शिक्षणसंस्थांच्या कॅम्पसपर्यंत पोहोचला ड्रग्जचा विळखा

Story: अंतरंग - गोवा |
3 hours ago
शिक्षणसंस्थांच्या कॅम्पसपर्यंत पोहोचला ड्रग्जचा विळखा

राज्यात मागील काही दिवसांत एक संवेदनशील विषय समोर आला आहे - तो म्हणजे बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये ड्रग्जचा वापर. गोव्यातील नामांकित शिक्षणसंस्था बिट्स पिलानीचा के. के. बिर्ला कॅम्पस अलीकडेच झालेल्या आत्महत्येच्या घटनेने पुन्हा हादरला आहे. डिसेंबर २०२४ पासून या कॅम्पसमधील पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, नुकताच मृत पावलेल्या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या शरीरात ड्रग्जचे अंश आढळून आले आहेत. त्यामुळे, यापूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. राज्यात ड्रग्जची तस्करी काही नवीन नाही. १९६० च्या दशकात हिप्पी पर्यटकांमुळे याची सुरुवात झाली. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कांदोळी येथे 'चोगम' परिषदेचे आयोजन केले. त्यानंतर गोवा एक जागतिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले आणि कालांतराने ड्रग्जसाठीही ते 'डेस्टिनेशन' बनले. जसजसे पर्यटन क्षेत्र व्यावसायिकदृष्ट्या वाढत गेले, तसतशी ड्रग्जची मागणीही वाढली. सहज पैसा आणि मोठ्या कमाईच्या आमिषाने अनेक परदेशी नागरिकांसह स्थानिक लोकही ड्रग्ज पेडलर बनले.

पूर्वी उत्तर गोव्यातील हरमल, मोरजी, कळंगुट, हणजूण, वागातोर आणि इतर किनारी भागांपर्यंतच ड्रग्जचा वावर होता. तेव्हा अमली पदार्थ तस्करीत परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होते आणि ते आपल्याच देशातील लोकांना ड्रग्ज पुरवत असत. आता मात्र काही परदेशी नागरिक स्थानिक लोकांना या तस्करीमध्ये पुढे करत आहेत. मागील २० वर्षांपासून गोव्याच्या किनारी भागांवर स्थानिकांचे वर्चस्व वाढले आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याने स्थानिक तसेच परप्रांतीय लोकांचा सहभाग वाढला आहे. आता तर किनारी भागांसह इतर भागातही ड्रग्ज सहज उपलब्ध होत आहेत. याशिवाय, डिजिटल युगात डार्कनेट, व्हॉट्सअॅप आणि खास करून टेलिग्रामसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. राज्यात मागील काही ड्रग्ज तस्करीच्या कारवाईचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, अनेक विद्यार्थी ड्रग्जचे सेवन करत आहेत. याशिवाय, तरुण-तरुणी तस्करीमध्ये गुंतल्याची माहितीही समोर आली आहे. राज्यात परदेशी नागरिकांसह केरळ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशातील नागरिक आणि गोमंतकीय नागरिक मोठ्या प्रमाणात तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. आता तर ड्रग्ज शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसमध्येही पोहोचला आहे. बिट्स पिलानी कॅम्पसमधील विद्यार्थी ऋषी नायरच्या शरीरात ड्रग्ज आढळून आल्यामुळे तपास यंत्रणांसह सरकारनेही कठोर पावले उचलण्याची गरज आहे. राज्यातील गुन्हेगारी तसेच ड्रग्ज तस्करी, वेश्याव्यवसाय, बेकायदेशीर बांधकामे यांसारखी गैरकृत्ये पर्यटनाच्या नावाखाली होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. असे असतानाही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. जर आताच यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणूनच, शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने सरकारने धोरणात्मक आणि कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.


- प्रसाद शेट काणकोणकर