भाईड-कोरगाव येथे महिला पंचाचा विनयभंग

पेडणे पोलिसांत तक्रार दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
भाईड-कोरगाव येथे महिला पंचाचा विनयभंग

पेडणे : कोरगाव पंचायतीच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये धोकादायक झाडे कापण्यासाठी गेलेल्या सरकारी यंत्रणेला कामात व्यत्यय आणून स्थानिक पंच सदस्य कल्पिता कलशावकार यांचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्पिता यांनी पेडणे पोलीस स्थानकात उदय प्रभू देसाई व त्यांचे पुत्र उगम यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

भाईड कोरगाव येथील वयस्कर महिला चंपावती सोनू धारगळकर यांच्या घरावर असलेले झाड धोकादायक स्थितीत होते. हे झाड कापण्यासाठी सदर महिलेने कोरगाव पंचायतीकडे अर्ज केला होता. त्यानुसार, कोरगाव पंचायतीने आपत्कालीन व्यवस्थापन या अंतर्गत त्याची माहिती पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाला दिली होती. पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत झाड कापण्याचे आदेश दिले होते. पोलीस संरक्षणात हे झाड कापण्यासाठी शुक्रवारी सकाळी भाईड कोरगाव येथे सरकारी यंत्रणा गेली असता त्या ठिकाणी उदय प्रभू देसाई व त्यांचे पुत्र उगम यांनी झाड कापणाऱ्या व्यक्तींना अडथळा आणला. तसेच झाड कापण्यासाठी मज्जाव केला. स्थानिक पंचाला पोलिसांनी बोलावून घेतले, त्यावेळी हुज्जत घालून त्यांचा व्हिडिओ आणि फोटो काढण्याचे काम उदय प्रभू देसाई यांनी केले. त्यांचा हात ओढत विनयभंग केल्याची तक्रार स्थानिक पंच सदस्य तथा माजी उपसरपंच कल्पिता कलशावकर यांनी पेडणे पोलीस स्थानकात दिली.

पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी यासंबंधी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती दिली. 

हेही वाचा