चांगले किंवा वाईट नाही - फक्त शांत !

चांगुलपणाची प्रत्येक कल्पना केवळ पूर्वग्रहांचे वेगवेगळे स्तर निर्माण करते. एकदा का तुम्ही एक गोष्ट चांगली, दुसरी गोष्ट वाईट म्हणून ओळखली, तर मग तुमची आकलनक्षमता पूर्णपणे विकृत होते.

Story: विचारचक्र |
14th September, 10:49 pm
चांगले किंवा वाईट नाही - फक्त शांत !

सद्गुरू : असे शिक्षक झाले आहेत ज्यांनी लोकांना चांगुलपणा शिकवला आहे. असे देखील झाले आहेत ज्यांनी लोकांना वाईट गोष्टी शिकवल्या आहेत. पण असे शिक्षक सुद्धा झाले आहेत ज्यांनी चांगले आणि वाईट दोन्हीही नष्ट करण्यासाठी सर्वकाही केले, जेणेकरून जीवन जसे हवे आहे तसे घडू शकेल; कोणत्याही चांगुलपणाच्या तत्त्वांनी किंवा अहंकाराच्या कोणत्याही विचारांनी आणि भावनांनी नव्हे. तर तेव्हाच एखाद्याला कळेल की स्वतःच्या आत शांत राहणे म्हणजे काय. चांगले लोक शांत राहू शकत नाहीत. वाईट लोक शांत राहू शकत नाहीत. फक्त तेच जे या दोन्हीकडे लक्ष देत नाहीत, जे फक्त जीवनाच्या प्रक्रियेकडे लक्ष देतात, तेच खरोखर शांत राहू शकतात. हे आणि हे

शांतता म्हणजे तुमच्याकडे स्वत:चे असे काहीही चालू नाही आहे. शांतता म्हणजे असे नाही की मला पक्ष्यांचा किलबिलाट किंवा सूर्योदयानंतरचा गजबजाट ऐकू येत नाही. शांतता म्हणजे फक्त एवढेच की मी आवाज करणे बंद केले आहे. मुळात हे सर्व आवाज सुरू झाले, कारण तुम्ही हे आणि ते असे विभाग निर्माण केले आहेत. जेव्हा हे आणि ते असते, तेव्हा शांतता असू शकत नाही. जिथे केवळ हे आणि हेच आहे, तिथेच शांतता असू शकते.

सगळीकडे, सारखा हाच प्रश्न समोर येत राहतो : "मी किती प्रमाणात अध्यात्म केले पाहिजे?" तुम्ही कितीही प्रमाणात केले तरी, तुम्ही अडचणीत याल. तुम्ही फक्त हे आणि हेच केले पाहिजे. बाकी साऱ्या गोष्टी त्यात बसल्या पाहिजेत, मग ते ठीक आहे. जर तुम्ही हे आणि ते केले, तर तुम्ही गोंधळात पडाल - हे काम करणार नाही. ज्यांनी लोकांना चांगुलपणा शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी साधारणपणे ती पद्धत स्वीकारली कारण त्या विशिष्ट काळात समाज इतक्या अस्थिर अवस्थेत होता, की सामाजिक रचनेत काही सुव्यवस्था आणण्यासाठी आणि लोक ज्यात अडकले आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांनी फक्त त्याच्या विरुद्ध गोष्ट शिकवली.

जेव्हा असे लोक होते ज्यांना "एका डोळ्याच्या बदल्यात दुसरा डोळा घ्यायचा" असे शिकवले गेले, आणि एक माणूस येतो आणि म्हणतो, "जर कोणी तुम्हाला एका गालावर चापट मारली, तर दुसरा गाल पुढे करा," हे केवळ लोकांची सध्या चालू असलेली गुंतागुंत संपवण्यासाठी होते. जर त्यांनी त्याला अजून थोडा काळ जगू दिले असते, तर त्याने गरज पडल्यावर एखाद्याच्या तोंडावर चापट कशी मारावी हे देखील त्यांना सांगितले असते किंवा कदाचित त्याने जे खरोखर गरजेचे होते फक्त तेच शिकवले. बाकीचा भाग ते तसेही शिकलेच असते.

