जीसीएने आपल्याकडील निधीचा वापर गोव्याच्या हितासाठी होईल, अशा पद्धतीने प्रयत्न करावेत. निवडणूक झाली तिथे राजकारण संपले. आता क्रिकेटचा विकास, क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आणि गोव्यातील क्रिकेटपटूंना चांगले प्रशिक्षण हेच जीसीएचे ध्येय असावे.
गोवा क्रिकेट संघटनेची बहुचर्चित निवडणूक पार पडली आणि अपेक्षेप्रमाणे भाजपचे समर्थन असल्याचे मानले जाणाऱ्या परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव झाला. राज्यात सरकार कोणाचेही असले तरी गोवा क्रिकेट संघटनेचे राजकारण हे वेगळेच आहे. काही राज्यांमध्ये क्रिकेट संघटनेच्या राजकारणाची जी स्थिती, तीच गोव्यातल्या संघटनेची. संघटना कोळून प्यायलेल्यांना राज्यात कोणाची सत्ता आहे त्याच्याशी फार देणे घेणे नसते. जीसीए ही कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात गुंतलेली संस्था आणि त्यांचे राजकारणही वेगळे. कितीही आरोप झाले आणि घोटाळे झाले तरी तेच लोक पुन्हा निवडून येतील याची खात्री असते. दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू फडके, अकबर मुल्ला अशा अनेकांची जीसीएमधील कारकीर्द नेहमी वादग्रस्त ठरली. बनावट तिकीट छपाईपासून जीसीएच्या निधीची अफरातफर असे अनेक किस्से सर्वश्रुत आहेत आणि गुन्हेही नोंद झाले. पण जेव्हा मतदान जवळ येते त्यावेळी या साऱ्या गोष्टींना काही महत्त्व राहत नाही. ज्या गोष्टी घडतात त्याच्याशी क्लबना काही देणेघेणे नसते. पुन्हा तेच लोक निवडून येतात. या इतिहासाची पुनरावृत्ती यावेळीही झाली. विशेष म्हणजे कधीकाळी शत्रू असलेले फडके-देसाई यांचे गट यावेळी एकत्र आले. गोवा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत चेतन देसाई यांच्या गटाने निवडणुकीत बाजी मारली. विद्यमान अध्यक्ष विपुल फडके यांचा महेश देसाईंना पाठिंबा आहे. महेश कांदोळकर यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी निवडणूक घेण्यापेक्षा महेश देसाई यांना बिनविरोध निवडून देण्यासाठीही प्रयत्न झाले, पण भाजपचा पाठिंबा असलेल्या काहीजणांना ते मान्य नव्हते. त्यामुळेच महेश देसाई यांचा विजय व्हावा म्हणून अनेकांनी कंबर कसली. सूरज लोटलीकर, बाळू फडके, विपुल फडके, अकबर मुल्ला हे सारे एकत्र आले. पूर्वी यातील अनेकजण एकमेकांच्या विरोधात होते. मात्र यावेळी सर्वांनी एकत्र येऊन रोहन गावस देसाई जे जीसीएचे सचिव होते, त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला. रोहन देसाई हे भाजपचे अत्यंत जवळचे. कुडचडे मतदारसंघातून ते २०२७ ची निवडणूकही लढवण्याची शक्यता आहे. ते बीसीसीआयचे संयुक्त सचिव आहेत आणि दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. जीसीएचे गोव्याचे प्रतिनिधी म्हणून रोहन देसाई बीसीसीआयवर तूर्तास राहतील. चेतन देसाई यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते, पण या निवडणुकीपूर्वी त्यांच्यात मतभेद झाले असे मानले जाते. या सगळ्यांत शेवटी चेतन देसाई यांनी बाजी मारली. आपले संपूर्ण पॅनल जीसीएवर निवडून आणण्याची आपली क्षमता आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. या निवडणुकीत गरज नसताना भाजपचा पाठिंबा आहे असे भासवणाऱ्यांचा पूर्ण पराभव झाला. मुळात खरोखरच भाजपचा पाठिंबा त्यांना होता की भाजपला जवळ असल्यामुळे तसे चित्र निर्माण केले गेले, ते मात्र कळण्यास मार्ग नाही.
शेवटी जीसीएची निवडणूक पार पडलेली आहे. आता गोव्याचे एक अपुरे स्वप्न आहे ते म्हणजे गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान व्हावे. असे मोठे प्रकल्प गोव्याला परवडणारे नसले तरीही जीसीए जागा घेऊन आपल्या खर्चाने मैदान बांधत असेल तर ते गोव्याच्या हिताचेच आहे. गोव्याच्या पर्यटनाला आणि एकूणच अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. गोव्यात पुन्हा क्रिकेटचे सामने होऊ शकतात. त्यामुळे क्रिकेट मैदानाची आवश्यकता आहेच. ते धारगळला व्हावे असे आता निवडून आलेल्या समितीचे म्हणणे आहे. मैदान मावळिंगे - डिचोलीत व्हावे असे रोहन देसाई यांच्या गटाचे प्रयत्न होते. आता महेश देसाई यांच्या नेतृत्वाला मैदानाचा निर्णय घ्यावा लागेल. बीसीसीआयकडून जीसीएला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत येते त्यामुळे त्यातून गोव्यातील क्रिकेटपटूंना चांगले प्रोत्साहन, प्रशिक्षण देण्याचे काम जीसीएने करावे. गोव्यातील क्रिकेटपटू भारतीय संघात निवडले जातील अशा पद्धतीने पुढील काही वर्षे ध्येयाने काम करावे लागेल. जीसीएने आपल्याकडील निधीचा वापर गोव्याच्या हितासाठी होईल, अशा पद्धतीने प्रयत्न करावेत. निवडणूक झाली तिथे राजकारण संपले. आता क्रिकेटचा विकास, क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आणि गोव्यातील क्रिकेटपटूंना चांगले प्रशिक्षण हेच जीसीएचे ध्येय असावे.