तपासणीअंती अफवा असल्याचे निष्पन्न
पणजी : येथील उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी ईमेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र, बाॅम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाने परिसरातील तपासणी केल्यानंतर ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.
पणजी येथील उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल आला. धमकी मिळाल्यानंतर या संदर्भात पणजी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांकरवी कारवाई सुरू केली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकासह पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने दाखल झाली.
संपूर्ण परिसराला घेराव घालत प्रशिक्षित स्निफर कुत्र्यांच्या मदतीने बॉम्ब निकामी करणाऱ्या तज्ञांनी कार्यालयाची बारकाईने तपासणी केली.
शोध मोहीम सुरू असताना सर्व कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत बाहेर काढण्यात आले. परिसराची कसून तपासणी केल्यानंतर, सदर ईमेल खोटा असल्याचे आढळून आले.