ओला इलेक्ट्रिक वाहन कंपनीला ग्राहक मंचाकडून दणका

सदोष दुचाकीबद्दल ग्राहकाला १.४५ लाख देण्याचे आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
ओला इलेक्ट्रिक वाहन कंपनीला ग्राहक मंचाकडून दणका

पणजी : उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकतेच ओला इलेक्ट्रिक वाहन निर्मित कंपनीला दणका दिला आहे. कंपनीच्या विरोधात आलेल्या तक्रारीच्या सुनावणीनंतर आयोगाने कंपनीला ग्राहकाला वाहनाची पूर्ण रक्कम म्हणजेच १ लाख १० हजार ४९५ रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सदोष वाहनामुळे झालेल्या त्रासाबद्दल ३० हजार रुपये आणि न्यायालयीन खर्चाचे १५ हजार रुपये देखील देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठलापूर-साखळी येथील तीर्थराज पुंडलिक पुजारी यांनी जानेवारी २०२४ ओला एस १ एक्स प्लस हे वाहन पर्वरी येथील शोरुममधून खरेदी केले होते. खरेदीच्या दुसऱ्याच दिवशी वाहनात बिघाड झाल्याने त्यांनी कंपनीकडे तक्रार नोंदवली. वाहन दुरुस्तीसाठी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला. असे असले तरी काही दिवसातच त्या वाहनात पुन्हा बिघाड निर्माण झाला. या प्रकरणी पुढच्या वर्षभरात नऊ तक्रारी करण्यात आल्या.
मात्र प्रत्येक वेळी वाहन अनेक दिवस सर्व्हिस सेंटर येथे पडून राहायचे. मागील चार महिन्यांपासून वाहन नादुरुस्त अवस्थेत वाळपई येथे पडून आहे. याबाबत पुजारी यांनी ओला सदोष वाहन बदलून देण्याची केलेली विनंती केली. मात्र याचीही दाखल घेण्यात आली नाही. यानंतर पुजारी यांनी अॅड. विराज बाक्रे यांच्या मार्फत उत्तर गोवा ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार दाखल केली. यानंतर ग्राहक मंचाच्या अध्यक्षा बेला नाईक, सदस्य ओरोलीयानो दी ओलीवेरा आणि रेजिथा राजन यांनी हा आदेश दिला आहे.