गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाची कारवाई
पणजी : मुरगाव तालुक्यातील एका कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये साना एंटरप्रायझेस या कंपनीच्या खात्यात जमा करून गंडा घातला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने मोहम्मद रझाक मुल्ला (२८, ठाणे) या व्यावसायिकाला अटक केली.
सायबर गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील गोल्बल कन्व्हेयर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सचिन भंडारे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने १४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे वॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तेथील कर्मचाऱ्याला साना एंटरप्रायझेस या कंपनीच्या आयसीआयसीआय बँक खात्यात एका प्रकल्पासाठी आगाऊ रक्कम म्हणून ५० लाख रुपये जमा करण्यात लावले. त्यानंतर या संबंधात चौकशी केली असता, अशाप्रकारची कोणती सूचना केली नसल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी सायबर विभागात तक्रार दाखल करण्यात आली. याची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान संबंधित बँक खात्याची चौकशी केली असता, सदर बँक खाते मोहम्मद रझाक मुल्ला (२८, ठाणे) या व्यावसायिकाचे असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि सहाय्यक अधीक्षक अक्षत आयुष्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शर्विन डिकोस्टा, कॉन्स्टेबल संजीव गाव्हण आणि रजत नाईक हे पथक ठाणे - महाराष्ट्रात रवाना करण्यात आले. पथकाने मोहम्मद रझाक मुल्ला (२८, ठाणे) याला अटक करुन गोव्यात आणले. त्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे बँक खाते सायबर फसवणूक प्रकरणात वापर होत असल्याचे समोर आले. तसेच त्याच्या बँक खात्यात पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रातील नागरिकांचे पैसे जमा झाल्याचे समोर आले आहे.