कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती : पाकिस्तानकडून तुर्कीनिर्मित ड्रोनचा वापर
पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम मिस्री. सोबत व्योमिका सिंह आणि सोफिया कुरेशी.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पाकिस्तानने ड्रोन हल्ले करून भारतामधील ३६ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासामध्ये या हल्ल्यासाठी तुर्कीमध्ये तयार झालेल्या ड्रोनचा वापर केल्याचे समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने याला प्रत्युत्तर देत ड्रोनच्या माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला केला. यामध्ये पाकिस्तानची सर्व्हिलान्स रडारप्रणाली नष्ट झाली. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. परराष्ट्र मंत्रालयातर्फे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनीही संबोधित केले.
कर्नल कुरेशी पुढे म्हणाल्या, पहलागाम हल्ला आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दिलेले प्रत्युत्तर यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या आगळीकीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात आले. हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झाले होते.
भारताचे चार जवान हुतात्मा
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या चार हवाई संरक्षण प्रणालींवर सशस्त्र ड्रोनने गोळीबार करण्यात आला. यापैकी एक ड्रोन एडी रडार नष्ट करण्यात आले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर तोफ आणि सशस्त्र ड्रोन वापरून गोळीबार केला. यामध्ये काही भारतीय लष्कराचे जवान मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले. यात लष्कराचे चार जवान हुतात्मा झाले आणि दोन शाळकरी मुलांना जीव गमवावा लागला. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले.
विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तानने कंधार, उरी, पूंछ, राजौरी, अखनूर आणि उधमपूर यासारख्या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात गोळीबार करून भारताविरुद्ध चिथावणीखोर लष्करी कारवाई केली. पाकिस्तानने हल्ला केल्याचे समजताच अनेक शहरांमध्ये सायरन वाजले आणि हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सुरू असलेला आयपीएल सामना स्थगित करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलांना काही नुकसान आणि दुखापत झाली. या कृत्याबद्दल पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली.
पाकिस्तान पसरवत आहे खोट्या बातम्या
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, पाकिस्तानने आपल्या कुरापती मान्य करण्याऐवजी, हास्यास्पद आणि अपमानजनक दावा केला. पाकिस्तान म्हणतो, ‘भारतीय सशस्त्र दल अमृतसरसारख्या आपल्याच शहरांना लक्ष्य करत आहे आणि पाकिस्तानवर दोषारोप ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.’ पाकिस्तानचा इतिहास पाहिला, तर ते अशा कृती करण्यात पटाईत आहेत. भारताने ड्रोन हल्ल्याद्वारे नानकाना साहिब गुरुद्वाराला लक्ष्य केल्याची चुकीची माहिती पाकिस्तानने पसरवली. जातीय वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान परिस्थितीला सांप्रदायिक करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या सुरक्षा परिस्थिती पाहता पुढील सूचना मिळेपर्यंत कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत.
परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका, ब्रिटिश, नॉर्वेला दिली माहिती
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचे परराष्ट्रमंत्र्यांनी कौतुक केले. पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, असे परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला सांगितले. जयशंकर यांनी शुक्रवारी ब्रिटिश आणि नॉर्वेच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा केल्याची माहिती मिस्री यांनी दिली.
प्रवासी विमानांचा पाकिस्तानकडून ढालीसारखा वापर
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, हल्ले सुरू असताना पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली नव्हती. उलट तिचा ढालीसारखा वापर केला. त्यावेळी कराची आणि लाहोरसारख्या शहरांवरून प्रवासी विमाने जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले होते. हे एक धोकादायक आणि बेजबाबदार पाऊल आहे. मात्र सर्वसामान्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी संपूर्ण कारवाई संयमीपणे हाताळली. या संयमी भूमिकेचे आंतरराष्ट्रीय पातळीवरून कौतुक होत आहे.