कार्यक्षम अधिकाऱ्यांचे मनोधैर्य टिकवणे आवश्यक

अजय गावडे यांचे स्वागत 'साग'च्या कर्मचाऱ्यांनी जोरदार केले, पण त्यांची पद्धत चुकीची होती. तेरेझा फर्नांडिस यांचे ज्या पद्धतीने स्वागत झाले होते, त्याच प्रकारे स्वागत झाले असते, तर त्याकडे सरकारनेही सकारात्मक दृष्टीने पाहिले असते.

Story: संपादकीय |
3 hours ago
कार्यक्षम अधिकाऱ्यांचे मनोधैर्य टिकवणे आवश्यक

क्रीडा खात्यात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. विशेषतः कर्मचाऱ्यांमध्ये, प्रशासनात. एकेकाळी व्ही. एम. प्रभुदेसाई हे क्रीडा संचालक होते. त्यावेळी गोव्यातील कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे हक्काने क्रीडा क्षेत्रातील मदतीसाठी जायचा. ‘अण्णा’ या नावाने ओळखले जाणारे प्रभुदेसाई आजही आपल्या त्या सुलभ वागणुकीमुळे सर्वांमध्ये परिचित आहेत. त्यांचे चाहतेही राज्यभर आहेत. त्यानंतर अजय गावडे यांच्या नियुक्तीमुळे क्रीडा खात्यातील वातावरण पुन्हा बदलले. यापूर्वी गावडे क्रीडा संचालक होते, त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत सर्वांनाच माहीत आहे. पण तिथून त्यांची बदली झाली होती. राजकीय नेत्यांशी जुळवून घेणे त्यांना कठीण झाल्यामुळे त्यांची दुसऱ्या खात्यात बदली झाली. नागरी सेवेतील अधिकारी जेव्हा राजकीय रोष ओढवून घेतात, तेव्हा त्यांची बदली जिल्हा पंचायतीचा सीओ, दक्षता खात्याचा संचालक किंवा एखाद्या खात्याचा प्रशासकीय संचालक म्हणून केली जाते. काहीवेळा त्यांना सचिवालयात केवळ फायली पाहण्याचे काम दिले जाते. डॉ. अजय गावडे हे चांगले आणि कार्यक्षम तरुण अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. गोव्याच्या प्रशासनात असे अनेक चांगले अधिकारी आहेत, पण ते राजकीय नेत्यांना नकोसे झाल्यावर अडगळीत पडतात. गावडे यांनीही काही काळ असे दिवस पाहिले. क्रीडा खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यपद्धती माहित असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर खात्यात उत्साह संचारला. अजय गावडे यांची क्रीडा खात्याचे संचालक म्हणून १५ जुलै रोजी नियुक्ती झाली. त्यावेळी हे खाते मुख्यमंत्र्यांकडे होते. गेल्याच आठवड्यात त्यांच्याकडे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्या पदावर काम करणाऱ्या डॉ. गीता नागवेकर यांची प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रतिनियुक्तीवर बदली झाल्यानंतर हे बदल झाले. ‘साग’चा कार्यभार घेण्यासाठी आज गावडे गेले असता कर्मचाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. कर्मचाऱ्यांनी आपल्याच खर्चाने फुले आणली आणि वाद्यवृंदही बोलावला. खरेतर, कर्मचाऱ्यांना एवढी गोष्ट लक्षात यायला हवी होती की, सरकारी व्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी असे स्वागत स्वीकारूही नये आणि करूही नये.

नागरी सेवेच्या नियमांनुसार, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्याच्या सेवेसाठी वेळ द्यायला हवा. तो वेळ अशा कोणत्याही विनाकारण कार्यक्रमासाठी वाया घालवला जाऊ नये. काहीवेळा मंत्र्यांचे स्वागत अशा पद्धतीने होते, पण तेही सरकारी कर्मचाऱ्यांनी कधी करू नये. शिष्टाचारानुसार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे योग्य आहे, पण त्यापलीकडे जाऊन असे स्वागत समारंभ होऊ नयेत.  अजय गावडे यांचे स्वागत करण्यासाठी अतिउत्साही कर्मचाऱ्यांनी थोडे अति केले असले तरी त्याचा फटका गावडे यांना बसू नये. गावडे यांच्या स्वागतासाठी झालेली पुष्पवृष्टी आणि वाद्यवृंदाला बोलावणे, हा कर्मचाऱ्यांनी अतिउत्साहामुळे केलेला प्रकार आहे. त्यात कर्मचाऱ्यांनाही जाब विचारण्याची आवश्यकता आहे, कारण असे प्रकार पुन्हा होऊ नयेत. नुकतेच, लेखा संचालक म्हणून तेरेझा फर्नांडिस यांची निवड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांचेही जोरदार स्वागत केले होते, पण ते स्वागत शिष्टाचार आणि शिस्तीच्या मर्यादेत होते. कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी फर्नांडिस यांना फुलांचे इतके गुच्छ दिले होते की, त्यांचे कार्यालय त्या गुच्छांनी भरून गेले होते. तेरेझा फर्नांडिस या कर्मचाऱ्यांमध्ये फार लोकप्रिय असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे खात्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. 

अजय गावडे यांचे स्वागत 'साग'च्या कर्मचाऱ्यांनी जोरदार केले, पण त्यांची पद्धत चुकीची होती. तेरेझा फर्नांडिस यांचे ज्या पद्धतीने स्वागत झाले होते, त्याच प्रकारे स्वागत झाले असते, तर त्याकडे सरकारनेही सकारात्मक दृष्टीने पाहिले असते. पण ‘साग’च्या कर्मचाऱ्यांनी स्वागताची पद्धतच चुकीची अवलंबली. मुख्य सचिवांनी अजय गावडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नागरी सेवा नियमांची सर्वच अधिकाऱ्यांना आठवण करून दिली. नागरी सेवा अधिकाऱ्यांनी असे स्वागत अपेक्षितही ठेवू नये. त्यांनी जनतेची सेवा करावी आणि वेळ वाया घालवू नये. गावडे यांच्यासारख्या तरुण आणि चांगल्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे कारणे दाखवा सारख्या नोटिसीला सामोरे जावे लागले, हे इतर सरकारी कर्मचाऱ्यांनीही लक्षात घ्यायला हवे. गावडे हे कार्यक्षम आणि नम्र अधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणात अशा अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचू नये, याची काळजी सरकारने घ्यावी. नाहीतरी आपल्या कार्यकाळात अधिकाऱ्यांचेही असे चांगले स्वागत होते, ही सरकारसाठीही जमेची 

बाजू आहेच.