भारत जागतिक क्रीडा हब बनण्याच्या मार्गावर !

मुख्यमंत्री : फिडे विश्वचषकाचे थाटात उद्घाटन


31st October, 11:23 pm
भारत जागतिक क्रीडा हब बनण्याच्या मार्गावर !

फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय क्रीडामंत्री रमेश तवडकर, खासदार सदानंद शेट तानावडे व फिडेचे अध्यक्ष आरकाडी ड्रॉकोविच.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील काही वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पुढील काही वर्षांत भारत जागतिक क्रीडा हब बनेल, असा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. शुक्रवारी पणजीत फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय, क्रीडामंत्री रमेश तवडकर, फिडेचे अध्यक्ष आरकाडी ड्रॉकोविच व अन्य अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेनिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भारतात क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याने युवा पिढीला चांगली संधी मिळत आहे. गोवा सरकारदेखील क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा करत आहे. स्पर्धेच्या आयोजनमुळे बुद्धिबळ खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल. यामुळे तरुण क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळणार आहे. बुद्धिबळ आणि आयुष्य हे साधारणपणे एकसारखे असते. बुद्धिबळात तर्क, चिकाटी, दूरदृष्टी आवश्यक असते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठीदेखील हे गुण आवश्यक असतात. बुद्धिबळप्रमाणेच आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात.
बुद्धिबळाची सुरुवात भारतात झाली होती. त्यावेळी या खेळाचे नाव ‘चतुरंग’ असे होते. यामुळे आज भारतात, त्यातही गोव्यात बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन होत आहे, ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेमध्ये ८३ देशांतील २०६ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. खेळाडूंच्या उपस्थितीमुळे सध्या गोवा सांस्कृतिक तसेच बौद्धिक केंद्र बनले आहे. स्पर्धेसाठी येथे आलेल्या सर्वांनी गोव्याचा आनंद घ्यावा. तसेच येथून चांगल्या आठवणी घेऊन जाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
२०३६ ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतात : मांडवीय
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, भारतात २३ वर्षांनंतर फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्यासाठी क्रीडा म्हणजे केवळ स्पर्धा नसून ती संस्कृती आहे. आम्ही क्रीडा क्षेत्रात आघाडी घेत आहोत. भारत २०३० मध्ये ‘कॉमनवेल्थ’, तर २०३६ मध्ये ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेचे आयोजन करेल, अशी आमची खात्री आहे.
भारत बुद्धिबळाचा पॉवरहाऊस : ड्रॉकोविच
यावेळी फिडेचे अध्यक्ष आरकाडी ड्रॉकोविच यांनी भारतातील बुद्धिबळ खेळाचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत बुद्धिबळाची जन्मभूमी आहे. तसेच भारत देश संपूर्ण जगात बुद्धिबळाचा पॉवरहाऊस आहे. या स्पर्धेत यश मिळविणारे खेळाडू पुढील विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत.

हेही वाचा