शेती-बागायतीनंतर आता शॅक, वॉटरस्पोर्ट्सवर परिणाम

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शेती आणि बागायतीनंतर सतत सुरू असलेल्या पावसाचा फटका आता राज्यातील पर्यटन व्यवसायालाही बसला आहे. पावसामुळे समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक सुरू करणे आणि वॉटरस्पोर्ट्स बोटी चालविणे कठीण झाले आहे. पर्यटक येऊ लागले असले तरी शॅकधारकांना व्यवसाय सुरू करता येत नाही, तर वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटरनाही बोटी पाण्यात उतरवणे शक्य होत नाही. राज्य सरकारला या नुकसानीची माहिती असून शक्य तेवढी मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
या आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले आहे. सध्या अंदाजे ४० ते ४५ टक्के शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पिकांची कापणी पूर्ण झाल्यानंतर निश्चित नुकसानीचा आकडा समजणार आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
सप्टेंबर अखेरपासून राज्यातील पर्यटन हंगाम सुरू होतो. यंदा पावसामुळे पर्यटक येण्याची संख्या जरी वाढली असली तरी व्यावसायिकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. सरकारने शॅक परवान्यांची प्रक्रिया जलदगतीने सुरू केली असली तरी पावसामुळे शॅक उभारणीस अडचणी येत आहेत. पावसामुळे वॉटरस्पोर्ट्स बोटी पाण्यात सोडता येत नाहीत. परिणामी, अनेक बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या अवस्थेत पडून आहेत.
‘ओशनमॅन इव्हेंट’बाबत पर्यटनमंत्री राेहन खंवटे म्हणाले....
आयपीएस अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे पर्यटन खात्याची मान्यता नसतानाही ‘ओशनमॅन इव्हेंट’ आयोजनाचा प्रयत्न झाला.
आयपीएस अधिकाऱ्यानी गोवा समजून घेण्यासाठी गोमंतकीयांच्या भावना जाणून घेण्याची गरज आहे.
करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर रापणकार मच्छीमारी व्यवसाय करतात. यामुळे तिथे ‘ओशनमॅन इव्हेंट’ला मान्यता देता येत नाही.
पर्यटन खात्याने आयोजकाना दंड ठोठावून कारवाई केली आहे.