गोवेकर आणि परप्रांतीय यांच्यातील तणाव कमी होऊन परस्परांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याची आजच्या घडीला नितांत गरज आहे. पोटासाठी गोव्यात होणारे स्थलांतर हे इथल्या मूळ गोमंतकीयांच्या मुळावर येऊ नये. गोव्यात राहणाऱ्यांनी गोव्याची संस्कृती आत्मसात करून इथल्या सामाजिक जीवनात योगदान देण्याची गरज आहे.
परप्रांतीयांनी गोव्यात येऊन स्थानिकांवर दादागिरी करण्याचे अनेक प्रकार हल्ली घडले आहेत. सोशल मीडियामुळे ते समोर येत आहेत. गोव्यात येऊन गोव्यातीलच लोकांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. आधीच गोव्यातील गुन्हेगारीत परप्रांतीयांची संख्या जास्त असते. मुख्यमंत्र्यांनीही अनेकदा हे बोलून दाखवले आहे. गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर त्यातूनही गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचा सहभाग जास्त असल्याचे स्पष्ट दिसते. त्याला कारणेही तशीच आहेत. गोव्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. गोव्यातील मच्छिमार व्यवसायात असलेले ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामगार परप्रांतीय आहेत. कॅसिनोसारख्या व्यवसायातील कामगार वर्ग हा बहुतांशी परप्रांतीय. गोव्यातील कारखाने, कंपन्यांमध्ये असलेला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेरचाच आहे. हॉटेल म्हणा किंवा रेस्टॉरन्ट्स, बांधकाम असो किंवा टॅक्सीसारख्या व्यवसायातील चालक असोत, हे परप्रांतातूनच गोव्यात येऊन स्थलांतरित होत आहेत. प्लंबर, पेंटर, कार्पेंटर यापासून ते दुकाने, भाजी व्यवसाय या सर्वांमध्ये गोव्यात स्थलांतरितांनी कब्जा केला आहे. साध्या मजुरापासून ते फॅक्टरीतील कामगारापर्यंत, भाजी विक्रेत्यापासून ते भुसारी दुकानापर्यंत सर्वच ठिकाणी परप्रांतातून गोव्यात स्थलांतरित झालेल्यांचे वर्चस्व दिसत असल्यामुळे हळूहळू गोवेकर इथे अल्पसंख्य झाल्याची भावना स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यातच सध्या परप्रांतीयांकडून सुरू असलेली दादागिरी हा विषयही गाजतो आहे. नेहमी रस्त्यावर हुज्जत घालताना परप्रांतीय दिसतात, पण आता त्याही पलिकडे जाऊन हातघाईवर येण्याची प्रकरणे वाढत आहेत. वेर्णातील रस्त्यावर झालेल्या किरकोळ अपघातानंतर परप्रांतीयांकडून होणारी शिवीगाळ असो किंवा होंडासारख्या गावात एका पंच सदस्याला झालेली मारहाण असो, हे सारेच प्रकार गोव्यातील जनतेला सावध करण्याचेच संकेत देत आहेत.
होंडातील तरुण पंच सदस्याला झालेली मारहाण हा सध्या सत्तरीत गाजत असलेला विषय आहे. परप्रांतीयांनी त्याला मारहाण केल्याच्या कारणावरून आता तिथल्या परप्रांतीयांची ओळख परेडही होत आहे. गोव्यातील एका पंचायत सदस्याला खुलेआम मारहाण करणारे संशयित परप्रांतीय असल्यामुळे पंचायतीने घेतलेली भूमिका पाहता गोव्यात स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यातील संघर्षाला सुरुवात होत आहे, असेच म्हणावे लागेल. गोव्यात गोवेकरच असुरक्षित होत असेल तर परप्रांतीयांना वठणीवर आणण्यासाठी स्थानिकांकडून उपाय होतीलच, पण संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परप्रांतीयांनी गोव्यात जमिनी बळकावल्या, परप्रांतीयांच्या झोपडपट्ट्या इथल्या राजकारण्यांनी पोसल्यामुळे आज तेच गोव्याचा मुख्य भाग होऊन इथल्या जमिनीवर हक्क सांगत आहेत. गोवेकर कायम उपेक्षित राहिला आणि परप्रांतातून आलेल्यांनी इथल्या जमिनी बळकावल्या, असाच प्रकार गोव्यात घडत आहे. गोवेकर आणि स्थलांतरित यांच्यात जेवढा समन्वय वाढेल, सौहार्द वाढेल, तेवढे गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगले असेल. पण, संघर्ष वाढल्यास मूळ गोवेकर कोण ते अधोरेखित करण्यासाठी जो दावा आरजीपीसारख्या पक्षाकडून केला जात आहे, ती मागणी एक दिवस सरकारसमोर संकट होऊन उभी राहू शकते.
गोवेकर आणि परप्रांतीय यांच्यातील तणाव कमी होऊन परस्परांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याची आजच्या घडीला नितांत गरज आहे. पोटासाठी गोव्यात होणारे स्थलांतर हे इथल्या मूळ गोमंतकीयांच्या मुळावर येऊ नये. गोव्यात राहणाऱ्यांनी गोव्याची संस्कृती आत्मसात करून इथल्या सामाजिक जीवनात योगदान देण्याची गरज आहे. रोज कुठे ना कुठे मूळ गोमंतकीय आणि परप्रांतीय यांच्यातील संघर्ष दिसत आहे. होंडासारख्या भागात परप्रांतीयांची गणना करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी लोक पुढे सरसावले आहेत. परवा म्हापशात मुस्लिम बांधवांना अपशब्द वापरला म्हणून हिंदू महिलेच्या विरोधात जमलेल्या शेकडो लोकांत मूळ गोमंतकीय किती होते, याची चर्चा म्हापशात आजही होत आहे. ही सुरुवात आहे. परप्रांतीयांनी गोव्याच्या संस्कृतीचा आदर राखून स्थानिकांबरोबर मिसळून राहण्याची जबाबदारी घेतली नाही, तर गोवेकराला त्याच्या अस्तित्वाच्या लढाईचा मार्ग स्वीकारण्याची स्थिती येऊ शकते आणि तो दिवस फार दूर नसेल. त्यापूर्वीच प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून गोव्यात राहण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल. स्थानिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही, याची काळजी परप्रांतीयांना घ्यावी लागेल.