गोव्याचे शाश्वत पर्यावरणीय पर्यटन

पर्यावरणीय पर्यटन राबवताना आपण त्या त्या परिसरातल्या धबधबे, डोह, जंगलक्षेत्र यांनाच संकटांच्या खाईत लोटण्यात आहोत, ही कटू वस्तुस्थिती आहे. या साऱ्या बाबींचा विचार करून पर्यावरणीय पर्यटनाचे प्रकल्प राबवणे शक्य आहे.

Story: विचारचक्र |
09th September, 11:09 pm
गोव्याचे शाश्वत पर्यावरणीय पर्यटन

गोव्याची भूमी निसर्गसुंदर असल्याकारणाने आणि इथे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना राज्यात शांती, स्थैर्य आणि धार्मिक सहिष्णुता यामुळे पोषक वातावरण असल्याने, हे राज्य पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरलेले आहे. गोवा मुक्तीनंतर तत्कालीन गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील सरकारने गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना लाभावी म्हणून सागर किनाऱ्यावरील पर्यटनाला राजाश्रय दिला आणि अल्पावधीत गोवा देश-विदेशातील पर्यटकांसाठी सातत्याने आकर्षण ठरलेला आहे. सागरी पर्यटनाच्या अंतर्गत ठिकठिकाणी जे प्रकल्प सरकारने हाती घेतले होते, त्यात नियोजनाचा अभाव आणि पर्यावरणीय मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याने आज या व्यवसायाने राज्यात केरकचरा, सांडपाणी व्यवस्थापनात दूर्लक्ष आणि बेशिस्त निर्माण केल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगण्याची पाळी गोवा राज्यावर आलेली आहे.

पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टी यांच्या कुशीत वसलेला गोवा आज बारामाही पर्यटकांना खुणावत आहे. इथे येणारे पर्यटक आज कायमचे वास्तव्य करण्यास गोवा राज्यास अधिक प्राधान्य देत असल्याने, आपला दुसरा बंगला उभारण्याच्या नादात अव्वाच्या सव्वा किंमतीत जमिनी खरेदी करण्यात गुंतलेले असतात. त्यामुळे गोव्यातील जमिनीच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढत असून शेती, बागायती, खासगी जंगलक्षेत्रात ही बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. गोव्यातील कोमुनिनाद संस्थेने राज्यातील मोक्याच्या जमिनीत गेल्या पाव शतकापासून चालू असलेल्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण प्रस्थापित  केले नसल्याने या जमिनीत झोपडपट्ट्यांचे प्रस्थ निर्माण होऊन, त्यांना रोखण्यात आपण अपयशी ठरत आहोत.

गोव्यात आजच्या घडीला ५ अभयारण्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान असून सरकारी राखीव जंगल क्षेत्राबरोबर खासगी जंगल क्षेत्रात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण जैविक संपदेच्या पैलूंचे दर्शन अनुभवायला मिळते. डिचोली तालुक्यातील शेतीप्रधान सुर्ला या गावात जी पूर्वातील राई आहे, तिला गोवा राज्यातील पहिल्या नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेला आहे. शेकडो वर्षांपासून तेथील कष्टकरी समाजांनी या देवराईतील समस्त जैविक संपदेच्या घटकांचे पूर्वापार रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. काणकोणहून आलेल्या मल्लिकार्जुन देवाने सुर्ला गावात आतंक, भय निर्माण करणाऱ्या बेताळाला तेथील विहिरीत बंदिस्त करण्यात आल्याची श्रद्धा रूढ असल्याने, या देवराईत वृक्षतोड करण्यासाठी कोणी धाडस करत नसे आणि त्यामुळे ही एका बाजूला शेती, बागायतीचे क्षेत्र असून आणि दुसऱ्या बाजूला लोह खनिज उत्खनन चालू असताना, ही देवराई सुरक्षित ठेवण्यात गावाने महत्त्वाचे योगदान केलेले आहे. आज सुर्ला गावातील पूर्वातली ही देवराई संपूर्ण गोवा राज्यात पहिले अधिसूचित जैवविविधता स्थळ म्हणून मान्यता मिळवलेली आहे.

दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील काकोडा गावातला नंदा तलाव भारत सरकारच्या अधिसूचनेद्वारे आंतरराष्ट्रीय पाणथळ यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. हा तलाव काकोडा गावाची शान असून, इथल्या लोकांच्या शेती, बागायती पिकांबरोबर चवदार माशांची पैदासी करण्याला हातभार लावला होता. हा तलाव देश-विदेशातील असंख्य पक्षांसाठी आश्रयस्थान ठरलेले आहे. आजच्या काळात जेव्हा पाणथळ जागा झपाट्याने उद्ध्वस्त होत चाललेल्या आहेत, अशा प्रतिकूल परिस्थितीत हा तलाव जैविक संपदेच्या विविध घटकांचे संवर्धन करत आहे.

