भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भावनांचा उत्सव आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी देशातील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. मात्र अलीकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामना खेळवावा का, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. देशभरातून या सामन्याविरोधात आवाज उठवण्यात आला. चाहते, सामाजिक संघटना तसेच काही राजकीय पक्षांनी हा सामना थांबवण्याची मागणी केली होती. तरीही हा सामना नियोजित वेळेनुसार खेळवण्यात आला. या सामन्याची खरोखरच आवश्यकता होती, असा सवाल आता चाहते करत आहेत.
पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या घटनेने देश हादरून गेला. भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानविरुद्ध खेळण्यात येणारा सामना केवळ खेळ म्हणून न बघता, तो राष्ट्रीय भावनांशी जोडला गेला. अनेकांनी सोशल मीडियावर #BoycottIndPakMatch असे हॅशटॅग चालवून सामना रद्द करण्याची मागणी केली.
या विरोधाकडे दुर्लक्ष करून बीसीसीआयने नियोजित कार्यक्रमानुसार हा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. सरकारनेही या निर्णयावर आक्षेप घेतला नाही. ‘क्रीडा आणि राजकारण वेगळे ठेवावेत,’ असे कारण पुढे केले. मात्र, चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की निष्पाप लोकांचे प्राण आणि जवानांचे बलिदान बीसीसीआय व सरकार विसरले का?
या सामन्या दरम्यान नाणेफेक आणि सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. कर्णधार सूर्यकुमारने विजय पहलगाम हल्ल्यातील मृतांना आणि भारतीय जवानांना समर्पित असल्याचे सांगितले. मात्र तरीही चाहते पाकिस्तानसोबत सामने खेळूच नये, असे म्हणत आहेत. सामना खेळवण्याचा निर्णय बीसीसीआय व सरकार यांच्यातील धोरणात्मक भूमिकेवर आधारित होता. पण याच कारणावरून दोघांवर टीका झाली. काहींच्या मते, बीसीसीआय आर्थिक फायद्याला प्राधान्य देते आणि चाहत्यांच्या भावना दुर्लक्षित करते. सरकारकडूनही स्पष्ट भूमिका न घेतल्याने लोकांमध्ये नाराजी होती. विरोधकांनी टीका केली की, जिथे रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तेथे क्रिकेट सामना खेळणे गरजेचे होते का?
भारत-पाकिस्तान सामन्याचे महत्त्व क्रिकेटच्या चाहत्यांसाठी नेहमीच वेगळे राहिले आहे. परंतु या वेळी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्याने भावनिक वादंग निर्माण केला. देशातील शहीद जवानांचा विचार करता, खेळ खरोखरच सर्वांत महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की, क्रिकेट केवळ खेळ नसून तो देशवासीयांच्या भावनांशीही जोडला गेलेला आहे.
- प्रवीण साठे