बिगरमोसमी पावसाने फिरविला शेतकऱ्यांच्या कष्टांवर नांगर

शेती, बागायतींची हानी : प्रती हेक्टर ४० हजार प्रमाणे नुकसान भरपाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
बिगरमोसमी पावसाने फिरविला शेतकऱ्यांच्या कष्टांवर नांगर

साळ, डिचोली येथे पावसाच्या पाण्यामुळे भात पिकाची झालेली हानी.

पणजी : राज्यात सततच्या पावसामुळे भातशेतीत पाणी तुंबून राहण्याबरोबर सुपारीही गळण्यास सुरुवात झाली आहे. कापणी केलेल्या शेंडांना कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. ऊनाची गरज असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला आहे. दरम्यान, शेतकरी आधार निधी अंतर्गत प्रती हेक्टर ४० हजार प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल. डिसेंबरपर्यंत नुकसान भरपाईचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
यंदा दिवाळी पूर्वीच बिगरमोसमी पावसाला सुरुवात झाली. गेल्या शुक्रवार, शनिवारी पावसाचे प्रमाण अधिक होते. यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने थोडाफार दिलासा मिळाला होता. तोच मंगळवार रात्रीपासून पावसाने जोर धरला. बुधवारी सकाळी सर्वत्र जोरदार वृष्टी झाली. सरासरी ३० टक्के शेतीचे नुकसान होण्याची शक्यता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मात्र, पाहणीनंतरच नुकसानीचा आकडा कळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बहुतांशी भातशेतीची कापणी झालेली आहे. पावसामुळे भाताची कणसे भिजून ती कुजण्यास सुरुवात झाली आहे. कमी, अधिक प्रमाणात सर्वच भागात भातशेतीचे नुकसान झाले आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. पाहणीनंतरच नुकसानीचे प्रमाण कळेल, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.
४ रुपयाऐवजी ६ रुपये चौमी
प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी

सरकार सध्या ४ रुपये प्रती चौरस मीटर (हेक्टरी ४० हजार) प्रमाणे नुकसान भरपाई देते. हे प्रमाण फारच कमी आहे. नुकसान भरपाईच्या रकमेत ६ रुपये प्रती चौरस मीटर एवढी वाढ करण्याची मागणी आमदार अालेक्स रेजिनाल्ड यांनी केली. कुडतरी मतदारसंघात शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे, असेही आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.
पावसामुळे सुपारीलाही फटका
यंदा पावसाचे प्रमाण उत्तम होते. यामुळे सुपारीचे पीक समाधानकारक होते. परंतु, आता पावसामुळे सुपारी गळण्यास सुरुवात झाली आहे. ऊनाची आवश्यकता असताना सततच्या पावसामुळे सुपारीचे मोठे नुकसान होत आहे, अशी माहिती सत्तरीतील प्रगतशील बागायतदार अशोक जोशी यांनी दिली. ज्या बागायतदारांनी किटकनाशकाची फवारणी केलेली नाही, त्यांना तर मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचे ते म्हणाले.


सुपारीला कोळे रोगाची लागण
पावसामुळे सुपारीला कोळे रोगाची लागण होण्यास सुरुवात झाल्याची माहिती रिवण येथील प्रगतशील बागायतदार पांडुरंग पाटील यांनी दिली. पावसामुळे झाडावरील सुपारीला कोंब येतो. हा कोंब काडल्यानंतर तीला बुराक पडतो. परिणामी सुपारीचा दर्जा घसरून तिला दर कमी मिळतो. ऊन नसल्यामुळे साठवलेल्या सुपारीलाही कोंब येण्याची शक्यता असते, असे पांडुरंग पाटील म्हणाले.
................
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
* पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतकरी आधार निधी अंतर्गत प्रती हेक्टर ४० हजार प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल.
* अधिकाधिक ४ हेक्टरपर्यंत १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळेल.
* डिसेंबरपर्यंत नुकसान भरपाई वितरित केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा