ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. पोखरण आणि लेह येथील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. फिरोजपूरमध्ये एका घरावर ड्रोन पडल्याने एकाच कुटुंबातील तिघे भाजले. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चोख प्रत्युत्तर देताना काही ड्रोन पाडले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण काश्मीर खोऱ्यात ‘ब्लॅकआऊट’ करण्यात आला.
आरोग्य व्यवस्थेचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डांनी आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीत आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय तयारीची सद्यस्थितीची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. रुग्णवाहिका, वैद्यकीय उपकरणे, औषधे, रक्त पुरवठा आणि इतर वैद्यकीय वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करावे, असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बेड, आयसीयू आणि एचडीयू यासारख्या वैद्यकीय सेवांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यास त्यांनी सांगितले.
सेना प्रमुखांना तीन वर्षांसाठी सर्वाधिकार
संरक्षण मंत्रालयाने (सैन्य व्यवहार विभाग) प्रादेशिक सैन्याच्या १४ इन्फंट्री बटालियन सक्रिय करण्याचे आदेश देणारी महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. हा आदेश प्रादेशिक सैन्य नियम, १९४८ च्या नियम ३३ अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांनुसार जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत केंद्र सरकारने सेना प्रमुखांना आवश्यकतेनुसार प्रादेशिक सैन्याचे अधिकारी आणि सैन्य तैनात करण्याचे अधिकार दिले आहेत. ९ फेब्रुवारी २०२८ पर्यंत सेनाध्यक्षांकडे हे सर्वाधिकार असतील.
या अधिसूचनेनुसार, प्रादेशिक सैन्याच्या सध्याच्या ३२ इन्फंट्री बटालियनपैकी १४ बटालियन दक्षिण कमांड, पूर्व कमांड, पश्चिम कमांड, मध्य कमांड, उत्तर कमांड, दक्षिण पश्चिम कमांड, अंदमान आणि निकोबार कमांड आणि आर्मी ट्रेनिंग कमांड या क्षेत्रांमध्ये तैनातीसाठी सक्रिय केल्या जातील. ही तैनाती नियमित सैन्याला पाठिंबा देण्यासाठी किंवा पूरक भूमिकेत केली जाईल.
संरक्षण मंत्रालयाव्यतिरिक्त इतर मंत्रालयाच्या विनंतीवरून प्रादेशिक सैन्याच्या तुकड्या तैनात केल्या गेल्या, तर यासंदर्भातील खर्च त्या मंत्रालयाच्या बजेटमधून केला जाईल. हा आदेश १० फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल आणि तीन वर्षांसाठी लागू राहील. हा आदेश संयुक्त सचिव मेजर जनरल जी. एस. चौधरी यांनी जारी केला आहे, असे अधिसूचित करण्यात आले आहे.
तीन वर्षांसाठी जारी केलेल्या या आदेशावरून असे दिसून येते की, केंद्र सरकार अंतर्गत संसाधनांचे पुनर्गठन करून सुरक्षा दलांच्या तैनाती अधिक मजबूत करण्यासाठी गंभीर आहे. प्रादेशिक सैन्याच्या या भूमिकेमुळे केवळ नियमित सैन्यालाच दिलासा मिळणार नाही. तर विविध क्षेत्रांमध्ये त्यांची उपस्थिती प्रादेशिक सुरक्षादेखील मजबूत करेल.
सतर्कता आणि कारवाई
हरियाणातील अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन.
पंचकुलामध्येही सकाळी सायरन वाजवण्यात आले.
पंचकुलामध्ये दोन दिवस शाळा राहणार बंद.
पंजाब सीमेवरील सिरसा, फतेहाबाद, कैथल, जिंद, कुरुक्षेत्र आणि अंबाला येथे सुरक्षेत वाढ.
आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलिसांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. आपत्कालीन रजेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाबाहेर जाण्यास बंदी.
सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये २५ टक्के खाटा राखीव.
हिसार विमानतळावरील प्रवेश पूर्णपणे बंद.
गुजरातमधील कच्छ सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न. तीन ड्रोन पाडले.
गुजरातमधील १८ जिल्हे ‘हाय अलर्ट’वर.
भूज विमानतळ लष्कराच्या ताब्यात.
लष्कराशी संबंधित चुकीची माहिती पोस्ट केल्याबद्दल चौघाविरोधात गुन्हा.
तीन दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याचा नियंत्रण रेषेवर गोळीबार. यामध्ये ५ मुलांसह एकूण १७ नागरिकांचा मृत्यू.
गोळीबारामुळे अनेक इमारती आणि वाहनांचेही नुकसान.
देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. घाबरून खरेदी करू नका, तेल कंपन्यांचे आवाहन.
देशात धान्याचा पुरेसा साठा असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहानांकडून स्पष्ट.
पंतप्रधानांनी घेतली तिन्ही लष्कर प्रमुख आणि सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत बैठक.
राजस्थानमधील जैसलमेर, बारमेर, श्रीगंगानगर, बिकानेर आणि फलोदी जिल्ह्यांमध्ये ‘हाय अलर्ट’.
जैसलमेर आणि बाडमेरमधील बाजारपेठा सायं. ५ वा. बंद.
दिल्लीत ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा वाढवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही देखरेख.