पोलीस अधीक्षकांचा दावा : संबंधित पोलीस उपनिरीक्षक निलंबित, चौकशी सुरू

मडगाव : मद्यपान करून दंगा करत असल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या एडबर्ग परेरा नावाच्या युवकाला झालेल्या दुखापत प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिरवईकर यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली आहे.
नावेली येथे मद्यधुंद अवस्थेत एडबर्ग परेरा हा युवक दंगामस्ती करत होता. याबाबत मडगाव पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जात त्यांनी परेराला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही सदर युवक दंगा व गोंधळ करू लागल्याने त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मडगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही एडबर्गचा दंगा व गोंधळ सुरूच होता. त्याने पोलिसांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर पोलिसांनी एडबर्ग याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे पोलिसांनी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते. एडबर्गच्या वैद्यकीय तपासणीत मारहाणीमुळे त्याच्या मेंदूच्या भागात रक्ताच्या गाठी तयार झाल्या असल्याचे समोर आले आहे. मारहाण प्रकरणी उपनिरीक्षक शिरवईकर हे प्राथमिक तपासात दोषी आढळले. त्यामुळे शिरवईकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जात आहे.
दरम्यान, बेड्या घालण्यात आल्याबाबतचे आरोप आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात असल्याचे पोलीस अधीक्षक वर्मा यांनी स्पष्ट केले.
एडबर्गच्या आईचे पोलिसांवर आरोप
एडबर्गच्या आईने पोलिसांनी एडबर्गला साखळीने बांधून मारहाण केली. जखमी झाल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. गाडीतही त्याला व्यवस्थित घालण्यात आले नाही. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले. तर प्रतिमा कुतिन्हो यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
उपनिरीक्षक निलंबित, गुन्हा दाखल
नावेली येथील एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर याला निलंबित केले आहे. सीसीटीव्ही फुटेज व प्राथमिक चौकशीच्या आधारावर शिरवईकर यांच्यावर स्वेच्छेने दुखापत करणे तसेच सार्वजनिक कर्मचाऱ्याने कायद्याचे उल्लंघन करणे, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला इजा होणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तोल जाऊन पडल्याने दुखापत : अधीक्षक
एडबर्ग हा पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही शांत न राहता ओरडत व शिवीगाळ करत होता. ड्युटी ऑफिसर, पीएसआय नीलेश शिरवईकर यांनी एडबर्गला शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत, एडबर्गचा तोल गेला, तो जमिनीच्या स्कर्टिंगवर पडला आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक वर्मा यांनी दिली.
पोलीस कोठडीत एडबर्ग परेराला झालेल्या मारहाणीप्रकरणी गुन्हा नोंदवून ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने पोलीस महासंचालकांकडे केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, एका पीएसआयचे निलंबन पुरेसे नाही. डोक्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने हे प्रकरण गंभीर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.