चांगल्या आणि वाईटाच्या कल्पना

चांगुलपणाची प्रत्येक कल्पना केवळ पूर्वग्रहांचे वेगवेगळे स्तर निर्माण करते. एकदा का तुम्ही एक गोष्ट चांगली, दुसरी गोष्ट वाईट म्हणून ओळखली, तर मग तुमची आकलनक्षमता पूर्णपणे विकृत होते. त्यातून स्वतःला बाहेर काढण्याची कोणतीच संधी तुमच्याकडे नसते. तुम्ही कितीही कठोरपणे पाहिले तरी, तेच दिसेल. हे नष्ट करण्यासाठी, आम्ही योग निर्माण केला. म्हणूनच शिव, योगाचा पहिला गुरु, संहारक म्हणून ओळखला जातो. योगाची संपूर्ण कल्पना या सर्व गोष्टींचा विनाश करण्याची आहे, ज्या गोष्टी सुरुवातीला अप्रतिम दिसतात. पण काही काळानंतर तुमच्या गुंतागुंतीचं पाया बनतात.

जेव्हा शिवाने योग विस्तारित केला, तेव्हा ते त्याने अनेक प्रकारे केले. एका पातळीवर, त्याने सांगितले ते खूप जवळ आहे. त्याने पार्वतीला सांगितले, "तू फक्त माझ्या मांडीवर बस, बस्स एवढेच, तोच योग आहे." हे एखाद्या पुरुषाची स्त्रीला मांडीवर बसवण्याची युक्ती वाटते. नाही, कारण त्याने तिला फक्त आपल्या मांडीवर बसवले नाही. त्याने स्वतःचा एक भाग सोडला आणि तिला स्वतःचा भाग बनवलं. जेव्हा तिने सर्व प्रकारचे प्रश्न विचारले, तो म्हणाला, "तू काळजी करू नकोस, तू फक्त इथे बस, फक्त माझ्या मांडीवर बस, बाकी सगळं सांभाळून घेतले आहे." पण दुसऱ्याला त्याने विस्तृत पद्धती शिकवल्या, सत्याबद्दल असे बोलला की जणू ते लाखो मैल लांब आहे, कशाप्रकारे लाखो गुंतागुंतीची पावले उचलावी लागतात. तोच माणूस दोन्ही प्रकारे बोलतो.

सत्याला संबोधनाची गरज नाही

हा सर्वात सुंदर भाग आहे - तो सत्याला संबोधित करत नाही, तो त्याच्या समोर बसलेल्या लोकांना संबोधित करत आहे, कारण सत्याला संबोधित करण्याची गरज नाही आणि ते करताही येत नाही. जगाने हीच चूक केली आहे. त्यांनी नेहमीच परमतत्त्वाला संबोधित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कधीच लोकांना संबोधित केले नाही. त्यांनी नेहमीच त्यांच्या परमतत्वाच्या कल्पनेला म्हणजेच, देवाला संबोधित करण्याचा प्रयत्न केला. ज्या क्षणी तुम्ही परमतत्त्वाला संबोधित करता, तुम्ही सर्व प्रकारच्या काल्पनिक विकृतींमध्ये प्रवेश करता.

योग व्यवस्था कधीही परमतत्त्वाला संबोधित करत नाही. ती फक्त लोकांना संबोधित करते. परमतत्त्वाबद्दल काहीही करण्याची गरज नाही - ते परम आहे. जो सध्या मर्यादांच्या काही अवस्थेत आहे, त्याला संबोधित करण्याची गरज आहे. जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तर त्याने तुमच्याकडे पहावे असे अपेक्षित आहे. त्याने डोळे बंद करून प्रार्थना करावी अशी अपेक्षा तुम्ही करत नाही. तुम्ही त्याच्याकडे यासाठी नाही गेलात. तुम्हाला अपेक्षित आहे की त्याने तुमच्या शरीराकडे पहावे आणि तुमच्यात काय ठीक नाही ते शोधावे.

त्याच प्रकारे, हे लोक आहेत जे अनेक प्रकारच्या गोष्टींमधून जात आहेत. परमतत्त्व संघर्ष करत नाही. व्यक्ती संघर्ष करतात. हे व्यक्तिगत अस्तित्व आहे, जे प्रत्येक लहानसहान गोष्टीमुळे उलथापालथीतून जाते. या व्यक्तिगत अस्तित्वाला संबोधित करण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तिगत अस्तित्वाला ते आत्ता जसे आहे तसे संबोधित करणे, परमतत्त्वाला संबोधित न करणे, हेच योग विज्ञानाचे सार आहे.