ओंकार हत्ती सध्या गोव्यातच फिरत आहे. सध्या हा हत्तीच आटोक्यात येत नसल्यामुळे इतर हत्ती गोव्यात आले, तर त्यांना परतवून लावण्याचे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे तूर्तास ओंकार हत्तीला महाराष्ट्रात पाठवणे हाच पर्याय आहे.
वीस-बावीस वर्षांपूर्वी कर्नाटकातून कळपाकळपाने आलेले हत्ती गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील काही भागांत राहून नंतर महाराष्ट्राच्या तिळारी खोऱ्यात उतरले. तेथून काही हत्ती चंदगडपर्यंत गेले. तिथे काही हत्तींचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. उर्वरित हत्ती गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गच्या जंगलात तळ ठोकून आहेत. हत्तींचा दुरान्वये संबंध नसलेल्या सिंधुदुर्गवासीयांना आता रोज हत्तीच्या बातम्या, गोष्टी ऐकाव्या लागतात, वाचाव्या लागतात. गोव्याच्या शेजारी आणि लागून असलेल्या सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना हत्ती हा शेती, बागायतींचा नासाडी करणारा नवाच प्राणी गेल्या वीस-बावीस वर्षात पहावा लागतो. तिळारी खोऱ्यातील हत्ती अधूनमधून दोडामार्गमधील काही गावांमध्ये दिसतात. लोकवस्तीजवळ येतात. काही वेळा लोकवस्तीतही घुसतात. लोकांची भीती त्यांना राहिलेली नाही. त्यातल्या त्यात एकलकोंडे हत्ती ही दुसरी डोकेदुखी. इतर हत्तींनी दूर केल्यामुळे काही हत्ती एकटेच फिरत असतात. असाच एक हत्ती सध्या गेली काही वर्षे दिसलेला नाही. त्याचे पुढे काय झाले, त्याची माहितीही उपलब्ध नाही. नर हत्ती एका विशिष्ट वयानंतर कळपापासून दूर होतात. अर्थात ही नैसर्गिक प्रक्रियाच आहे. तिळारी खोऱ्यात कर्नाटकातून आलेल्या हत्तींचेही तसेच झाले आहे. सध्या ओंकार नावाचा हत्ती इतर हत्तींपासून दूर राहतो. तो आता गोव्याच्या हद्दीत आल्यामुळे गेले काही दिवस गोव्याचे वन खाते कासावीस झाले आहे. हत्ती आल्याच्या बातमीला आधी अफेववर घेणाऱ्या वन खात्याने आता ड्रोनद्वारे त्याच्यावर नजर ठेवली आहे. गोव्यातून त्याला हाकलून महाराष्ट्रात घालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोव्याला हत्ती परवडणारे नाहीत. मात्र तिळारीसारख्या खोऱ्यात ते अनेक वर्षांपासून आहेत. तिथे त्यांच्यासाठी अधिवासाची सोय झाल्यामुळे तिथे ते अनेक वर्षे राहू शकले. पण इथल्या जंगलांमध्ये हत्तींसाठी पोषक वातावरण नाही. कर्नाटक, आसाम, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये हत्तींचा आधिवास आहे. त्यांच्यासाठी आरक्षित जंगलांचीही व्यवस्था आहे. पण हत्ती सध्या देशभरात सुरक्षित नाहीत. त्यांच्या मृत्यूचे आकडेही चिंताजनक आहेत आणि सध्या भारतातील त्यांची संख्याही चिंताजनक आहे. सध्या देशात ३० हजारांच्या आसपास हत्ती असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रासारख्या राज्यातील तिळारी खोरे हा रानटी हत्तींचा अधिवास नव्यानेच तयार झाला आहे किंवा तसे मानले जाते. मुळात तिथे हत्ती जास्त काळ राहू शकतात का, हा अभ्यासाचा विषय आहे. हत्तींना जे सुरक्षित क्षेत्र हवे आहे, तसे तिळारी खोरे राहिलेले नाही. त्याचे आकारमानही छोटे आहे, त्यामुळेच तिथले हत्ती पुन्हा पुन्हा दोडामार्गच्या गावांमध्ये घुसतात. एका बाजूने हत्तीप्रेमामुळे सरकारला त्यांची काळजी घ्यावी लागते, तर दुसऱ्या बाजूने दोडामार्गचे शेतकरी आणि नागरिकही चिंताग्रस्त असतात. अद्याप हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष दोडामार्गमध्ये तीव्र झालेला नसला, तरीही हत्तींमुळे नेहमी लोकांमध्ये भीतीच असते. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये हत्तींनी स्थानिकांचे नुकसान केले आहे. एप्रिल महिन्यात एका शेतकऱ्याला हत्तीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. त्यावेळी प्रशिक्षित हत्ती आणून या हत्तींची रवानगी दांडेलीच्या जंगलात करण्याचे लेखी आश्वासन वन खात्याने स्थानिकांना दिले होते. हे आश्वासन कागदावरच राहिले आणि हत्ती त्याच परिसरात ठाण मांडून बसले. केळी आणि अन्य बागायती, भात शेतीचे प्रचंड नुकसान आतापर्यंत हत्तींनी केले आहे. लोक आवाज उठवतात, प्रशासन नुकसान भरपाई देते. उपद्रव टाळण्यासाठी या गावातून त्या गावात हत्तींना हुसकावून लावले जाते. त्यापलीकडे काही होत नाही. हे हत्ती आता गोव्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही.
महाराष्ट्र सरकारने या हत्तींना त्यांच्यासाठी सुरक्षित अशा जागी म्हणजे कर्नाटकातील मैसूर किंवा दांडेली येथील हत्तींसाठी आरक्षित असलेल्या वनक्षेत्रात पोचवण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता होती. वीस वर्षांपूर्वी तसे प्रयत्न झाले, पण त्यावेळी यश आले नाही. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करता येतात का, ते पाहणे आवश्यक आहे. आता दोडामार्गवरून गोव्याच्या हद्दीत वारंवार हत्ती येतात. यावेळी आलेला ओंकार हत्ती सध्या गोव्यातच फिरत आहे. त्यानंतर अन्य पाच हत्तीही त्याच्या मागाने गोव्यात येणार नाहीत, याची हमी देता येणार नाही. सध्या हा हत्तीच आटोक्यात येत नसल्यामुळे इतर हत्ती गोव्यात आले, तर त्यांना परतवून लावण्याचे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे तूर्तास ओंकार हत्तीसाठी सुरक्षित असलेल्या महाराष्ट्रातील क्षेत्रात पाठवणे हाच पर्याय आहे.