जुने गोवे : सेंट ऑगस्टीनचा मनोरा

१८४२ मध्ये ऑगस्टीन चर्चचा घुमट कोसळला आणि त्या मातीखाली संत ऑगस्टीन आणि अवर लेडी ऑफ ग्रेसच्या मूर्ती गाडल्या गेल्या. हे चर्च आणि त्याच्या परिसराची पाहणी केल्यास त्याच्या वैभवाची कल्पना येते.

Story: विचारचक्र |
16th September, 10:28 pm
जुने गोवे : सेंट ऑगस्टीनचा मनोरा

येशू ख्रिस्ताने मांडलेल्या मानवोपयोगी तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला जीवन जगण्याची प्रेरणा दिली. कोणत्याही शास्त्रावर, सिद्धांतावर किंवा सूत्रावर आधारण्याऐवजी या धर्माने येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून आपली वाटचाल सुरू केली. 'ख्रिस्त' या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ 'स्वर्गातून पवित्र आत्म्याने येशूचा अभिषेक केला' असा मानला जातो. ख्रिस्ती धर्माने आकाशातील पिता, त्याचा पुत्र येशू आणि पवित्र आत्मा यांना ईश्वराचे स्थान दिले आहे. इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रवेश होण्यापूर्वी ५०० वर्षे त्याचा प्रसार सेंट थॉमसने इ. स. ५२ साली केरळमधील मलबारमध्ये केला होता. ख्रिस्ती धर्म आणि तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करण्याचे काम ज्या धर्मगुरूने केले, त्यात संत ऑगस्टीन यांना महत्त्वाचे स्थान आहे.

रोमन साम्राज्यातील नुमिडिया या आफ्रिकेतील थागास्ते (सध्याच्या अल्जेरिया देशात) प्रांतात १३ नोव्हेंबर ३४५ रोजी त्यांचा जन्म झाला. ख्रिस्ती धर्म आणि तत्त्वज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. जेव्हा पोर्तुगीजांनी गोव्यातील तिसवाडी प्रांत जिंकून घेतला, तेव्हा त्यांनी येथील भूमिपुत्रांना सक्तीने ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यास सुरुवात केली. तिसवाडीत डोमिनिकन, बार्देशात फ्रान्सिस्कन आणि सासष्टीत जेझुईत पंथांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्याचे काम सुरू केले. तेव्हा संत ऑगस्टीन यांच्या विचारधारेला मानणाऱ्या पंथांनी तिसवाडीत प्रवेश केला. धर्म, तत्त्वज्ञान आणि ख्रिस्तविचाराचा समग्र अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, म्हणून जुने गोवे येथील सांतामोनिका अध्यासनाजवळ असणाऱ्या पवित्र डोंगर टेकडीच्या ठिकाणी ऑगस्टीन पंथांनी महाविद्यालय स्थापन केले. संत ऑगस्टीनचे सुधारणावादी आणि मानवोपयोगी विचार गोव्यात रुजवण्यासाठी ऑगस्टीन पंथांनी प्रयत्न सुरू केले. जुने गोवे येथे धर्माचे शिक्षण देणारे महाविद्यालय आणि संत ऑगस्टीन यांची स्मृती कायम राहावी, म्हणून आतानिओ दी पाशात यांनी जबाबदारी स्वीकारली. त्याला १५८७ साली तत्कालीन पोर्तुगीज राजाने आपले राजकीय पाठबळ दिले. महाविद्यालय, सेंट ऑगस्टीन यांचे चर्च आणि मनोरा उभारल्यावर हा परिसर प्रकाशात आला.

१८०२ मध्ये ऑगस्टीन चर्च आणि मनोऱ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर जगभरातील ऑगस्टीन पंथीयांसाठी जुन्या गोव्यातील वास्तू आदर आणि सन्मानाचे प्रतीक ठरली. स्पेनमधील 'बसिलिका ऑफ इस्कोरियल' आणि पोर्तुगालमधील लिस्बन येथे असलेल्या 'सेंट विन्सेंट दी फोरा' या ऑगस्टीन पंथीयांच्या चर्चच्या यादीत गोव्यातील ऑगस्टीन चर्चला स्थान मिळाले. पोर्तुगालच्या सत्ताधीशांच्या पाठबळामुळे जुने गोवे येथील हे चर्च आपल्या वैभवाच्या शिखरावर पोहोचले. या चर्चचे दर्शन घेतलेल्या यात्रेकरूंनी आपल्या लिखाणात येथील मठ आणि महाविद्यालयाची तुलना केंब्रिज आणि एडिनबर्ग येथील विद्यापीठांशी केली होती.

