भारतीय संघाने हात मिळवणे टाळले, तर ते केवळ भावनिक नव्हे तर कूटनीतिकदृष्ट्या योग्य पाऊल मानले पाहिजे. विजय आणि हस्तांदोलन न करणे ही कृती एकत्रितपणे भारताची शान वाढवणारी ठरली आहे.
पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटमध्ये मिळवलेला विजय हा भारतासाठी नेहमीच अभिमानाचा क्षण ठरतो. परंतु यंदाचा विजय एका वेगळ्याच कारणामुळे अधिक गाजला- कारण भारतीय खेळाडूंनी विजयाच्या क्षणी हस्तांदोलन न करण्याचा ठाम निर्णय घेतला. हा निर्णय केवळ क्रीडा शिष्टाचाराच्या चौकटीपलीकडचा होता; तो राष्ट्राच्या भावनांचा आणि आत्मसन्मानाचा प्रतीक ठरला. खेळ हा दोन देशांमधील संवादाचा मार्ग असू शकतो, हे खरे. परंतु पाकिस्तानसारख्या देशाशी संवादाची पायाभरणीच जेव्हा हिंसा, दहशतवाद आणि शत्रुत्वावर उभारलेली आहे, तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्तीचे औपचारिक सौजन्य दाखवणे योग्य ठरले असते का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हस्तांदोलन टाळून भारतीय संघाने स्पष्ट संदेश दिला की क्रीडांगण हे फक्त खेळाचे क्षेत्र आहे; त्याचा वापर विशेष संबंध दाखवण्यासाठी होऊ नये. भारतीय खेळाडूंनी दाखवलेला हा आत्मसन्मान जगभर लक्षवेधी ठरला. विजय हा क्रीडा परंपरेतील मोठा क्षण असतो; पण आत्मसन्मान टिकवून तो विजय साजरा करणे, ही मोठी गोष्ट आहे. हा पवित्रा भारताला केवळ गुणतालिकेतच नव्हे, तर जनमानसात अधिक उंचावून ठेवतो. आजच्या जागतिक राजकारणात भारताचे स्थान अधिक ठळक होत आहे. अशा वेळी क्रिकेटसारख्या खेळातून दिलेला हा संदेश- आम्ही खेळात जिंकतो आणि स्वाभिमानातही मागे हटत नाही- हा भारताच्या नव्या आत्मविश्वासाचा आरसा आहे. सामना संपल्यानंतर साधे हस्तांदोलन हे इतर संघांसाठी खिलाडूवृत्तीचा शिष्टाचार असू शकतो; परंतु भारत - पाकिस्तान संदर्भात तो सरळसरळ राजकीय संदेश ठरतो. म्हणूनच भारतीय संघाने हात मिळवणे टाळले, तर ते केवळ भावनिक नव्हे तर कूटनीतिकदृष्ट्या योग्य पाऊल मानले पाहिजे. विजय आणि हस्तांदोलन न करणे ही कृती एकत्रितपणे भारताची शान वाढवणारी ठरली आहे. हा क्षण भावनांचा, राष्ट्राभिमानाचा आणि नव्या भारताचा विचार मांडणारा ठरला, यात शंका नाही. भारतातील नागरिकांच्या मनात दहशतवादामुळे खोल जखमा आहेत. पुलवामा, उरी, कुपवाडा यांसारख्या घटनांनी असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा वेळी भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाशी सहजतेने हात मिळवला असता, तर ते शहिदांच्या त्यागाला धक्का देणारे ठरले असते. हस्तांदोलन टाळून खेळाडूंनी जनमानसाचा आदर राखला हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळावे की नको, हा प्रश्न फक्त खेळापुरता मर्यादित नव्हता, यात कूटनीती, सुरक्षाविषयक धोके, जनभावना आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा या सगळ्यांचा विचार करावा लागतो. क्रिकेट हा लोकांना जोडणारा खेळ आहे. राजकीय तणाव असला तरी खेळाच्या माध्यमातून लोकांमध्ये मैत्रीचे पूल बांधता येतात, असे समर्थन करण्यात आले, त्याला कारणही आहे. भारत जगातील सर्वात मोठा क्रिकेटप्रेमी देश आहे. पाकिस्तानशी खेळणे म्हणजे भारताच्या उदार, खिलाडूवृत्ती प्रतिमेला मजबूत करणे. अनेकदा हा खेळ "क्रिकेट डिप्लोमसी" म्हणून दोन देशांमध्ये संवादाची दारे उघडू शकतो, असे दिसून येते. भारत-पाकिस्तान सामना हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रीडा प्रकारांपैकी