वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटते की हे टाळता आले असते! मानवनिर्मित अपघाताला क्षमा नाही. त्यामुळे त्या गेलेल्या प्राणांची जबाबदारी प्रशासन, धोंड, भक्तगण, देवस्थान समिती यासह समाज म्हणून आपल्यावरही येते.
२०१० साली ‘लईराईक गरज देवराईची’ अशा शीर्षकाचा लेख दै. ‘सुनापरान्त’ या वर्तमानपत्रात लिहिला होता. देवी लईराईची साडी हिरवी, कळसरुपी देवी म्हणजे पाण्याची पूजा अशा परिस्थितीत शिरगाव गावाची खाण व्यवसायाने केलेली अपरिमित हानी आपल्याला दिसते. खाणींमुळे पाणी गायब झालेले आहे. शिरगावच्या जत्रेच्या धोंडांना आंघोळीसाठी तळ्यात टँकरने पाणी आणून भरावे लागले, यासारखे वैषम्य ते काय? तेव्हा प्रत्येक धोंडाने देवी लईराईच्या साडीप्रमाणे शिरगाव हा गाव हिरवागार करण्यासाठी किमान एक झाड तरी लावावे, अशी सूचना मी त्या लेखात केलेली होती. गावात झाडे नाहीत, पाणी नाही अशा परिस्थितीत हजारो लाकडांचे होमखंड आपण कसे पेटवतो? त्यासाठी लाकडे बाहेरूनच आणावी लागतात. आता तर गोव्यात सुद्धा एवढी लाकडे मिळणे मुश्कील. तेव्हा त्या बाबतीतही गावाला स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे अपेक्षित होते. पर्यावरणाबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे, भक्त संख्येमुळे इतर अनेक समस्या निर्माण होत आहेत.
आपत्कालीन प्रशासकीय यंत्रणा कुठलीही घटना घडली की जागी होतेच. सरकार दरबारी जे काही होईल ते होणारच आहे, पण आपण भक्त म्हणून काय करू शकतो? याचा एक विचार लईराईच्या प्रत्येक धोंडाने केला पाहिजे अन् भक्तांनीही केला पाहिजे.
धोंड हा व्रतस्थ असतो. पाच दिवस शाकाहार, ओल्या अंगाने आहार, जत्रेच्या दिवशी २४ तास उपवास, भयंकर उन्हाच्या झळा, अती गर्दी या सगळ्यामुळे तो त्रासलेला असतो. गर्दी जास्त होण्याचा काळ हा तिसरा चौथा प्रहर, तोपर्यंत संयम बाळगून राहणे सगळ्यांनाच जमते असे नाही.
लहान असताना जत्रेला जाताना घरची मोठी मंडळी ताकीद द्यायची की, गर्दीत फिरताना धोंडांबरोबर रहा. कुणी गर्दीत छेड काढली तर धोंड त्यांना हातातील बेताने मारणार. त्यामुळे धोंड हे आपले रक्षक असा संस्कार मागच्या पिढीने आमच्यावर केला, पण पुढे मोठे झाल्यावर परिस्थिती बदलेली दिसली. मुलींनी जत्रेला जाणेच कमी केले. मुली जत्रेच्या रात्री क्वचित जाऊ लागल्या अन् ती मस्ती, ढकलाढकली, कोपर मारणे, नको तिथे हात लावणे, गर्दीचा फायदा घेऊन हे करताना चोरी करणे अशा अनेक घटना घडू लागल्या. यात धोंड मंडळी अग्रेसर आहेत, हेही लक्षात आले. त्यामुळे रक्षक म्हणून ज्या विश्वासाने आम्ही धोंडांकडे पाहात होतो, तो विश्वास आता नवीन धोंडांनी गमावला आहे. काही धोंड मानासाठी धावतात. पालखी बाहेर येते तेव्हा झुंडीच्या झुंडी अंगावर येतात. हे सगळे नियोजनबद्ध नाही का होऊ शकत?
लाख, दीड लाख लोकांना सामावून घेण्याची क्षमता शिरगाव गावात आहे का? त्यासाठी प्रशासन, देवस्थान समितीने कशा प्रकारे नियोजन करणे अपेक्षित आहे? हे ठरायला हवे.
अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने, प्रत्येक घराच्या अंगणात दुकान, दाटीवाटीने गाडेवाले. महसूल महत्त्वाचा की लोकांचे प्राण? एवढ्या मोठ्या संख्येने दुकानांना परवानगी देताना आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका मंदिरापर्यंत येण्याचा मार्ग खुला आहे का? हे कुणी बघावे?
धोंड बेताच्या रंगवलेल्या काठ्या हातात घेऊन मंदिरात नाचतात, रिंगण करतात तेव्हा एक इंच जागा पायाखाली मोकळी नसते. अशा परिस्थितीत तेथे काही घडले तर काय करावे? पूर्वीसारखे आता भक्तगण फक्त रात्रीच येत नाहीत. सकाळपासून ते पाच दिवस कौलोत्सवापर्यंत येत राहतात. त्यात गर्दीच्या क्षणांची नोंद सगळ्यांकडे आहे. त्या क्षणांना हेरून अडचणीच्या जागा मोकळ्या ठेवणे क्रमप्राप्त होते. नको तिथे दोरखंड, बॅरिकेड्स, लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, रस्त्याला लागून असलेली सलग दुकाने, फिरते फेरीवाले, पार्किंगची व्यवस्था हे सगळे चित्र भविष्यकाळातील आपत्काल विचारात घेऊन त्या अनुषंगाने हाताळणे गरजेचे होते. वाईटाचा अगोदर विचार केला पाहिजे. बरे वाईट घडले तर? हा जर तरचा हिशोब मांडणे गरजेचे आहे.
माझा जन्म शिरगावच्या जत्रे दिवशीचा. आमच्या शेजारच्या गावात ही जत्रा भरते. देवी लईराईची भक्ती सगळ्यांनाच आहे. मी जन्मले तीच मृत म्हणून, त्यामुळे मला पुरण्यासाठी खड्डा खणून तयार केला होता. पण शेवटचा प्रयत्न म्हणून देवी लईराईला गाऱ्हाणे घालून तेव्हाच्या जाणत्या गावकऱ्यांनी काही प्रथमोपचार माझ्यावर केले. त्या प्रथमोपचारांनी जरी मी जिवंत झाले, तरी देवी लईराईची कृपा माझ्यासह पूर्ण गावावर आहे, हा भावार्थ तेव्हापासून आतापर्यंत आहे. या अशा असंख्य गावांतील लाखो भाविकांच्या मनात हाच भावार्थ आपल्या लईराई देवीबद्दल आहे. सत्तरीपासून ते पणजीपर्यंत अन् पेडणेपासून काणकोणपर्यंत तिचे भक्तगण आहेत. काही भक्त कर्नाटक, महाराष्ट्रातूनही येतात. त्यामुळे तिचे मंदिर जरी शिरगावात स्थापन असले तरी ती सीमापार या लाखो भाविकांच्या मानात वसते. देवीच्या या जत्रेत घडलेली दुर्दैवी घटना प्रत्येक भक्तगणाला, प्रत्येक नागरिकाला वेदनादायी होती. हे अघटित का व कसे घडले, यावर प्रत्येकजण हृदयातून बोलत होता अन् मनापासून प्रार्थना करीत होता की, हे असे पुन्हा कधीच घडू नये. याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर प्रत्येकाचीच जबाबदारी आहे की, आपण शिस्तीत जाऊन देवदर्शन घेऊन येणार.
प्रशासकीय आहवाल आला असून सरकार कारवाई करेल, पण गेलेल्यांचे प्राण परत येणार नाहीत. त्या कुटुंबांची अपरिमित हानी झालेली आहे, ती भरून न येणारी आहे. वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटते की हे टाळता आले असते! मानवनिर्मित अपघाताला क्षमा नाही. त्यामुळे त्या गेलेल्या प्राणांची जबाबदारी प्रशासन, धोंड, भक्तगण, देवस्थान समिती यासह समाज म्हणून आपल्यावरही येते.
नमन सावंत (धावस्कर)
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या
व साहित्यिक आहेत.)