निसर्गाशी सामंजस्य आणि शाश्वत विकास ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाची संकल्पना असून, एकेकाळी गोव्यातील समाजाने देवराईच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन आणि जैविक संपदेचे रक्षण करण्यासाठी लोकश्रद्धेचा आधार घेतला होता. देव तळ्याच्या आधारे समस्त जलचरांचे रक्षण केले होते. मासे, कासव, बेडूक या साऱ्या घटकांना संरक्षण दिले होते, देव विहिरीच्या माध्यमातून तेथील पाण्याचे पावित्र्य जपण्याबरोबर जलस्त्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण केलेले आहे. गोवा वन खात्यातर्फे इथल्या सदाहरित जंगलाचे सजीव संचित असणाऱ्या मलाबार ट्री निम्फ या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा सन्मान लाभलेला आहे. आज राज्यातील या नैसर्गिक वारश्याचे संरक्षण करण्याऐवजी आपण त्याच्या अस्तित्वाला प्रतिकुल करून टाकलेले आहे, याचे विस्मरण आपणाला होऊ लागलेले आहे. पर्यावरणीय पर्यटनाचे नियोजनबद्ध प्रकल्प हाती घेण्याएवजी आपण वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना राजाश्रय देऊन आमच्याच अस्तित्वाला जर्जर करू लागलो आहोत. ही बाब गोव्याच्या हष्टीने दिवसेंदिवस प्रतिकुल ठरू लागली आहे. त्यासाठी शाश्वतरित्या पर्यावरणीय प्रकल्प राबवण्यात अपयशी ठरत आहोत.

जंगलक्षेत्र, जलस्त्रोत, पाणथळीच्या जागा, शेती बागायतीच्या जमिनी, जैविक संपत्तीची वैभव मिरवणारी पठारे वगळून अन्य जमिनीत पर्यावरणीय संकेतांचे पालन करून पर्यावरणीय पर्यटनाचे प्रकल्प कसे यशस्वीपणे लोक सहभागातून राबवता येतात त्याचा आराखडा सरकारकडे नसतो आणि त्यामुळे विकासाच्या नावाखाली येऊ घातलेले प्रकल्प वादग्रस्त ठरत असतात. सरकारकडे यापूर्वी पर्यावरणीय पर्यटन राबवण्यासाठी जेथे जेथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचाच वापर होत नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. साळावली धरणाच्या जलाशयाच्या भोवताली गोवा पर्यटन महामंडळाने ज्या इमारतींचे बांधकाम केलेले आहे, त्या विनावापर पडून आहेत. पेडणेतील मोरजी खिंड येथील पाणथळीच्या जागा त्याच प्रमाणे खारफुटी आणि अन्य वनस्पती संपदेच्या अस्तित्वाकडे कानाडोळा करून उभारलेली पर्यटन कुटीरे वापराविना आहेत. गोव्यात अभयारण्यांच्या परिसरात स्थानिकांनी होम स्टेसाठी यापूर्वीच  शाश्वतरित्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांच्याशी समन्वय साधून त्यांना या पर्यावरणीय पर्यटनात सहभागी करून घेणे शक्य आहे. पक्षी निरीक्षण, फुलपाखरांचे दर्शन ,

पाणथळींची भ्रमंती, निसर्ग संपन्न बेटांची भटकंती आदी उपक्रम राबवून पर्यटनास चालना मिळू शकते. आपण एखाद्या प्रदेशाची पर्यटक धारण करण्याची क्षमता याचा विचार न करता सागरी पर्यटनाला चालना दिल्याने आज कळंगुट ते पाळोळेपर्यंत रस्तोरस्ती, जागोजागी बेशिस्तीचे, गैरसोयीचे प्रस्थ निर्माण झालेले पहायला मिळत आहे.

त्यामुळे पर्यावरणीय पर्यटन राबवताना आपण त्या त्या परिसरातल्या धबधबे, डोह, जंगलक्षेत्र यांनाच संकटांच्या खाईत लोटण्याचा खटाटोप करत आहोत, ही कटू वस्तुस्थिती आहे. या साऱ्या बाबींचा विचार करून पर्यावरणीय पर्यटनाचे प्रकल्प राबवणे शक्य आहे.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५