जागावाटपावेळी महाआघाडीच्या नेत्यांची कसोटी!

Story: राज्यरंग |
11th September, 11:45 pm
जागावाटपावेळी महाआघाडीच्या नेत्यांची कसोटी!

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. नितीश कुमार सरकारचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होणार आहेत. या किंवा पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागू होईल. राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एनडीए आणि महाआघाडी (इंडिया) यांच्यात थेट सामना असला तरी आघाडीत कोणते पक्ष राहतात, याबाबत उत्सुकता आहे. पक्ष निश्चित झाल्यानंतर जागावाटपाची कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.

महाआघाडीतील जागावाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. डाव्या पक्षांनी गत निवडणुकीपेक्षा कमी जागा स्वीकारणार नाही, हे स्पष्ट केले आहे. व्हीआयपीचे प्रमुख मुकेश साहनी यांनी ६० जागा लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाआघाडीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी जागावाटपाबाबत अनेक मॅरेथॉन बैठका झाल्या. डाव्या पक्षांच्या नेत्यांनी ६५ ते ७० जागांची मागणी केली आहे. मागणी पूर्ण झाली नाही तर स्वबळावर लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

२०२० मध्ये डाव्या पक्षांना महाआघाडीत २९ जागा मिळाल्या होत्या. सीपीआय (एमएल)ने १९ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. सीपीआयने ६ पैकी २ जागांवर विजय मिळवला होता. सीपीआय(एम)ने ४ पैकी २ जागांवर विजयीध्वज फडकवला होता. महाआघाडीच्या नेत्यांची बैठक १५ सप्टेंबर रोजी पाटण्यात होणार आहे. त्यावेळी महाआघाडीचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्ष महाआघाडीत सहभागी आहे. पूर्णिया, बांका, धमदाहा, चकाई, तारापूर, कटोरिया मतदारसंघ जेएमएमला मिळू शकतात. बांका, कटोरिया, चकाई, तारापूर हे झारखंड सीमेवरील मतदारसंघ आहेत. तिथे जेएमएमचा प्रभाव आहे. धमदाहामध्ये आदिवासी मतदारांची संख्या अधिक आहे. जागावाटप निश्चित झाल्यानंतरच जेएमएमला किती आणि कोणत्या जागा मिळतात, हे कळणार आहे. सीमावर्ती आणि आदिवासी बहुल भागात जेएमएमचे मोठे मतदार आहेत. त्यामुळे आघाडीला मतांची संख्या वाढविण्यास मदत मिळू शकते. २०१० च्या निवडणुकीत चकाईमधून जेएमएमचा उमेदवार विजयी झाला होता. २०१५ च्या निवडणुकीत जेएमएमने ३२ जागा लढवल्या; मात्र एकाही जागेवर त्यांना अनामत रक्कमही वाचवता आली नव्हती. 

काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अलावरू यांनी स्पष्ट केले की, ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला महाआघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेशी काँग्रेसचा संबंध नाही. महाआघाडीत शेवटपर्यंत किती पक्ष रहातात आणि त्यांची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- प्रदीप जोशी