राज्यात १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ११.८२ इंच पावसाची नोंद

पणजी : गोव्यात यंदा पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे. राज्यात १ मे ते २९ ऑक्टोबर या काळात तब्बल १६१.०१ इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे, ज्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यात मे महिन्यात २५.७७ इंच, जूनमध्ये ३१.३४ इंच, जुलैमध्ये ४६.६९ इंच, ऑगस्टमध्ये ३५.२२ इंच, सप्टेंबरमध्ये १०.१७ इंच, तर १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ११.८२ इंच पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या. सांताक्रुझ येथे संरक्षक भिंत पडून किरकोळ नुकसान झाले. सततच्या पावसाने सालेली येथे घराचे छप्पर कोसळून पडले. पावसाने राज्यभरात भातासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान, पणजीत २.२२ इंच, तर मोपा येथे ०.९७ इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
राजधानीत वाहतुकीची कोंडी
राज्यात मागील दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. मंगळवारी कडक ऊन पडले होते. मात्र, बुधवार सकाळपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पावसामुळे राजधानी पणजीत अटल सेतुसह काही रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. शहरात सर्वत्र संथगतीने वाहतूक सुरू होती. पावसाने जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले.
पुढील सहा दिवसांसाठी ‘नो अलर्ट’
हवामान खात्याने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सहा दिवसांसाठी पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. राज्यात १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान सरासरी ११.८२ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण ८५.९ टक्क्यांनी अधिक आहे. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ५५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
कमी दाबाचा पट्टा पणजीपासून ५६० किमीवर
पूर्व किनारपट्टीवर धडकलेले ‘मोंथा’ चक्रीवादळ तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी राज्यात पावसाचा जोर कायम होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पणजीच्या नैऋत्य दिशेला ५६० किलोमीटर अंतरावर आहे.