पावसामुळे शेतीचे नुकसान वाढण्याची भीती

भाताची ४० टक्के रोपे आडवी; सुपारी, केळी पिकांवरही परिणाम


31st October, 11:26 pm
पावसामुळे शेतीचे नुकसान वाढण्याची भीती

पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान दाखवताना शेतकरी आपा शेटगावकर. (निवृत्ती शिरोडकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बुधवारच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केल्यानंतर पावसाने गुरुवारी थोडीफार विश्रांती घेतली होती. तरीही शुक्रवारी पाऊस व दमट हवामानामुळे शेतकऱ्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. शुक्रवारच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीचे प्रमाण वाढणार आहे. विभागीय अधिकाऱ्यांंनी नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. अहवाल आल्यानंतरच नुकसानीचे नेमके प्रमाण कळणार आहे, असे कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी सांंगितले.
राज्यात किमान ४० टक्के रोपे पावसामुळे आडवी झाली आहेत. ऊन पडल्यानंतर त्यांची कापणी करणे शक्य होणार आहे. पावसात कापणी करणे कठीण असते. यात पुन्हा कापणी केली तर पावसामुळे कणसे कुजण्याचीच अधिक शक्यता असते. पाऊस जितका लांंबेल तेवढे शेतीचे नुकसान वाढणार आहे. रोपे आडवी झाल्याने आता यंत्राद्वारे कापणी करणे अशक्य आहे, अशी माहिती शेतकऱ्यांंनी दिली. सुपारी आणि केळी पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे सुपारी गळण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, नुकसान भरपाईसाठी विभागीय कार्यालयात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज सादर केल्यानंतर विभागीय अधिकारी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करतील. या अहवालावर नुकसानभरपाईची रक्कम ठरणार आहे. शेतकरी आधार निधीअंंतर्गत हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी जाहीर केले आहे.
पावसापूर्वी कापणी केलेले नुकसानीतून बचावले
ज्यांची कापणी पावसापूर्वी झाली आहे, त्यांचे नुकसान झाले नाही. कापणी झालेली नाही, त्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती चिंंचिणी फार्मर्स क्लबचे अध्यक्ष आग्नेल फुर्तादो यांनी दिली. चिंंचिणी फार्मर्स क्लबचे बरेच शेतकरी सदस्य आहेत. चिंंचिणीत नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी सासष्टी व इतर तालुक्यांत बरेच नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रमाण प्रत्यक्ष शेतकरीच सांगू शकतील, असे फुर्तादो म्हणाले.       

हेही वाचा