पाकिस्तानच्या आततायीपणाला चोख उत्तर

जगातील बहुतेक देशांनी शांततेचे आवाहन केले असले तरी दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या भारताच्या कारवाईचे उघडपणे समर्थन केले आहे. अमेरिकेसारखा देशही दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून आले.

Story: संपादकीय |
7 hours ago
पाकिस्तानच्या आततायीपणाला चोख उत्तर

पहलगाममधील २६ पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागल्यानंतर, दहशतवादी आणि त्यांचे पुरस्कर्ते यांना कायम लक्षात राहणारा धडा शिकवू, हा भारताचा निर्धार ७ मे रोजी प्रत्यक्षात व्यक्त झाला. भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केल्यावर पाकिस्तान ज्या प्रकारे हादरले आहे, ते पाहता त्या देशाचा अथवा लष्करी ताकदीचा निभाव भारतीय सेनेसमोर लागणार नाही, हेही नंतर स्पष्ट झाले. त्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने जो अंदाधुंद पद्धतीने हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही सडेतोड उत्तर भारतीय लष्कराने दिले आहे. शुक्रवारीही पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हद्दीत ड्रोन सोडण्यात आले होते. ज्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्यक्षात भारताने केवळ पाकव्यात काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा वापर केला, त्यावेळी नागरी वस्ती अथवा लष्करी तळ यांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. तरीही अविवेकी पाकिस्तानने भारतातील काही शहरे आणि सीमेलगतची मनुष्यवस्ती यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे शुक्रवारी दिसून आले. ८ ते ९ मे च्या मध्यरा‍त्री पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या हेतूने संपूर्ण पश्चिमी भागातील भारतीय हवाई सीमेचे वारंवार उल्लंघन केले. इतकेच नाही तर पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर मोठ्या कॅलिबरच्या हत्यारांनी गोळीबार देखील केला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर लेहपासून ते सर क्रीकपर्यंत ३६ ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० ड्रोन्सचा वापर घुसखोरीसाठी केला. भारतीय सुरक्षा दलांनी कायनेटिक किंवा नॉन कायनेटिक साधनांच्या मदतीने यापैकी काही ड्रोन्स पाडले, अशी माहिती भारतीय संरक्षण खात्याने अधिकृतपणे दिली आहे. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या तंगधार, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी, अकनूर आणि उधमपूर येथे मोठ्या कॅलिबरच्या आर्टिलरी गन आणि सशस्त्र ड्रोन्सचा वापर करत नियंत्रण रेषेवर गोळीबार देखील केला. ज्यामुळे भारतीय सेनेचे काही जवान शहीद आणि जखमी झाले. अशा प्रकारे भारत-पाकिस्तानमधील युद्धाला प्रारंभ करण्यास तो देश कारणीभूत ठरला आहे. भारतातील गुरुद्वारा, चर्च आणि मंदिरांवर हल्ला करण्याचे पाकिस्तानचे कारस्थान अपयशी ठरले आहे. जगातील बहुतेक देशांनी शांततेचे आवाहन केले असले तरी दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या भारताच्या कारवाईचे उघडपणे समर्थन केले आहे. अमेरिकेसारखा देशही दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून आले.

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेंतर्गत पुढील पावले ज्या पद्धतीने भारताने उचलली आहेत, त्यावरून भारताची खंबीर संरक्षण सज्जता आणि राजकीय इच्छाशक्तीचा प्रत्यय जनतेला आला आहे. विरोधी पक्षांनीही एकदिलाने सरकारच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका परदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, भारताला युद्धाची खुमखुमी नाही, तर पाकिस्ताननेच हल्ले सुरू केल्याने त्या देशानेच युद्ध थांबविण्याचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. आपला देश आर्थिक विकासावर भर देतो, त्याला पाकिस्तानशी संघर्ष करण्यात स्वारस्य नव्हते, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. देशावर संकट कोसळले असताना, भारतीय सेना ज्या पद्धतीने पाकिस्तानचे सारे हल्ले परतवून लावत आहे, ते पाहता त्या देशाला माघार घेण्यावाचून गत्यंतर नाही, असेच दिसून येते. माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयात एस-४०० ही लांब पल्ल्यावरील हल्ला हवेतल्या हवेतच उधळून लावण्याची यंत्रणा देशासाठी खरेदी केली होती. अमेरिकेचा तीव्र विरोध डावलून रशियाकडून ही यंत्रणा मोदी सरकारने खरेदी केली होती, त्याचा प्रभाव आता पाकिस्तानी हल्ले आकाशातच परतविण्यासाठी होत आहे. खुद्द पाकिस्तानमधील स्थिती फारच गंभीर आहे. तेथील विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे, बलुचिस्तान आक्रमक बनला आहे. मदरशांमधील युवक आता देशासाठी लढतील, हे पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये संरक्षण मंत्र्यांचे निवेदन तर त्या देशाचा तोल गेल्याचे दर्शविते आहे. भारतीय सैन्य देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व दुष्ट योजनांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी ग्वाही भारतीय लष्कराने दिली असल्याने जनतेने आता कर्तव्यभावनेने सहकार्याचा हात पुढे करावा.