ई-बसच्या चालकांना कदंबने आताच ताळ्यावर आणावे

Story: अंतरंग |
14th September, 10:48 pm
ई-बसच्या चालकांना कदंबने आताच ताळ्यावर आणावे

करदात्यांचे करोडो रुपये खर्चून पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण करण्यात आले. सध्या काही भागात रस्त्यांच्या बाजूची किरकोळ कामे सुरू आहेत. या प्रकल्पात प्रामुख्याने शहरातील ६० वर्षे जुन्या सांडपाणी वाहिन्या काढून त्या रस्त्याच्या खाली एका बाजूला आणणे, सेवा वाहिन्या घालणे, रस्ते रुंदीकरण, पदपथ बांधणे यांचा समावेश होता. मुळात शहरातील सांडपाणी वाहिन्या खराब झाल्या आहेत हे समजण्यासाठी ६० वर्षांचा कालावधी का लागला? राज्य सरकारने करणे अपेक्षित असणाऱ्या कामांसाठी स्मार्ट सिटीचा करोडो रुपयांचा निधी वापरणे योग्य होते का? सांडपाणी वाहिन्या, रस्ते या गोष्टी 'स्मार्ट' या प्रवर्गात मोडतात का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. याच निधीचा वापर अत्याधुनिक साधन सुविधा उभारण्यासाठी करता आला असता. पणजीला केवळ नावापुरते राजधानीचे शहर न ठेवता खरोखरच अत्याधुनिक राजधानीप्रमाणे बनवता आले असते. 

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात लोकांच्या फायद्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी ई-बस आहे. कदंब महामंडळाच्या सहकार्याने सुरू झालेल्या या ई-बसेसमुळे पणजीतील अंतर्गत भागांसह आजूबाजूचे निमशहरी भाग जोडले गेले आहेत. सामान्य लोकांना माफक दरात चांगल्या प्रकारची आणि एसी सेवा देणाऱ्या या बसेस लोकप्रिय झाल्या आहेत. या सेवेतील मिरामार-बांबोळी मार्गावरील बस सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. विशेष करून विद्यापीठ, गोमेकॉमध्ये जाणाऱ्यांसाठी ही बस सोयीची ठरत आहे. सांतिनेज, ताळगाव, पणजीतील अंतर्गत मार्गांवर धावणाऱ्या बसेस देखील उपयुक्त ठरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बसचे वेळापत्रक गुगल मॅपवर देण्यात आले आहे. यामुळे ठराविक मार्गावरील बस नेमकी कधी येणार, याची लाईव्ह माहिती मोबाईल मधून मिळत आहे.

आकडेवारी पाहता ई-बस सेवा जुलै २०२४ मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत २१ लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दर्जेदार सुविधा दिल्यास लोक त्याचा वापर करतात, हे यातून सिद्ध होते. या बसनी १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या इलेक्ट्रिक बसेस असल्याने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी झाले आहे. जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. या बस सेवेमुळे महिन्याला सरासरी ६६.५ टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होत आहे. दर कुटुंबी वाहनांची संख्या देशात सर्वाधिक असणाऱ्या गोव्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. कदंबने काही मार्गावर ई-बस सेवा याआधीच सुरू केली आहे. राज्यातील प्रमुख शहरे ई-बसने जोडली पाहिजेत. 

अर्थात पणजीतील स्मार्ट सिटी बस सेवेमध्ये काही दोष देखील आहेत. या बस अधिकृत बस थांबा नसणाऱ्या ठिकाणी देखील थांबा घेतात. प्रवाशांनी रस्त्यात कुठेही हात दाखवला की या बस थांबतात. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बसने केवळ अधिकृत थांबे घेतले तर वाहतूक कोंडी कमी होईल. सेवेतील दुसरा दोष म्हणजे काही चालक बस भरधाव वेगाने चालवत आहेत. विशेष करून सकाळी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून या गाड्या अती वेगाने चालवल्या जात आहेत. अन्य वाहन चालकांनी या वेगाची जणू धास्ती घेतली आहे. नुकताच या बसचा अपघात झाला होता. 

भविष्यात मोठी दुर्घटना टाळायची असेल तर कदंबने आताच या चालकांना ताळ्यावर आणले पाहिजे.

- पिनाक कल्लोळी