एक आहे. यामुळे प्रचंड महसूल, टीआरपी आणि प्रेक्षकांना हवी ती स्पर्धात्मक मजा मिळते. खेळाडू राजकारणाचे बळी ठरू नयेत. त्यांना आपली कौशल्ये दाखवण्याची संधी मिळायला हवी, असेही म्हटले जाते. याउलट, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादामुळे भारतात अनेक हल्ले झाले आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेट खेळणे म्हणजे शत्रूराष्ट्राला अप्रत्यक्ष मान्यता देणे असा अर्थ काढला गेला. दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपले जवान आणि नागरिक मरण पावले आहेत. त्याच वेळी पाकिस्तानशी सामना खेळणे हे अनेकांना अपमानकारक वाटले. पाकिस्तान सतत सीमेवर संघर्ष वाढवत असेल आणि आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळलो, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा संदेश जाईल की भारत तडजोडीला तयार आहे. भारताशी खेळल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला प्रचंड महसूल मिळतो. अप्रत्यक्षपणे हा पैसा भारताविरुद्धच्या कारवायांमध्ये वापरला जाऊ शकतो तसेच सुरक्षितता पाकिस्तानमध्ये कधीच खात्रीशीर नसते. पूर्वी श्रीलंकेच्या संघावर झालेले हल्ले, याचे उदाहरण आहे. मात्र येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, अशा प्रतिकूल वातावरणात भारताने कधीही पाकिस्तानशी थेट सामना खेळलेला नाही, पण बहुदेशीय सामन्यात मात्र सहभाग घेतला आहे. टीकाकार नेमके याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. सामने कुठल्याही देशांत झाले तरी भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना हा नेहमीच भावनांचा ज्वालामुखी ठरला आहे. मैदानावर चेंडू व बॅट यांची लढत असते खरी, पण तिच्या पाठीमागे राजकारण, दहशतवाद, जनमानस आणि कूटनीती यांचे सावट कायम असते.
भारताने भोगलेला दहशतवाद, सीमेवरील हल्ले, पहलगाम, पुलवामा - उरीसारखी रक्तरंजित उदाहरणे अजून ताजी आहेत. याशिवाय सुरक्षेच्या धोक्यांचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. श्रीलंकेच्या संघावर लाहोरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची प्रतिमा आणखी डागाळली आहे. भारताचे खेळाडू अशा जोखमीला का सामोरे जावेत, असा प्रश्न विचारला गेला. या दोन टोकांमध्ये भारताची स्थिती फारच नाजूक आहे. एकीकडे खेळाडूंना संधी द्यायची, क्रीडा संस्कृतीला चालना द्यायची; तर दुसरीकडे देशाच्या सुरक्षेला व नागरिकांच्या भावनांना तडा जाऊ द्यायचा नाही. म्हणूनच बहुतेकदा भारताने द्विपक्षीय मालिका टाळल्या, पण बहुदेशीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानशी सामना खेळला. हा तडजोडीचा मार्ग ठरला आहे. पाकिस्तानशी क्रिकेट हा केवळ २२ यार्डांवरचा खेळ नाही; तो दोन राष्ट्रांच्या नात्यांचा आरसा आहे. खेळाच्या मैदानावर विजय - पराजय ठरतो, पण त्यामागे राजकारणाची मोठी लढाई दडलेली असते. म्हणूनच भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे की नको, हा निर्णय केवळ बीसीसीआयचा नसून, तो जनभावना, राष्ट्रीय सुरक्षा आणि कूटनीती या तिन्हींचा विचार करून घ्यावयाचा होता. या सामन्यात मिळवलेल्या विजयाने याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे, कारण यामुळे एका स्वाभिमानी राष्ट्राचा डंका वाजला आहे, हे सामन्यास विरोध करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. यात राजकारण आणू नये.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४