ऑगस्टीन पंथीयांनी येथील चर्च, मनोरा आणि मठ यांचे बांधकाम जांभ्या दगडांनी आणि चुन्याचा वापर कल्पकतेने करून केले होते. या इमारतीच्या मध्यभागी सुबक घुमट होता, ज्यातून त्या काळातील प्रचलित अभियांत्रिकी कौशल्य आणि वास्तुकलेचे विविध पैलू दिसून येत होते. अवकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या या चर्चचा मनोरा ४६ मीटर उंचीचा होता आणि त्यात त्या काळातली सर्वात मोठी घंटा घंटागृहात ठेवण्यात आली होती. ही घंटा १७४९ साली जाओ निकोलाव लेताची या पोर्तुगालमधील कारागिराने तयार केली होती. पोर्तुगालहून राजाची जहाजे गोवा शहरात पोहोचल्यावर राजघरातील नव्या सदस्याच्या जन्मोत्सवानिमित्त तसेच 'फेस्ता'च्या शुभेच्छा देण्यासाठी ही घंटा वाजवली जायची.

१८३५ मध्ये पोर्तुगीज सरकारने ऑगस्टीन पंथीयांवर बंदी घातली आणि गोव्यात त्यांच्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे तेथील धर्मगुरू, विद्यार्थी आणि मठात वास्तव्यास असणारे बरेच जण निघून गेले. संधीसाधू पोर्तुगीजांनी मठातील सारी मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली. कालांतराने एकेकाळी गजबजलेल्या या परिसराला अवकळा आली. ऑगस्टीन मनोऱ्यातील घंटागृहातील एक घंटा पणजीला तर दुसरी आगवादच्या किल्ल्यावर नेण्यात आली. १८४२ मध्ये ऑगस्टीन चर्चचा घुमट कोसळला आणि त्या मातीखाली संत ऑगस्टीन आणि अवर लेडी ऑफ ग्रेसच्या मूर्ती गाडल्या गेल्या. येथील आठ चॅपेल आणि अन्य चार पवित्र स्थळे या पडझडीमुळे नामशेष झाली. हे चर्च आणि त्याच्या परिसराची पाहणी केल्यास त्याच्या वैभवाची कल्पना येते.

आज येथे जे जीर्ण अवशेष आहेत, त्यांच्या निरीक्षणातून एकेकाळी हा परिसर लॅटिन धर्म आणि संस्कृतीच्या प्रभावामुळे ज्या संपत्तीने युक्त होता, त्याची प्रचिती येते. जुने गोवे येथे जी जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात संत ऑगस्टीनशी संबंधित ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंचा समावेश झालेला आहे. हा परिसर युरोपातील ख्रिस्ती धर्मियांमध्ये संतपदाला पोहोचलेल्या राणी केतावनच्या मृतदेहाच्या अवशेषांना दफन केल्याच्या ऐतिहासिक संदर्भामुळे प्रकाशात आला. जॉर्जिया राष्ट्राने राणी केतावनला आपली आश्रयदात्री संत म्हणून घोषित केल्याने तेथील शिष्टमंडळे तिच्या मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेण्यास अनुमती मिळावी म्हणून १९८९ पासून भेट देत होती.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या गोवा येथील कार्यालयाने जॉर्जियन सरकारच्या मदतीने आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा उपयोग करून मनोऱ्याच्या परिसरात उत्खनन केले. त्यानुसार राणीच्या उजव्या हाताचे आणि अन्य अवयवांचे अवशेष या परिसरात शोधण्यात यश आले. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने हे अवशेष राणी केतावनचेच असल्याचे सिद्ध केले.

१६१३ मध्ये पर्शियाचा शहा अब्बासने जॉर्जिया जिंकून राणी केतावनला बंदीवान म्हणून नेले. राणीने धर्मांतर करून आपल्याशी लग्न करावे म्हणून शहाने तिच्यावर प्रचंड दबाव आणला. परंतु तिने स्पष्ट नकार दिल्याने तिचे हाल करून हत्या करण्यात आली. १६२४ मध्ये पोर्तुगीजांनी विशेष प्रयत्नांती तिचा मृतदेह शिराज प्रांतातून जॉर्जियात आणून विधीपूर्वक तिचे दफन केले. ख्रिस्ती धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी तिने हौतात्म्य पत्करल्याने ती आदरास पात्र ठरली आणि त्यामुळे तिला संतपद दिले गेले. राणीच्या मृतदेहाचा उजवा हात आणि बाही गोव्यात आणून संत ऑगस्टीन चर्च आणि मनोऱ्याच्या परिसरात दफन करण्यात आली होती.

राणीच्या अवशेषांमुळे आणि एकंदर येथील चर्च, मनोरा, मठ आदी ऐतिहासिक वास्तूंच्या जीर्ण अवशेषांमुळे या परिसराला विशेष महत्त्व लाभले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात असलेला हा वारसा आपल्याला शेकडो वर्षांचा इतिहास आणि संस्कृतीची प्रचिती आणून देतो.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५