गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ६.२३ टक्क्यांनी वाढली

पर्यटनमंत्र्यांची माहिती : विदेशी पर्यटकांत २९.३३ टक्क्यांची, तर देशी पर्यटकांत ५.३६ टक्के वाढ


31st October, 11:27 pm
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ६.२३ टक्क्यांनी वाढली

पत्रकार परिषदेत बोलताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे. सोबत केदार नाईक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील पर्यटन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात आलेल्या पर्यटकांच्या संख्येत ६.२३ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशी पर्यटकांची संख्या ५.३६ टक्क्यांनी, तर विदेशी पर्यटकांची संख्या तब्बल २९.३३ टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला पर्यटन संचालक केदार नाईक उपस्थित होते. यावेळी पर्यटन विभागाच्या नव्या उपक्रमांची माहितीही देण्यात आली. २०२४ च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ६९,२४,९३८ पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती, तर यंदा सप्टेंबरअखेर ७२,९६,०६८ पर्यटकांनी राज्याला भेट दिली. देशी पर्यटकांत ५.३६ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २,५९,८२० विदेशी पर्यटक गोव्यात आले होते. यंदा ही संख्या ३,३६,०३१ वर पोहोचली आहे. म्हणजेच २९.३३ टक्क्यांची वाढ आहे.
पावसातही पर्यटन टिकले
सामान्यतः पावसाळ्यात पर्यटकांची संख्या घटते; परंतु यंदा उलट चित्र दिसले. ऑक्टोबर महिन्यात रशिया आणि मध्य आशियातून ३४ चार्टर विमाने गोव्यात दाखल झाली. यूकेच्या टीयूआय एअरवेजने मँचेस्टर आणि गॅटविक येथून गोव्याला थेट विमानसेवा सुरू केली आहे. यामुळे ३० ते ४० हजार पर्यटकांची भर पडली असून पुढील काळात नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंड या देशांतील पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नवे उपक्रम, विकास प्रकल्प
राज्यात एरोस्पोर्ट्स आणि वेलनेस पर्यटन धोरण अधिसूचित करण्यात आले आहे. तसेच ‘टाऊन स्क्वेअर’ आणि ‘युनिटी मॉल’सारख्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून ४७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हॉटेल नोंदणी तपासणी मोहीम
पर्यटन नोंदणी कायद्यानुसार, राज्यातील सर्व हॉटेलांची नोंदणी अनिवार्य आहे. ए, बी, सी आणि डी गटांपैकी काही हॉटेलांनी चुकीच्या गटात नोंदणी केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी १६ जणांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. तसेच बोगस टूर ऑपरेटरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी
स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून समुद्रकिनाऱ्यांवर छायाचित्रणासाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. फोटोग्राफरांची नोंदणी करून त्यांना व्यवसायाची संधी देण्यात येत आहे.
बेकायदा टॅक्सी ऑपरेटरांवर कारवाई
पर्यटनाचे नुकसान करणाऱ्या बेकायदा टॅक्सी व टूर ऑपरेटरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले. काही टॅक्सी चालकांच्या गैरवर्तनामुळे गोव्याची प्रतिमा खराब होत आहे. सरकार टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.